मदर तेरेसा 

कही व्यक्ती इतक्या महान, त्यागी, अलौकिक असतात की, त्यांच्या आठवणीने मनात आदराची भावना निर्माण होते. अशा व्यक्तींपैकी मदर तेरेसा एक आहेत. परदेशात जन्माला येऊनही भारतात राहून भारतीयांसाठी आयुष्य वेचणार्‍या  परदेशी महिलांपैकी त्या एक आहेत.
सन १९१० च्या ऑगस्ट महिन्यात युगोस्लाव्हीयामध्ये एका लहानशा खेड्यात मदर तेरेसांचा जन्म झाला. लहानपणापासूनच गरीब, दु;खी, असहाय्य लोकांबद्दल मदर तेरेसांना आत्मीयता वाटे.वयाच्या बाराव्या वर्षापासून आपल्याच गावातील ख्रिस्ती मिशनमध्ये मदरनी आपल्या जनसेवेच्या कार्याला सुरूवात केली. सन १९२९ मध्ये मिशनने त्यांना भारतात कलकत्ता येथे "सेंट मेरी हायस्कूल" मध्ये पाठवले. आणि तेथूनच मदरनी भारतीयांच्या सेवेला सुरूवात केली. या शाळेत भूगोल विषय शिकवत असताना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त रिकामा वेळ त्या आजुबाजुच्या असहाय्य, निराधार, रोगी लोकांची सेवा करण्यात त्या खर्च करू लागल्या. अशी सेवा करत असताना आपले स्वतःचे एक मिशन असावे असे त्यांना वाटू लागले. आणि युगोस्लाव्हियाच्या बिशपनी म्हणजेच धर्मगुरुंनी त्यांना तशी परवानगी देताच त्यांनी स्वतःचे "मिशन ऑफ चॅरिटी" नावाचे एक मिशन कलकत्ता येथे काढले. गरिबांसारखे रहायचे, त्यांच्यात मिसळायचे, व त्यांच्यातलेच एक होऊन त्यांची सेवा करायची तरच त्या लोकांना आपल्याविषयी आपुलकी वाटेल; अशी त्यांची श्रद्धा होती. म्हणूनच मदर नेहमीच साध्या रहात. त्यांच्या मिशनमध्ये काम करणार्‍या लोकांनाही दान, ब्रह्मचर्य, पवित्र आचरण व निरपेक्ष सेवा या चार गोष्टी पाळण्याबाबत शपथ घ्यवी लागते.
आपल्या मिशनचे काम करीत असतानाच काही दिवसांनी मदर तेरेसांनी गरीब असाहाय  व निराधार  लोकांसाठी "निर्मल हृदय" नावाचा आश्रम काढला. त्यामार्फत गरीबांना मोफत अन्न व औषधोपचार पुरवले जातात. लहान अनाथ मुलांसाठी मदरनी "निर्मल शिशु भवन" नावाचा स्वतंत्र आश्रम काढला. या मुलांना प्रेम, आपुलकी संरक्षण मिळून ती जबाबदार नागरिक बनावी अशी त्यांची इच्छा होती.
मदर तेरेसांचे हे कार्य पुढे भारतापुरताच मर्यादित न रहाता जगातल्या इतर देशातही पसरले. त्याबद्दल त्यांचा गौरव होऊ लागला. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारत सरकारने त्यांना "पद्मश्री" हा किताब दिलाच ;शिवाय सन १९७९ मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिकही मिळाले.
मदर तेरेसांना मिळालेली अन्य पारितोषिके :- १.] मॅगॅसेस पुरस्कार. २.] गुड सॅमेरीटन पारितोषिक.
३.] जोसेफ केनेडी फाऊंडेशन पारितोषिक. ४.] जोसेफ टेंपलटन फाऊंडेशन परितोषिक.