शकुंतला परांजपे 

र्रॅगलर परांजपे यांच्या कन्या शकुंतला परांजपे यांचा जन्म १७ जानेवारी सन १९०६ मध्ये झाला. घरातच प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतल्यावर पुण्याच्या हुजूरपागेच्या शाळेत त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी. एस.सी. ची पदवी संपादन करून वडिलांप्रमाणेच रँगलर होण्याच्या इच्छेने मध्यवर्ती शासनाची शिष्यवृत्ती मिळवून त्या गणिताच्या अभ्यसासाठी  केंब्रिज विद्यापीठात दाखल झाल्या. तेथे गणित विषयाची पदवी जरी त्यांनी मिळवली तरी रँगलर बनण्याचे स्वप्न मात्र त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यानंतर जिनिव्हा येथे "इंटरनॅशनल लेबर ऑरगनायझेशन"या संस्थेत त्यांनी काम केले. तेथेच युरा स्लेप्ट्झॉफ या रशियन चित्रकाराशी त्या विवाहबद्ध झाल्या. १९ मार्च १९३६ मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्याच आज "लेखिका सई परांजपे" म्हणून सुप्रसिद्ध आहेत. पुढे शकुंतलाबाईंनी घटस्फोट घेतला आणि त्या भारतात परत आल्या.
  भारतात आल्यावर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्याआरोग्य विभागात नोकरी स्विकारली. ग्रामीण भागात अशिक्षित गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन त्या संततीनियमनाचा प्रचार करू लागक्ल्या. हे काम शकुंतलाबाईंनी जवळजवळ २० वर्षे केले. शकुंतलाबाईंनी लेखक म्हणूनही विपुल कामगिरी  केली. "घरचा मालक" ही त्यांची पहिली कादंबरी. "सोयरिक" आणि "अनुबंध" असे फ्रेंच नाटकाचे दोन अनुवादही त्यांनी लिहिले. त्याचबरोबर  "माझी प्रेतयात्रा" ,"भिल्लीणीची बोरे", "काही आंबट काही गोड" असे त्यांचे लेखसंग्रहही प्रसिद्ध झाले. त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन सन १९५८ मध्ये त्यांची विधान परिषदेवर सहा वर्षासाठी नेमणूक करण्यात आली. सन १९६४ ते स १९७० या काळात राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांनी कार्य केले. कुटुंबनियोजनासाठी राज्यशासनाकडून जे अर्थसहाय्य मिळे त्याच्या वितरणातही त्यांनी बरीच सुधारणा घडवून आणली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना सन १९९१ मध्ये "पद्मभूषण " किताब देऊन गौरवण्यात आले. सन २००० मध्ये पुणे येथे त्यांचे निधन झाले.