मसाल्याचे पदार्थ 

१.)  धणे ----  भरतात सर्वत्र होणारे हे पिक आहे. याची रोपे एक ते दिड फूट वाढतात. धण्याच्या पानालाच कोथिंबीर असे म्हणतात. पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. याच्या पानांच्या कडा कातरल्यासारख्या असतात. धण्याच्या रोपाला हिवाळ्याच्या अखेरीला फुले व फळे येतात. ही फुले पांढरट जांभळ्या रंगाची असून ती गुच्छाने येतात. याच्या लहान गोलाकार पिवळट हिरव्या रंगाच्या फळांवर उभ्या रेषा असतात. ही फळे सुकली की धणे म्हणून वापरली जातात.
हे धणे मूत्रप्रवृत्ती वाढविणारे, भूक वाढविणारे, चव वाढविणारे, आंगाची आग शमविणारे, पाचक असतात. खोकला, दमा, जंत, डोळ्याचे विकार, अजिर्ण, मूत्रविकार इत्यादि अनेक आजारांवर धण्याचे नियमित सेवन केल्यास आजार आटोक्यात येतात.
२.)  मिरी ----  मिरीची वेल असते. नारळ सुपारी यासारख्या झाडांवर ती चढवली जाते. या वेलीच्या फांद्यांमधून मूळे बाहेर पडतात. व ती आधाराला घट्ट धरून ठेवतात. पावसाळ्यात मोठ्या वृक्षांच्या मुळाशी या वेलीचे तुकडे लावल्यास ते चांगले वाढतात. मिरीच्या वेलीची पाने विड्याच्या पानाप्रमाणे असतात. ती पाने साधारणतः दहा ते बारा से.मी. लांब व पाच ते सात से.मी. रुंद असतात. जून जुलै महिन्यात मंजिरीप्रमाणे याला छोटी फुले येतात. आणि डिसेंबर ते मार्चमध्ये फळे तयार होतात. मिरीची फळे लहान व गोलाकार असतात. ही फळे कच्ची  असताना हिरवी, पिकल्यावर लालसर तर सुकल्यावर काळी दिसतात. ही फळे गुच्छाने येतात. भारतातआसाम, मलबार, कोकण, या ठिकाणी मिरीची जास्त लागवड केली जाते.
मिरी पाचक, उत्तेजक, रुचिर, भूक वाढविणारे, कफ दूर करणारे असे फळ आहे. मिरी मूत्रप्रवृत्ती वाढवते, अपचन, जंत विकार, सर्दी- खोकला, दमा, मूळव्याध, पोटदुखी, दातदुखी, डोकेदुखी, अर्धशिशी, इत्यादि अनेक रोगांवर औषधी आहे. मात्र ती पित्तवर्धक असल्याने पित्तप्रवृत्तीच्या लोकांनी त्याचा जपून वापर करावा.
३.)  खसखस ----  अफूच्या झाडाच्या बीला खसखस असे म्हणतात. काळी जमीन, मध्यम पाऊस, थंड व कोरडे हवामान असेल तर त्याठिकाणी अफूची शेती केली जाते. जानेवारी महिन्यात बी पपेरल्यानंतर साधारणतः तीन महिन्यात रोपटी वाढून त्यांना गुलाबी, पांढर्‍या रंगाची फुले येतात. या फुलांच्या मागे लहानसे बोंड असते. पंधरा दिवसानंतर त्याचा आकार लिंबाएवढा होतो. मग फुले गळून पडतात. बोंडे पिकली कि त्यापासून अफूचा रस बाहेर काढतात. अफू काढून घेतल्यावर ती बोंडे पंधरा- वीस दिवसवाळवतात. आणि मग त्यातून खसखस बाहेर येते.
