फोडणीचे साहित्य 

१)   जिर-   ही वनस्पती १ ते दीड फूट उंच वाढते. याच्या फांद्या पातळ, पाने लांब पातळ असतात. याला पांढर्‍या छोट्या फुलांचे गुच्छ येतात. याची फळे टोकाकडे रुंद, पाव इंच लांब व पाठीमागच्या बाजुला रेषा असलेली धूसर रंगाची असतात. आपण आहारात वापरतो ते जिरे म्हणजे ही सुकवलेली फळेच होत. हे जिरे औषधी असते.मूत्रविकारावर जिरे घालून उकललेले पाणी प्यायला देतात. वांती, जुलाब, जंत, अपचन, गॅसेस होणे इ.
अनेक  रोगांवर औषध म्हणून जिर्‍याचा वापर करतात.
२)   मोहरी-   सुंदर पिवळ्या फुलांची ही वनस्पती २ ते ३ फूट एवढी उंच वाढते. याची पाने लांब असतात. याला चपट्या, टोकदार शेंगा येतात. त्याच्या आतील लाल भूर्‍या रंगाच्या लहान गोलाकार बिया म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यातील मोहरी. रब्बी पिकाबरोबर पेरल्या जाणार्‍या या बियांचे तेलही काढतात. काळी मोहरी व लाल मोहरी अशा दोन जाती असतात त्यापैकी काळी मोहरी जास्त तीक्ष्ण असते.
             मोहरी पाचक उत्तेजक व घाम उत्पन्न करणारी आहे. संधिवात, दमा, पोटदुखी, इत्यादी विकारांवर ती उपयुक्त आहे.
३)   हिंग -   काबूल, अफगाणिस्तान, भूमध्य सागरी प्रदेश इत्यादी ठिकाणी हिंग तयार होतो. काबूली हिंग जास्त प्रसिद्ध आहे. हिंग दोन प्रकारचा असतो. हिर्‍याप्रमाणे शुभ्र, सुगंधित हिगाला "हिरा हिंग" म्हणतात. तर काळपट दुर्गंधीयुक्त हिंगाला "हिंगडा हिंग" म्हणतात.
            हिंगाचे झाड सुगंधी असून ते ५ ते ८ फूट उंच वाढते. याच्या पानांच्या कडा फाटलेल्या असतात. ती लांब व लवयुक्त असतात. याची पिवळ्या रंगाची लहान फुले गुच्छानी येतात. हिंगाच्या झाडाच्या काडापासून लांब पुष्प दंड निघतो. याची फळे अंजूदान नावानेही ओळखली जातात. ती अर्धा इंच लांब व रुंद असतात.
           हिंगाचे झाड चार वर्षाचे झाल्यांवर वसंतऋतूमध्ये झाडाच्या मुळाच्या वरच्या भागाची साल  चाकूने काढली जाते. साल काढलेल्या भागातून रस बाहेर येऊ लागतो तो १-२ दिवसात सुकल्यावर तो काढतात. यालाच हिंग म्हणातात.
            हिंग जठराग्नी वाढवणारे, अन्नपचन घडविणारे, चव वाढविणारे, पोटातील गॅस नष्ट करणारे असे औषधी द्रव्य आहे. पोटदुखी, जंत होणे, फुफ्फुसाचे विकार, यावर औषध म्हणून हिंगाचा वापर करतात. दात दुखत असल्यास हिंग दाताच्या फटीत ठेवावा.
४)   मेथी-   मेथीची भाजी व बिया अशा दोन्ही प्रकारे मेथीचा वापर आहारात केला जातो. लहान पाने  असलेली व मोठी पाने असलेली असे मेथीचे दोन प्रकार असतात. उग्रवासाचे हे झाड ६ इंच ते दीड  फुटापर्यंत वाढते. याला जानेवारीत बारीक पांढरट, पिवळट रंगाची फुले येतात. मार्च महिन्यात याला शेंगा येतात. त्यात १० ते २० एवढे पिवळट भुर्‍या रंगाचे दाणे असतात. हेच दाणे आपण फोडणीत वापरतो.
          पदार्थाची चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. पोटातील गॅस दूर करण्यासाठी, तसे सांधेदुखी, सूज, वातपीडा, अंगदुखी, मधुमेह, केस विकार इत्यादी आजारात मेथीच्या दाण्यांचा औषध म्हणून वापर केला जातो.
