डॉक्टर आनंदीबाई जोशी 

डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे ३१ मार्च १८६५ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नांव यमुना गणेश जोशी असे होते. लहानपणी त्या हूड स्वभावाच्या होत्या. त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे लहान असतानाच त्यांचे लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झाले. पोष्टमास्तर असलेल्या गोपाळरावांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांनी आनंदीबाईंना शिकवायचे ठरवले मुंबईला एका मिशनरी शाळेत आनंदीबाईंचे शिक्षण पूर्ण झाले.त्यानंतर स्वतः गोपाळरावांनी अमेरिकेत पत्रव्यवहार करून आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाचीही सोय केली. ७ एप्रिल १८८३ मध्ये आनंदीबाई पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाल्या.

अमेरिकेत जाताना व गेल्यावरही आनंदीबाईंना ख्रिश्चन बनवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला पण त्यांनी तो हाणून पाडला. अमेरिकनांचे अंधानुकरण न करता केवळ पोशाखात आवश्यक तेवढाच बदल त्यांनी केला. त्यांच्या वागण्यातील साधेपणा व बोलण्यातील गोडवा यामुळे अमेरिकेत त्यांना 'आनंदाचा झरा' हे नांव मिळाले होते. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासाबरोबरच वनस्पती शास्त्र आणि फ्रेंच व जर्मन भाषेचा अभ्यास करून तीन वर्षात एम. डी. ही पदवी त्यांनी संपादन केली. १६ नोव्हेंबर १८८६ रोजी त्या मुंबईला परत आल्या. अति श्रम, जेवणाची हयगय, व दुखणे अंगावर  काढण्याचा सोशिकपणा या कारणांमुळे त्यांची तब्बेत ढासळू लागली.  २६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांचे देहावसान झाले.त्या काळात अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.