उत्सव 

 चार-पाच दिवसापूर्वीची गोष्ट. समोरच्या पटांगणात सकाळीच एक मोठा टेम्पो येऊन उभा राहिला. मंडपाचे
साहित्य होते त्यात. टेंपोमधून दहाबारा माणसे खाली उतरली. अगदी पद्धतशीरपणे त्या टेंपोतील सामान खाली पटांगणात उतरविले गेले. सरावल्या हातांनी संध्याकाळपर्यंत बांबूचा सांगाडा उभारला गेला. दुसर्‍य दिवशी त्यावर सुंदर कापडाचे आच्छादन घातले गेले. आणि बघता बघता एका भव्य तंबूची उभारणी झाली.रात्री विजेच्या झगमगत्या दिव्यांनी तंबूला अधिक शोभा आली. हळूहळू तंबूत माणसांची ये जा वाढू लागली. आमच्या घराच्या बाल्कनीत उभे राहून पटांगणाचे बदलते रूप आम्ही पहात होतो. एरवी भकास रूक्ष वाटणारे ते पटांगण दिवसेंदिवस अधिकाधिक सुंदर दिसत होते. वठलेल्या वृक्षाला पालवी फुटून तो बहरून यावा तसे काहीसे ते पटांगण भासू लागले. पटांगणाला पालवी फुटताच अनेक पक्षीगणही तेथे जमा होऊ लागले. नाना रंगाचे नाना ढंगाचे ते पक्षी ग्राहक विक्रेत्याच्या रूपात विराजमान होऊ लागले.
कोणत्यातरी महाराजांच्या जन्मोत्सवनिमित्त सात दिवस भरगच्च कार्यक्रम होणार होते. प्रत्यक्ष जन्मदिनाला मात्र अजून दोन दिवस अवकाश होता. पण कार्यक्रमाची रेलचेल मात्र आधीपासूनच सुरू होती. कधी नृत्य, कधी गायन, कधी कथाकथन तर कधी व्याख्यान. अनेक कलावंत कार्यक्रमाला हजेरी लावत होते. आणि आपली कला पेश करून बिदागी घेऊन जात होते. मुख्य शामियाना दिव्यांच्या रोषणाईबरोबरच फुलांच्या माळांनी सजला होता. खांबाखांबावर फुलांचे गुच्छ लटकविलेले होते. भल्यामोठ्या रंगीबेरंगी रांगोळ्यांनी जमीनही सजली होती. हस्तकला, चित्रकला यांच्या अपूर्व संगमाने शामियान्याची शोभा तर वाढली होतीच पण त्याबरोबरच कलाकारांच्या कौशल्याने लोकांच्या डोळ्यांचे पारणेही फिटत होते.
शामियान्याच्या लगतच्या जागेवर पूजासाहित्याच्या दुकानांनी कब्जा केला होता. हारतुर्‍याबरोबरच अंगारे, धुपारे, गुलाल, गंधफुले, उदबत्त्या सारे सामान विक्रीला होते. प्रसादाची ताटे जाळीखाली झाकली गेली होती. नारळांचे ढीग पडले होते. अगदी लांबवर नजर पोहचत नव्हती; इथपर्यंत दुकानेच दुकाने दिसत होती. त्यात पूजासाहित्याच्या दुकानांबरोबरच कपडे, चादरी, खेळणी, खाण्याचे पदार्थ, नकली दागदागिने, चहानाश्त्याच्या टपर्‍या, चामड्याच्या व काचेच्या विविध वस्तू, वह्या, पुस्तके, नकाशे, फोटो आणि पुस्तके वगैरे अनेक छोट्यामोठ्या दुकानांचाही समावेश होता. विक्रेत्यांच्या आरोळ्यांबरोबरच कॅसेटसच्या दुकानातून गाण्यांच्या लकेरी ऐकू येत होत्या. त्या संपूर्ण परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. रस्ते माणसांनी भरून गेले होते. मोटारी, सायकली, स्कूटर्स आदि वहानांना तर तेथे मज्जावच होता. केवळ ग्राहक आणि विक्रेते यांची उपस्थितीच तेथे दिसत होती. गर्दी एवढी होती की रस्त्याच्या नेमक्या कोणत्या भागात आपण उभे आहोत हे समजणेही कठीण जात होते. खरेदी विक्री जोरात चालू होती.