५)  लसूण-   या झाडाला कलिकाकंद असेही म्हणतात. भारतात कोठेही याचे पीक येते. रसोन व महारसोन असे याचे दोन प्रकार आहेत. महारसोनाचे कांदे मोठे असतात. याची रोपे ३० ते ६० सेमी पर्यंत वाढतात. चपटी, लांब, टोकाकडे अरुंद होत जाणारी याची पाने असतात. थंडीत याच्या पुष्पदंडाला पांढर्‍या रंगाची गुच्छाने फुले येतात याच्या कंदाला पांढर्‍या व लालसर पाकळ्या असतात. हाच कंद म्हणजे लसूण होय.
            लसूण धातूवर्धक, पाचक, रक्तवर्धक, बलकारक असून तो डोळ्यांना हितकारक, म्हतारपण दूर ठेवणारा, बुद्धि वाढवणारा असा कंद आहे. पोटात जंत झाल्यास, पोट साफ होत नसल्यास, पोटात वात धरल्यास, लसूण  उत्तम औषध आहे. तुपात तळून अगर त्याचा रस काढून दूधातून घ्यावा. तसेच आवाज बसल्यास लसूण तुपात तळून खातात. अर्धशिशी झाली असेल तर लसणाचा रस काढून २ थेंब नाकात घालावा. तीळाच्या तेलात लसणाची १ पाकळी घालून तळून घ्यावी व असे तेल थंड करून कान दुखत असल्यास कानात घालावे. हाडे मोडली असता ४-५ लसूण पाकळ्या मध साखरे बरोबर रोज खाव्यात. लसूण घालून उकळलेले दूध टी. बी. च्या रोग्यांना उपयुक्त असते.
६.)  कढिपत्ता -  स्वाद आणि रुची यासाठी फोडणीमध्ये कढीपत्ता वापरला जातो. त्याचे शास्त्रीय नाव "मुराया कोनिजा" असे आहे.इंग्रजीमध्ये कढीपत्त्याला "करीलिफ ट्री" असे म्हटले जाते. म्यानमार, मलेशिया, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका येथे कढीपत्त्याचे जास्त उत्पादन होते. भारतात पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा,केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आदि राज्यात कढिपता वाढविला जातो. कढीलिंबाच्या झाडासाठी कोणत्याही प्रकारचे हवामान चालते. या झाडांची उंची १५ ते २० फूटापर्यंत वाढते. हे झाड सर्वसाधारणपणे पंचवीस वर्ष जगते. झाड तीन चार वर्षाचे झाल्यावर त्याची पाने काढायला सुरूवात करतात.पानांमध्ये तैलग्रंथी असतात. त्यामुळेच ही पाने सुवासिक असतात. फेब्रुवारी मार्च महिन्यात या झाडाला फुले येतात. ही फुले पांढर्‍या  रंगाची, आकाराने लहान व सुवासिक असतात. जून महिन्यात झाडाला फळे येतात. ती शेंगदाण्याच्या आकाराची असतात.
कढीलिंबामध्ये बीटा-कॅरोटिन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शंभर ग्रॅम पानांपासून १२,५०० आंतर राष्ट्रीय युनिट इतके "अ" जीवनसत्व मिळते.कढीलिंबाच्या हिरव्या पानात ६६ ट्क्के आर्द्र्ता,सहा टक्के प्रोटीन्स, सहा टक्के तंतू पदार्थ,आणि पिष्टमय पदार्थ १६ टक्के असतात. शंभर ग्रॅम पानांपासून ८१० मिलिग्रॅम कॅल्शियम, ६०० मिलिग्रॅम फॉस्फरस आणि लोह तीन मिलिग्रॅम मिळते.
कढीपत्त्यामुळे जीभेला रुची येते, भूक प्रज्वलित होते,तसेच अन्नाचे पचनही नीट होते. या पानांमुळे पाचक रस स्त्रवण्यास चालना मिळून पचनक्रिया सुधारते,पोटातील गॅसेस कमी होतात. हा कढीलिंब डायरिया, जुलाब, उलटी यावर गुणकारी समजला जातो. कढीलिंबाच्या पानांचे पोटीस जखमांवर लावल्यास जखमा लवकर बर्‍या होतात. कढीलिंबाची पाने घालून उकळलेले खोबरेल तेल रोज केसांना लावल्यास केस काळेभोर व लांबसडक होतात.रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचा गुणधर्मही कढीपत्त्यामध्ये आहे.अशाप्रकारे अन्नपदार्थ स्वादयुक्त बनवण्याबरोबरच कढिपत्ता औषध म्हणूनही वापरला जातो.