४.)  बडीशेप ----  भरतात सर्वत्र याची लागवडकेली जाते. याची रोपे साधारणतः पाच फूटापर्यंत वाढतात. याची पाने खूपच बारीक व चविष्ट असतात. बडिशेपची फुले गुच्छाने येतात. ती पिवळट पांढर्‍या रंगाची व आकाराने लहान आसतात. बडिशेपची फळे लहान, हिरवट रंगाची असतात. आणि त्यावर रेषा असतात. ती सुवासिक असून पदार्थाची चव वाढवण्यास त्याचा उपयोग करतात.
बडिशेप भूक वाढवणारी, अन्नपचन नीट घडवून आणणारी, मूत्रप्रवृत्ती वाढवणारी अशी सुगंधी फळे आहेत. पोटदुखी, पोटातील वात, उलट्या, डोकेदुखी, अजीर्ण, मूत्रसंस्थेचे विकार, मासिक पाळीचे त्रास इत्यादिवर उपयुक्त आहे.
५.)  शहाजिरे----  उत्तर हिमालयातील पहाडी भागात शहाजिर्‍याची जास्त प्रमाणात लागवड केली जाते. याची रोपे एक ते दोन फूट वाढतात. शहाजिर्‍याची पांढरी फुले गुच्छाने येतात. याची फळे लांबट, पिवळट पांढर्‍या रंगाची, सडपातळ व उभ्या रेषा असलेली अशी असतात.
शहाजिरे जठराग्नी वाढविणारे, पाचक, पोटातील गॅस दूर करणारे,असे आहे. त्यामुळे अपचन, जुलाब, पोटदुखी, मुखदुर्गंधी, अरुची, वांती, इत्यादि विकारात याचा वापर केला जातो.
६.) हळद ----- हळदीच्या कंदाद्वारे हळदीची लागवड केली जाते. त्याच्या वाढीसाठी पाण्याची जरूरी असते. हळदीच्या कंदाला जमिनीखाली गाठी फुटतात. त्या गाठीचांच हळद म्हणून वापर केला जातो. हळदीच्या या गाठी जमिनीतून काढून त्यावर प्रक्रिया केली जाते. मग त्या सुकवून वापरात आणल्या जातात. लोखंडी हळद, मऊ सुगंधी हळद, आंबे हळद असे हळदीचे प्रकार आहेत. त्यापैकी मऊ सुगंधी हळद आपण मसाल्यासाठी वापरतो. तर लोखंडी हळदीचा वापर रंग तयार करण्यासाठी केला जातो. हळदीमध्ये लोह, मँगनीज. ब आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, क्रोमियम आढळते. हळदीमध्ये असणार्‍या ' करक्युमिन ' नावाच्या फोटोकेमिकलमुळे हळदीला पिवळा रंग येतो. या करक्युमिनमुळेच अल्झायमर्स, कर्करोग, मेंदूचे आजार इत्यादीसाठी हळदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तिचा वापर जखम लवकर भरून काढण्यास, रक्तस्त्राव थांबवण्यास केला जातो. हळद स्निग्ध पदार्थांच्या चयापचनास मदत करत असल्याने वजन योग्य प्रमाणात राखण्यास, कोलेस्टेरॉल कमी करण्यास, पोटाच्या तक्रारी दूर करण्यासही हळदीचा वापर होतो. हळदीमध्ये वातनाशक, कफनाशक गुणधर्म आढळल्याने खोकला, घसादुखी, इत्यादिसाठी हळद घालून दूधाचे सेवन केले जाते. त्वचेचा रंग सुधारण्यास,कांती उजळ करण्यास हळदीचा लेप चेहर्‍याला लावला जातो. सौंदर्य प्रसाधनात हळदीला महत्त्व आहे. प्रतिकार शक्ती वाढवणारी,रक्त शुद्ध करणारी अशी ही हळद ह्रदयरोग, मधुमेह असणार्‍या व्यक्तींनी नित्य वापरात आणावी.
७.) जायफळ ---- "चणेफुटाणे" या साइटवर "पानाचे तबक" या लेखात याची माहिती आहे.
८.) लवंग ----  "चणेफुटाणे" या साइटवर "पानाचे तबक" या लेखात याची माहिती आहे.