ब्लॅक बॉक्स 

            विमानाचे उड्डाण झाल्यापासून ते पुन्हा जमिनीवर उतरेपर्यंत विमानविषयक सर्व घडामोडींची नोंद ज्या पेटीत करण्यात येते. त्या पेटीला ब्लॅक बॉक्स अस म्हणतात. या पेटीला ब्लॅक बॉक्स असे म्हटले तेरी त्याचा रंग मात्र केशरी असतो. सन १९४४-४५ मध्ये डेव्हिड वॉरेन यांनी या यंत्राचा शोध लावला. विमान प्रवासातील संभाषणाची व त्तंत्रिक बाबींची संपूर्ण नोंद त्यामध्ये आपोआप होत असते. १९५० च्या सुमारास या ब्लॅक बॉक्सचा प्रथम वापर व्यावसायिक जेट विमानात करण्यात आला. पण आज सर्व विमानात तो बसवणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. कारण विमानाला जर अपघात झाला तर त्याची कारणमीमांसा या ब्लॅक बॉक्सच्या नोंदीवरून करता येते. तसेच विमान उड्डाणाची सुरक्षितता, विमानाच्या देखभालीविषयक सुधारणा, इंजिनचे कार्य यावरही संशोधन करता येते.
ब्लॅक बॉक्स मध्ये दोन प्रकारचे ध्वनिमुद्रण होते.
१) एफडीआर --> एफडीआर म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर. विमानाच्या बाजुला हा बसविलेला असतो. हवेचा वेग, विमानाचा यांत्रिक प्रवास, विमानाची दिशा, विमान किती उंचावरून चालले आहे, तापमान, कॉकपीट नियंत्रण, इंधनाचा प्रवाह, सर्व स्विचेसची कार्यक्षमता, विमान प्रवासातील अडथळे या सर्वांची नोंद एफडीआर मध्ये होते. विमानाच्या पुढच्या बाजुला असलेल्या फ्लाइट डेटा ऑक्विझिशन युनिटने गोळा केलेली माहिती सुद्धा एफडीआर कडे जाते.
२) सीव्हीआर -->  सीव्हीआर म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हा सुद्धा विमानाच्या शेपटीच्या बाजुला बसवलेला असतो. वैमानिकाच्या डोक्यावर मध्यभागी असलेला मायक्रोफोन, विमानातील इतर कर्माचार्‍यांच्या कानाला लावलेल्या उपकरणातील मायक्रोफोन यामुळे कर्मचार्‍यांतील संभाषण, इंजिनाचे आवाज, सावधगिरीचे इशारे, विमान खाली उतरताना होणारे गियरचे आवाज तसेच वैमानिक कक्षात होणारे आवाज सीव्हीआरमध्ये रेकॉर्ड होतात. याशिवाय विमानातळाच्या नियंत्रण कक्षाशी केलेले संभाषण, विमानतील कर्मचार्‍यांशी केलेले संभाषण, विमानाला दिली गेलेली हवामानविषयक माहिती व इशारे इत्यादी सर्व गोष्टींचे ध्वनिमुद्रण यात होते.
             विमानाच्या इंजिनाला जोडलेल्या विद्युत जनित्राकडून ब्लॅक बॉक्सला विद्युत पुरवठा केला जातो. पोलाद किंवा टिटॅनियमचे बाह्य आवरण, दुर्वाहक  पदार्थाचे दुसरे आवरण आणि आगप्रतिबंधक असे तिसरे आवरण अशा एकूण तीन आवरणांनी ब्लॅक बॉक्स बनवला जातो. या पेटीच्या वजनाच्या ३४०० पट वजनाचा आघात झाला तरी पेटी सुरक्षित रहाते. तसेच २६० अंश सेल्सिअस तापमानाचाही तिच्यावर कोणताच परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्स समुद्रात पडला तरी सुरक्षित राहिल अशीही त्याची रचना असते.