केशर 

            अतिशय मौलवान, सुगंधी, स्वादिष्ट, आकर्षक रंगाच केशर; मसाल्याच्या पदार्थात सर्वात महाग म्हणून ओळखल जात. त्याची अगदी बारीक काडी वापरून पदार्थाचा स्वाद व रंग वाढवला जातो.
           अरेबिक भाषेत जाफरान म्हणजे पिवळा रंग त्यावरून केशराला सॅफरन हे नाव मिळाल अस म्हणतात. आपल्या आहारात आपण ज्याचा वापर करतो ते केशराचे वाळवलेले पराग असतात.
           साधारणतः जुलै ऑगस्ट मध्ये केशराचे कांदे लावले जातात. सप्टेंबरमध्ये खतपाणी, खुरपणी केली जाते. होरपळवून टाकणारा कडक उन्हाळा आणि कडाक्याची थंडी अशी हवा केशराच्या लागवडीला उपयुक्त असते. ऑक्टोबरच्या शेवटी व नोव्हेंबरच्या सुरवातीला केशराच्या झाडाला सुंदर जांभळ्या रंगाची फुले येतात. ही फुले दोन आठवडे झाडावर असतात. फुल उमलल की ते लगेच काढाव लागत. नाहीतर त्याचा सुगंध कमी होतो. सूर्याची तीव्रता जाणवायच्या आत सकाळीच ही फुल तोडली जातात. प्रत्येक फुलात पिवळे व केशरी रंगाचे पराग असतात. त्यापैकी फक्त केशरी पराग नाजुक हाताने अलगद वेगळे केले जातात. हे पराग काढल्यावर मंद आचेवर जाळी टाकून त्यावर व्यवस्थित भाजल जात.  भाजल्यानंतर त्याचा आकार कमी होतो. व रंग गडद होतो. हेच आपल सुगंधी केशर. साधारणतः दीडशे फुलातले पराग काढले तर त्यापासून फक्त एक ग्रॅम केशर मिळत. म्हणून ते सोन्याच्या भावाने विकल जात. केशराच्या वासावर व रंगावर प्रकाशाचा व वातावरणातील प्रदुषणाचा परिणाम होऊ नये म्हणून ते नेहमी घट्ट झाकणाच्या डबीमध्ये भरून सावलीत ठेवल जात. केशर वापरताना ते पूड करून कोमट दुधात मिसळून वापरले तर छान रंग, स्वाद मिळतो.
            या श्रीमंती केशराचा उगम मुळाचा अशियातला. पण मूर लोकांनी ते स्पेन मध्ये नेऊन तेथे त्याची लागवड केली. जगात स्पेनमध्ये जास्त केशर पिकवल जात. भारतात काश्मिरी केशर जास्त प्रसिद्ध आहे. भारतात हजारो वर्षापासून वैद्यक शास्त्रात केशराचा वापर केला जातो.