अनुताई वाघ 

स्वतंत्र भारत बनविण्याच्या कार्यात महात्मा गांधींनी सेवाभावी कार्यकर्त्यांची जी फौज निर्माण केली त्यापैकी एक अनुताई वाघ या आहेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता मन लावून एखादे काम करणार्‍या व्यक्ती दुर्मिळच .म्हणूनच कोसबाडसारख्या खेड्यात आदिवासींची सेवा तन्मयतेने करणार्‍या अनुताई वाघ आदरणीय होत.

१७ मार्च १९१० मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांची फिरतीची नोकरी असल्याने अनुताईकडे बुद्धी असूनही त्यांच्या शिक्षणाची हेळ्सांड झाली. त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले.दुर्दैवाने संसार म्हणजे काय ते कळायच्या आतच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. त्यांच्या पतीच्या मृत्युनंतर आईवडिलांनी त्यांना शिकविले. शिक्षणानंतर त्यानी पुण्याच्या हुजुरपागा नावाच्या शाळेत तेरा वर्ष शिक्षिकाम्हणून नोकरी केली. सन १९४२ मध्ये महात्मा गांधीजींच्या हाकेला ओ देऊन त्यांनी बोरिवली येथील ग्राम सेविका शिबिरात  प्रवेश घेतला.येथूनच त्यांच्या समाजसेवेला प्रारंभ झाला. अर्थातच हुजुरपागेतली नोकरी त्यांना सोडावी लागली.

हे बोरिवलीचे शिबिर त्यांच्या दृष्टीने भाग्याचे ठरले. कारण येथेच अनुताईंची गाठ ताराबाई मोडक यांच्याशी झाली. दोघींनी समाजालाच आपला संसार मानले. ताराबाई मोडक या अनुताईंच्या गुरूच. अनुताईंना घडवले ते ताराबाईंनीच. १९४५ मध्ये महाराष्ट्रात मुंबईजवळ बोर्डी येथे 'ग्राम बाल शिक्षा' केंद्राची स्थापना करून भारतातील ग्रामीण बालशिक्षणाच्या कर्याला त्यांनी प्रारंभ केला. आपल्या अविरत कष्टाने, कल्पकतेने आणि नि:स्वार्थ वृत्तीने बालशिक्षणाच्या इतिहासात त्यांनी अनेक प्रयोग केले. ताराबाईंनी पाया घालून दिला आणि अनुताईंनी त्यावर भव्य इमारत उभारली. सन १९५६ मध्ये ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अनुताईंनी मुंबईजवळ कोसबाड येथील आदिवासी वस्तीत पहिल्या बालवाडीची सुरूवात केली. त्याच ठिकाणी आता बालवाड्या, पाळणाघर, प्राथमिक व माध्यमिक शाळा, बालसेविका वर्ग, किसान शाळा, रात्र शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग इत्यादि गोषवारा उभा आहे.

 स्वाभिमानी, कष्टाळू, प्रामाणिक व बरेच दिवस डोंगराळ भागात राहिल्याने शहरी सुधारणांपासून वंचित असलेला, शहरी संस्कृतीला काहीसा घाबरलेला, व्यसनी असलेला असा हा आदिवासी सुधारणे हे काही सोप काम नव्हते. पण अनुताईंनी ते मोठ्या जिद्दीने ,चिकाटीने केले. आणि त्यांच्या अथक परिश्रमाने कोसबाड भागातील आदिवासी पुरता बदलून गेला. अनुताईंनी तेथे एक नविन सृष्टी निर्माण केली.

या भागातल खर शिक्षण म्हणजे मुलांना माणसात आणणे. ते काम अनुताईंनी अगदी नाक न मुरडता हौसेने केले. त्यांना स्वतःला मूल नव्हतेच पण या आदिवासी मुलांच्या त्या आई बनल्या. केवळ अक्षर ओळख न शिकवता त्यांना न्हाऊ माखू घालणे,त्यांच्या डोक्यातील उवा काढणे, त्यांच्या खरजेला औषध लावणे,त्यांना संडास मुतार्‍यांचा वापर कसा करायचा ते दाखवणे, इत्यादि अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्यासाठी केल्या बालशिक्षणाचा संदेश ज्या ज्या मार्गानने पोहचवता येईल तो तो मार्ग त्यांनी अवलंबिला. विशेष म्हणजे हे सारे शिक्षण देत असताना त्यांनी एकही शहरी वस्तू वापरली नाही. तेथील परिस्थितीत जे जे मिळेल त्याचा उपयोग त्यांनी  शिक्षणासाठी केला. भिंती म्हणजे फळा , कोळसा म्हणजे खडू. तेथे मिळणारे शंखशिंपले,पानेफुले, यांच्या सहाय्याने हसतखेळत गाणी; गोष्टी; सहली यातून शिक्षण देण्याची अभिनव पद्धत त्यांनी सुरू केली. अशा रितीने स्वतंत्र बुद्धिमत्ता, समर्पित वृत्ती, स्त्रीचा भावूकपणा, पुरूषाचा कणखरपणा,अशा विविध स्वभाव पैलूंच्या सहाय्याने अनुताईंनी निराकार अशा आदिवासी समाजाला आकार देण्याचे मौलिक कार्य केले. मार्च १९८० मध्ये भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय पारीतोषिक देवून त्यांच्या या कार्याचा यथोचित गौरव केला.