आय व्ही एफ ( टेस्ट ट्यूब बेबी) 

            निसर्गनियमाप्रमाणेस्त्रीच्या अंडवाहक नलिकेत पुरूषाचे शुक्राणू आणि स्त्रीबीज यांची भेट होऊन फलधारणा होते. आणि मग पेशीविभाजनाने किमान शंभर पेशींचा विकसित गर्भ तयार होतो. नंतर तो अंडवाहक नलिकेतून गर्भाशयात उतरतो.गर्भाशय त्याचा स्विकार करते. आणि गर्भ तेथे मूळ धरू लागतो. यालाच आपण "गर्भधारणा" असे म्हणतो. पण स्त्रीची अंडवाहक नलिकाच कुचकामी असेल तर त्या स्त्रीला गर्भधारणा होणे शक्य नसते अशावेळी "आय. व्ही. एफ." तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. आयव्हीएफ म्हणजेच इनव्हिट्रो फर्टीलायझेशन. हे कृत्रिम गर्भधारणेचे तंत्र आहे. यामध्ये स्त्रीच्या बीजांडकोषातून स्त्रीबीज बाहेर काढले जाते. पुरुषाकडून शुक्रजंतू घेतले जातात. प्रयोग शाळेत स्त्रीबीज व शुक्रजंतू यांना एकत्र  आणले जाते. त्यानंतर स्त्रीबीजाचे फलन होते. तयार झालेला गर्भ चार ते पाच दिवस प्रयोगशाळेत वाढू दिला जातो. त्यानंतर तो गर्भाशयात सोडला जातो. गर्भाची पुढील वाढ गर्भाशयात होऊन बाळाचा जन्म होतो.
            या तंत्रानुसार जन्माला येणार्‍या बाळाचे पाच पालक असू शकतात. शुक्रजंतू देणारा पुरुष व स्त्रीबीज देणारी स्त्री या दोघांनाही डोनर म्हणतात.फलित बीजाला आपल्या गर्भात वाढवणारी जी स्त्री असते तिला सरोगेट माता म्हणतात. आणि बाळाच्या जन्मानंतर त्याचा सांभाळ करणारे मातापिता. अशा पाच जणांचे बाळाशी नाते असते.
            लंडनमधील रॉबर्ट एडवर्ड यांनी १९५० च्या दशकाच्या प्रारंभी या तंत्रज्ञान संशोधनास सुरुवात केली. पॅट्रिक स्टेपटो या स्त्रीरोगतज्ञानी त्यांना त्यामध्ये मोलाची साथ दिली. दोघांच्या अथक प्रयत्नांनी २५ जुलै १९७८ मध्ये पहिल्या टेस्ट ट्यूबबेबीचा जन्म झाला. तिचे नाव लुईस ब्राऊन. सन २००७ मध्ये लुईस ब्राऊन या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीने आपल्या अपत्याला नैसर्गिकरित्या जन्म दिला. आणि हे तंत्रज्ञान पूर्णतः सफल झाल्याचे ठरले. यामुळे टेस्टट्यूब बेबी या तंत्रज्ञानानुसार जन्माला येणार्‍या अपत्याच्या आरोग्य व आयुष्यमानाबद्दलच्या शंका दूर झाल्या. आणि या वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी रॉबर्ट एडवर्ड्स यांना सन २०१० चे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
           भारतात डॉ. सुभाष मुखोपाध्याय याच प्रकारच्या संशोधनात मग्न होते. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन ३ ऑक्टोबर १९७८ मध्ये दुर्गा म्हणजेच कनुप्रिया अगरवाल या टेस्टट्यूब बेबीचा जन्म कलकत्त्यामध्ये झाला. परंतु  डॉ.सुभाष मुखोपाध्याय यांना सरकारी पातळीवरून व समाजाकडून या संशोधनापासून रोखण्यात आले. आणि भारतातील पहिल्या आणि जगातील दुसर्‍या टेस्ट ट्यूब बेबीला जन्माला घालणार्‍या या डॉक्टरने १९८१ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर सन १९८६ मध्ये के इ एम इस्पितळात हर्षा छावडा या टेस्टट्यूब बेबीचा जन्म झाला. डॉ. अठाणी, रोप्रोडक्टिव्ह, बायोलॉजिस्ट डॉ. टी.सी. आनंद कुमार आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंदीरा आहुजा यांच्या टीमने  ही कामगिरी पार पाडली.