नर्मदा नदी 

            भारतात गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा या पाच पवित्र नद्या मानल्या गेल्या आहेत. भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील मैकल पर्वतश्रेणीच्य अमरकंटक पठरावर १,०५७ मीटर उंचीवर एका झर्‍यातून नर्मदा नदी उगम पावली आहे. उत्तर भारत व दख्खनचे पठार यांच्या सीमेवरील खचदरीतून नर्मदा नदी वहाते. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वहात जाऊन ती भडोचजवळ अरबी समुद्राच्या खंबायतच्या आखातात मिळते. नर्मदा ही पश्चिमवाहिनी नदी आहे. तिची लांबी १,३१० किमी आहे. आणि तिच्या पाण्याखाली सुमारे ९८,४२० चौ. किमी क्षेत्र येते. तिला ९९९ उपनद्या मिळतात.
            नर्मदा नदीच्या काठावर कोंटितीर्थ, कपिलधारा, ओंकार मांधाता, सहस्त्रधारा, शूल्यपाणी, महेश्वर, विमलेश्वर इत्यादी शिवतीर्थे आहेत. रामायण महाभारत काळात अनेक ऋषींचे आश्रम नर्मदेच्या परिसरात होते. नर्मदा नदी रेवा, अमरजा, मैकलकन्या या नावानेही ओळखली जाते.
            नर्मदा अशी एकच नदी आहे जिला पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. नर्मदेच्या मुखापासून एका काठाने उगमापर्यंत व दुसर्‍या काठाने उगमापासून मुखापर्यंत विशिष्ट बंधने पाळून नर्मदा परिक्रमा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अशी पहिली प्रदक्षिणा मार्कडेय ऋषींनी केली असे म्हणतात. त्यांनी तिच्या प्रत्येक उपनद्यांच्या उगमसथानापर्यंत जाऊन अट्ठावीस वर्षात ही प्रदक्षिणा पूरी केली.  आजही नर्मदा प्रदक्षिणा करणारे भक्त पायी परिक्रमा करतात.