सावित्रीबाई फुले 

महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी आणि स्त्री दास्य नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या पहिल्या क्रांतीकारक महिला म्हणून सावित्रीबाईं वंदनीय आहेत. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव येथे ३ जानेवारी सन १८३१ मध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई लग्न होऊन आपल्या सासरी आल्या तेंव्हा अगदी अशिक्षित होत्या.परंतु समाज स्धारणा करण्याचा वसा घेतलेल्या त्यांच्या पतीने म्हणजेच ज्योतीरावांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या या अशिक्षित पत्नीला प्रथम शिक्षित करायचे ठरवले. सावित्रीबाईंनी आपल्या पतीकडून लेखन, वाचन, गणित इत्यादि अनेक विषय शिकून घेतले. त्यानंतर त्यांनी शिक्षिकेचा कोर्स पूर्ण केला. आणि त्या आपल्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका बनल्या. ज्योतिरावांनी सन १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा काढली. सावित्रीबाई त्या शाळेत स्वतः शिकत आणि इतरांनाही शिकवत असत. त्याकाळी स्त्रियांनी शिक्षण घेणे समाजमान्य नव्हते.त्यामुळे सावित्रीबाईंना लोकक्षोभाला तोंड द्यावे लागले. सावित्रीबाई रस्त्याने जाऊ लागल्या की, लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल टाकत आणि नाही नाही ते बोलत पण सावित्रीबाई आपल्या ध्येयापासून कधी ढळल्या नाहीत.
  सावित्रीबाई केवळ अध्ययन अध्यापन करून थांबल्या नाहीत, तर स्त्रियाच्या संबंधित केशवपनादी अनेक अनिष्ट रूढींवर बंदी घालण्यात यावी यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले. प्रौढ शिक्षणाच्या त्या पहिल्या पुरस्कर्त्या होत्या. तसेच स्त्री मुक्ती चळवळीच्या त्या पहिल्या नेत्या होत्या. सामाजिक कार्यात रममाण होणार्‍या सावित्रीबाई उत्कृष्ट कविताही करत असत. "काव्यफुले" या नावाचा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता. अशाप्रकारे एक थोर शिक्षणतज्ज्ञ, पददलितांच्या कैवारी आणि स्त्रियांच्या उद्धारकर्त्या म्हणून कार्य करणार्‍या सावित्रीबाईंना सन १८९७ मध्ये मृत्यूने आपलेसे केले.