शिवराम महादेव परांजपे 

 २७जून१८६४मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड येथे शिवरामपंतांचा जन्म झाला. जात्याच हुशार
 असलेल्या पंतांनी सन १८८४ मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृत विषयात मानाची अशी "जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत स्कॉलरशिप" मिळवली होती. सन १८९०मध्ये ते बी. ए. झाले. त्यानंतर एम्.ए.ची पदवी घेऊन ते "महाराष्ट्र" कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले.
याच काळात स्वतंत्रतेचे व स्वदेशीचे वारे वाहू लागले होते. शिवरामपंतांनी स्वातंत्र्याच्या कार्यात वाहून घेण्याचे ठरवले.
ते सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी झाले. गावोगावी व्याख्याने देऊ लागले. लोकमान्य टिळकांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. सन १८९८ मध्ये त्यांनी "काळ" नावाचे वर्तमानपत्र काढले. या वर्तमानपत्रातून शिवरामपंत इंग्रज सरकारविरोधात जहाल लेखन करत असत. त्यातूनच तरुणांच्या मनात जाज्वल्य देशाभिमान निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. या वर्तमानपत्रामुळेच शिवरामपंत भारतीयांत "काळकर्ते" म्हणून ओळखले जाऊ लागले. सन १९०८ मध्ये "काळ " वर्तमानपात्रातला शिवरामपंतांचा लेख आक्षेपार्ह ठरवून इंग्रज सरकारने त्यांना एकोणीस महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली. पुढे सन १९१० मध्ये "प्रेस अ‍ॅक्टखाली "काळ" वर्तमानपत्र बंद केले गेले. त्यानंतर शिवरामपंतांनी "स्वराज्य" नावाचे साप्ताहिक सुरू केले. याशिवाय "चित्रमय जगत", "विविध वृत्त", "रत्नाकर", "लोकशिक्षण" इत्यादि नियतकालिकातून शिवरामपंतांचे लेख प्रसिद्ध होत होते. "गोवंदाची गोष्ट" आणि "विंध्याचल" या त्यांच्या दोन कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या होत्या. याशिवाय अण्णासाहेब किर्लोस्करांच्या "सौभद्र" नाटकाचे संस्कृत भाषांतर शिवरामपंतांनी केले. बाणभट्टाच्या कथानकावर आधारित शिवरामपंतांनी लिहिलेले "कादंबरी" नावाचे नाटक रंगभूमीवर यशस्वी ठरले. अनेक परदेशी नाटकांची भाषांतरेही शिवरामपंतांनी उत्तम रितीने केली. सन १९२९ मध्ये बेळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे तेअध्यक्ष होते. त्याच वर्षी म्हणजे २७ सप्टेंबर १९२९ रोजी अवघ्या पासष्टाव्या वर्षी शिवरामपंतांचे निधन झाले.