गरुड 

            अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगण्याची क्षमता असणारा गरुड पक्षी आज दयनीय अवस्थेत आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गरुडाचे आयुष्य सामान्यपणे २५ ते ४५ वर्ष इतके असते. त्यांची उंची ३१ ते ३७ असते; तर पसरलेल्या पंखांची  लांबी साडे पाच ते आठ फूट असते. पाय फिकट नारंगी व चोच पिवळी असते.
            गरुडाची मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते. एप्रिल व ऑगस्ट या काळात ती सरासरी दोन अंडी देते. पण एकावेळी एकच अंडे उबवते व दुसरे बाजुला ठेवते. उबवलेल्या अंड्यातून बाहेर आलेले पिल्लू खाऊ पिऊ लागले की मगच दुसरे अंड उबवते. पिल्लाचा जन्म झाल्यानंतर २ ते ३ आठवडे ते त्यांची काळजी घेतात. १० ते १५ आठवडे पिल्लांना स्वतंत्रपणे उडायला मदतही करतात.
             छोटे कासव, साप, मासोळी, समुद्रपक्षी, इतर जलचर हे त्यांचे अन्न असते. काही वेळा इतर पक्ष्यांनी पकडलेले भक्ष्य गरुड उडता उडता पळवतो. त्याची चोच बाकदार व तीक्ष्ण असते. गरुड हा पक्षी ८ ते १० पट अधिक दूरचे पाहू शकतो. त्याच्या डोळ्यावरचे संरक्षक कवच सूर्याच्या किरणांपासून त्याच्या डोळ्यांचे रक्षण करते. त्यामुळे समुद्र व नदीच्या पाण्यातील मासोळी शोधणे त्याला सहज शक्य होते.
           घरटे बांधण्याचे काम मांदी गरुड करते. पाणी साठा ज्या ठिकाणी असेल तेथे या पक्षांची घरटी असतात. लहानमोठ्या काड्या, बांबूचे तुकडे, गवत, फांद्या, माती या साहित्याने ती आपले घरटे भक्कम बांधते. काही घरटी ६ फूट रुंद व २० फुट खोल इतकी मोठीही असतात. एकदा बांधलेले घरटे गरुड वर्षानुवर्षे वापरतो. काही घरटी दहा ते २० वर्ष ही टिकतात इतकी ती मजबूत असतात.
            विविध ठिकाणी विविध प्रकारचे गरुड आढळतात. अमेरिका व कॅनडात 'बाल्ड ईगल' आढळतात. हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे. पश्चिम अशियात 'एम्पीरियल ईगल' ही प्रजात आढळते. फिलिपाइन्स मध्ये आढळणारा गरुड जगातील मोठ्या गरुडांपैकी एक आहे. स्पेन, पोर्तुगालमधून हिवाळ्यात  गरूड पक्षी भारत, चीन व अफ्रिकेत  स्थलांतरीत होताना आढळतात. हंगेरी ऑस्ट्रिया या देशांतून मात्र गरुड नामशेष झाल्याचे आढळले.