सर्प 

            संस्कृतमधील सृप या धातूपासून सर्प शब्द आला. सृप म्हणजे सरपटणे सर्प शब्दाचा अपभ्रंश होऊन सर्पाला साप म्हटले जाऊ लागले. इतर सरपटणार्‍या प्राण्यांपेक्षा सर्प पुष्कळ बाबतीत वेगळे आहेत. शरीरावर कौलांच्या शिलाईप्रमाणे एकमेकांवर बसवलेले खवले हे सर्पांचे वेगळेपण आहे. या खवल्यांमुळे सर्पांना भलमोठ भक्ष सहजपणे मिळवता येत. सर्पाच्या तोंडात असंख्य दात असतात. आणि या दातांच्या तीक्ष्णतेमुळे तसेच वक्रतेमुळे सर्पाच्या तोंडातून भक्ष सुटत नाही. नंतर दोन्ही जबड्यांची हालचाल क्रमाक्रमाने करुन तो पोटाच्या दिशेने ते पुढे ढकलतो. सर्पाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डोळ्यांना पापण्या नसतात. सर्पांचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पुढचे व मागचे पाय नसतात. आणि कोणत्याही पृष्ठवंशीय प्राण्यांना शक्य नसलेली हालचाल ते पायाशिवाय करतात. सर्पांना बाह्यकर्ण नसतात हे त्याचे चौथे वैशिष्ट्य. त्यामुळे त्याला आवाज समजत नाहीत. पण त्यांच्या ओठांकडील विशिष्ट पेशींव्दारे त्याला भुपृष्ठाकडून आलेल्या कंपनांचे ज्ञान होते. सर्पाला द्विविभाजी जीभ असते पण ती चव घेण्यापेक्षा वासाचे कण गोळा करण्यांचे काम प्रामुख्याने करते. सर्पाच्या शरीरात मणक्यांची संख्या तीनशे ते चारशे असू शकते. त्यामुळे त्याच्या शरीराला लवचिकता येते. व त्याला आपले शरीर हवे तसे वळवता येते. सर्पाला स्वेदग्रंथी नसतात. त्यामुळे तो उत्सर्जनयुक्त पदार्थ त्वचेबाहेर टाकू शकत नाही. म्हणून सर्प जसजसा मोठा होतो तसतसा शरीरावरची त्वचा तो काढून टाकतो. यालाच कात टाकणे म्हणतात. कात टाकण्यापूर्वी त्याच्या शरिरातून तेलकट पदार्थ स्त्रवतो. त्यामुळे कात व शरीर यांचा संबंध तुटतो. मग तोंडाकडची बाजू खडबडीत पृष्ठभागावर घासून तो कात हळूहळू वेगळी करतो.
            उबदार हवामानात आढळणार्‍या या प्राण्याला गवताळ किंवा पालापाचोळ्याची जागा जास्त आवडते. सर्प जसे जमिनीवर आढळतात; तसे खार्‍या व गोडया पाण्यातही ते रहातात. काही वेळा ते झाडावरही वास्तव्य करतात. काही साप बिळात रहाणे पसंत करतात. तर काही स्वतःला जमिनीत पुरुन घेतात.
            सर्पाचे रंग हे परिस्थितीनुसार असतात. मातीत रहाणारे सर्प तांबूस तपकिरी तर झाडावर रहाणारे हिरव्या रंगाचे असतात. नागसर्प पिवळसर रंगाचे असतात. तर मण्यार नावाचे सर्प काळसर असतात.
            उंदीर बेडूक यासारखे छोटे प्राणी, किटक हे सर्पाचे अन्न आहे. काहीवेळा सर्पच सर्पांना खातात.आपल्या वजनाच्या पंचवीस टक्के वजनाचे भक्ष सर्प सहज गिळून पचवू शकतो. त्याचा पाचक रस एवढा तीव्र असतो की त्यामध्ये केस, पिसे व खूर याव्यतिरिक्त सर्व तो पचवू शकतो. सर्पाचा खालाचा  व   व वरचा जबडा दोन वेगवेगळ्या हाडांनी तयार झालेला असतो. तसेच त्याच्या तोंडाची व गळ्याची त्वचा सैलसर असते. त्यामुळे सर्प आपले भक्ष गिळतो. तो अन्नाशिवाय काही महिने राहू शकतो.
            विषारी व बिनविषरी असे दोन प्रकारचे सर्प असतात. विषारी सर्पाच्या तोंडात विषदंत असतात. तोंड बंद असताना सापाचे दात आतल्या बाजुला वळलेले असतात. चावण्यासाठी तोंड उघडल्यावर दात उभे रहातात. विषदंत उभारल्यावर विषग्रंथीच्या स्नायूवर ताण पडून त्यातील विष पोकळ नलिकेतून विषदंताच्या टोकावर असलेल्या छिद्रातून बाहेर येते . सर्पाला भक्ष पकडण्यासाठी आणि पचवण्यासाठी सुद्धा विष उपयोगी ठरते.
            सर्प मुद्दाम कोणाच्या वाटेला जात नाही. उलट चाहूल लागताच दूर पळून जाण्याचीच त्याची वृत्ती असते. आणि ते शक्य नसले तरच तो प्रतिकाराचा पवित्रा घेतो. सर्प एक लाजरा बुजरा, घाबरटच प्राणी आहे. पण त्याच्या विषाला मनुष्य उगाचच घाबरतो.
            घार, गिधाड, गरुड, बहिरी ससाणा, मुंगुस हे सर्पाचे शत्रू आहेत. ते सर्पाना मारुन खातात.