येणार्‍या प्रत्येकाला प्रसाद म्हणून जेवण दिले जात होते. अंतराअंतरावर पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. इतकेच नाही तर वेळप्रसंगी अडचण होऊ नये म्हणून प्रथमोपचाराचीही व्यवस्था केली होती. पोलिस, होमगार्डस सारे तैनात होते.कशाची म्हणून कमतरता नव्हती. एक आगळी वेगळी चिंतारहित दुनिया तेथे तयार झाली होती. दिवसेंदिवस उत्सवाचा रंग वाढतच होता. माणसांच्या झुंडीच्या झुंडी प्रफुल्ल चेहर्‍याने येत होत्या. त्यात भाविक किती, बघे किती आणि निव्वळ बाजाराला म्हणून आलेले किती हा विचार करण्यासारखा मुद्दा होता. पैशांची घासाघीस, दर्शनासाठी चेंगराचेंगरी, इतकेच नव्हे तर चोर्‍या आणि शिव्यांच्या बरोबरीने फसवेगिरीच्या बातम्याही त्या पवित्र ठिकाणाहून ऐकायला येत होत्या. अर्थात एवढ्या जनसमुदायाला काबूत ठेवणे, त्यांची नीट व्यवस्था लावणे आणि नियोजनबद्ध कार्यक्रमाद्वारे त्यांना खुश ठेवणे हे खायचे काम नव्हतेच मुळी. कोणताही मॅनेजमेंटचा कोर्स न करता केवळ श्रद्धा , भक्ती आदि भावनांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर विविध गोष्टींचा व्यापार त्या ठिकाणी होत होता.
आणि केवळ म्हणूनच भाव, भक्ती, श्रद्धा, अंधश्रद्धा यासार्‍याच्या पलिकडे जाऊन निव्वळ व्यावहारिक दृष्ट्या विचार केला तर त्या महाराजांना आणि त्या उत्सवाच्या आयोजकांना शतशः प्रणाम करावाच लागेल. कारण जे बड्या नेत्यांना जमले नाही, जे कोणताही राजकीय पक्ष करू शकला नाही; ते या उत्सवाने शक्य करून दाखवले होते. अनेक बेकारांना रोजीरोटीसाठी पैसा कमावण्याचा मार्ग उत्सवाने खुला करून दिला होता. आजच्या 'मॉल' संस्कृतीच्या लखलखत्या दुनियेत पार लयाला गेलेल्या अस्सल भारतीय बनावटीच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य या उत्सवातून होत होते. लाखो रूपयांची उलाढाल त्याठिकणी चालू होती. अनेक हातांना काम मिळाले होते. दानधर्माच्या निमित्तने भुकेल्या लोकांच्या पोटात अन्न आणि हातात पैसा पडत होता. नैराश्याने ग्रासलेल्यांना आशेचा किरण दिसत होता. अनेकांच्या मालाची आपोआप जाहिरात होत होती. रांगोळ्या,तसेच हार गुच्छ बनवणारे छोटेमोठे कलावंत, आणि कलाकार, मूर्तीकार, आचारी आणि रंगारी, गायक आणि वादक यांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी महोत्सवाच्या निमित्ताने आयतेच व्यासपीठ उपलब्ध झाले होते. आपण कहीतरि करू शकतो ही भावना त्यांच्या मनात निर्माण होत होती. सहकार्य, बंधुत्व,दातृत्व, इत्यादि भावभवनांच्या निर्मितीतून जगण्याची उमेद वाढत होती. आणि हे सारे केवळ एका  महाराजांच्या उत्सवातून साध्य होत होते ; ही मोठी नवलाईचीच गोष्ट होती.