योगिनी जोगळेकर 

 सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५  रोजी पुणे येथे झाला. बी. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर सन १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच 'राष्ट्रसेविका समिती'च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व नाटकेही प्रसिद्ध झाली. पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर " या सम हा " आणि राम मराठे यांच्या जीवनावर  राम प्रहर" या चरित्रांचे त्यांचे लेखन वेगळे ठरले. वयाच्या आठव्या वर्षापासून योगिनीबाई शंकरबुवा अष्टेकर यांचेकडे संगीत शिकत होत्या. त्यानंतर योगिनीबाईंनी राम मराठे यांचे शिष्यत्व पत्करले. आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच योगिनीबाईंनी "पहिली मंगळागौर" या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले.