वेदवाडमय २ 

            ऋग्वेदात १० मण्डले व १०२८ सूक्ते येतात. सर्व मिळून १०६०० कडवी येतात. एका सूक्तात कमीतकमी ३ तर जास्तीत जास्त ५६ कडवी आहेत. आज जगाच्या पाठीवर असंख्य ग्रंथ आहेत. त्यामध्ये मानवतेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व ग्रंथांत ऋग्वेद हा सर्वात प्राचीन होय. "ऋच्यन्ते / स्तूत्यन्ते देवा: अनया इति ऋक |" म्हणजे जिच्या योगाने देवांची स्तुति केली जाते ती ऋचा. अनेक ऋचा मिळून सूक्त बनते. ऋग्वेद संपूर्ण काव्यमय आहे. त्यात एकही गद्य ओळ नाही. इंद्र, अग्नि, वरुण, सूर्य, उषा, वायु, आप, अश्विनौ अशी देवतासूक्ते त्यात येतात. यम-यमी, सरमा-पणी, उर्वशी - पुरुवरा अशी संवादसूक्ते येतात. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद आहे.
            यजुर्वेद क्रमांकाने दुसरा वेद. यजुस म्हणजे मंत्र, गद्य मंत्र, ते म्हणायचे नियम, त्यांच्या संग्रहाला यजुर्वेद हे नाव आहे. त्यात पद्याबरोबर गद्य पण येत. ज्ञान, कर्म, भक्ति ह्या मानवी जीवनाच्या तीन विकासश्रेणी होत. पैकी कर्मकाण्डाचे प्रतिपादन करणारा हा वेदआहे. शुक्ल व कृष्ण हे यजुर्वेदाचे दोन भाग. रूद्र/ शिव ह्या नवीन देवता येथे येतात. वैशंपायन, याज्ञवल्क्य हे तर प्रसिध्द आचार्य.यांनी येथे एक ईश्वर ही कल्पना सप्रमाण मांडली.  तीच कल्पना नंतर उपनिषदांनी उचलली.  धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे.
            सामदेव हा कालगणनेनुसार पुढचा वेद. साम म्हणजे गान किंवा प्रिय वचन. ऋग्वेदातील अनेक मंत्र यात समाविष्ट केले आहेत. ७५ सूक्ते स्वतंत्र आहेत. मंत्रांच्या आधारे केल्या जाणार्‍या गायनाला साम म्हणतात. "वेदानाम सामवेदोस्मि |"  हे गीतेतील  वचन सर्वश्रुत आहे. ओमकार हे सामवेदाचे सार होय. सा म्हणजे ऋचा आणि अम म्हणजे गांधारादि स्वर होत. दोन्ही मिळून साम होतो. गांधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद होय.
            अथर्ववेद हा अखेरचा वेद. अथर्वा ऋषीने तो प्रथम पाहिला व आविष्कृत केला; म्हणून हे नाव त्याला देण्यात आले. हा पुरोहितांचा वेद समजला जातो. पुढे राहतो तो पुरोहित. क्षात्रवेद हे ह्या वेदाचे दुसरे नाव. ह्या वेदाच्या ९ शाखा आहेत. त्यात ७६० सूक्ते येतात. ६००० मंत्र आहेत. अथर्ववेदाची भाषा ऋग्वेदाचे स्मरण करून देते. येथील वातावरण मात्र वेगळे आहे. जादुटोणा म्हणजे यातुविद्या, हा महत्त्वाचा विषय होय. भुते-खेते, रोग, मृत्यु ह्यांनी देवतांची जागा घेतली.
            उपनिषेद - चार वेदानंतर ब्राह्मणे म्हणजे ब्राह्मणग्रंथ नंतर आरण्यके व अखेर उपनिषेद येतात. "वेदवाड्मयस्य अन्ते तिष्ठति |" ह्या अर्थाने उपनिषदांना वेदान्त म्हणतात. उप+नि+सद म्हणजे गुरुच्या जवळ पण निम्नस्तरावर बसणे व संवाद साधणे हा एक अर्थ. आद्य शंकराचार्यांनी कठोपनिषदात वरील धातूचा विध्वंसन असा अर्थ करून उपनिषद म्हणजे अविद्येचा नाश करणारी म्हणजे 'अविद्या विध्वंसिनी' असे म्हटले आहे. अज्ञान नाहीसे करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद होय. हे ग्रंथ ब्रह्मविद्या शिकवणारे ग्रंथ होत. इ.स. पूर्व १२०० ते इ.स. पूर्व ६०० ह्या कालावधीत महत्त्वाची उपनिषदे रचली गेली.
ईशकेनकठप्रश्नमंडमांडुक्यतैत्तिरी: |
ऐतरेयं च छांदोग्यं बृहदारण्यकं तथा ||
          
ह्या दहा उपनिषदांबरोबर कौशीतकी, श्वेताश्वेतर व मैत्री ह्यांचा प्रमुख उपनिषेद म्हणून म्हटले जाते.
         
  धर्म, सृष्टि, अंतीम वस्तुतत्व म्हणजेच आत्मा किंवा परमात्म हे येथील प्रमुख विषय. ब्रह्म्, ईश्वर, जीवन, पुनर्जन्म, अविधा, आनंद, श्रवण, मनन. निदिध्यासन, जिवनमुक्ति अशा अनेक विषयांवर विचार व्यक्त झालेले उपनिषदांत दिसून येतात.