नागार्जुन सागर धरण 

            आंध्र राज्यातील हैदराबादपासून दिडशे किमी अंतरावर नागार्जून सागर धरण आहे. हे जगातील सर्वात उंच धरण असून त्याची उंची १२५ मीटर्स इतकी आहे. याच्या जलाशयात साडे अकरा दशलक्ष घनमीटर इतके पाणी राहू शकते. या क्षमतेचा हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा जलाशय आहे. या धरणातून पाणी सोडण्याचा बोगदा १२६० मीटर लांब व ८ मीटर व्यासाचा आहे. दर सेकंदाला सहाशे घनमीटर पाणी या बोगद्यातून सोडण्यात येते. या बोगद्याला पंडित नेहरू कालवा असे नाव देण्यात आले आहे.
           सन १९५३ मध्ये मंजुर झालेल्या या योजनेचा कोनशीला समारंभ दहा डिसेंबर १९५५ रोजी त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जवळवजवळ १४ वार्षांनी धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. कृष्णा नदीच्या उगमापासून बाराशे किमी अंतरावर बांधलेले हे धरण संपूर्ण दगडी आहे. पाच कोटी चाळीस लक्ष घनमीटर एवढे आवाढव्य असे हे बांधकाम आहे. कृष्णा नदीच्या पात्राखाली १४ मीटर या धरणाचा पाया खोदण्यात आला आहे. या धरणाची रुंदी पायाजवळ पंचाऐंशी असून ते वर निमुळते होत गेले आहे. त्यामुळे टोकाला त्याची रुंदी फक्त नऊ मीटर एवढीच आहे.
           आचार्य नागार्जून या बौद्ध धर्माच्या तपस्व्याच्या नावावरून या धरणाला नागार्जुन असे नाव दिले गेले. या धरणाजवळील एका ग्रॅनाइट स्तंभाच्या वरच्या टोकाला पूर्ण कुंभ व कमलपुष्प हे बौद्ध धर्माचे प्रतिक आहे. तसेच नागार्जुनांची प्रतिमाही तेथे  कोरली आहे. स्तंभाच्या चार बाजुवर भारतातील किसान व बैलजोडीचे चित्र कोरले आहे. या धरणामुळे पुराच्या पाण्याचे नियंत्रण होऊन पुरामुळे होणारे नुकसान टाळले जाते. तसेच त्यांच्या पाण्याचा उपयोग शेती व पिण्यासाठी वर्षभर होतो. शिवाय त्यातून वीज निर्मितीही केली जाते.
            पूर्वी या धरणाच्या परिसरात ऐतिहासिक आणि मुख्यतः बौद्ध धर्मियांची शिल्पे, मूर्ती होत्या. त्यांचे जतन करण्यात यावे अशी मागणी धरण बांधण्यापूर्वी बौद्ध धर्मियांनी केली होती.  तिचा विचार करून धरणापासून अकरा किलोमीटर्सवर 'नागार्जून कोंडा' या उंचवट्यावर एक वस्तुसंग्रहालय बांधण्यात आले. आणि त्यात धरणाच्या परिसरातील शिल्पे, मूर्त्या, इतर महत्त्वाचे अवशेष गोळा करून ठेवण्यात आले आहेत.