चक्रवर्ती राजगोपालाचारी 

            ८ डिसेंबर १८७८ रोजी मद्रासमधील थोरापल्ली या लहानशा गावी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्म झाला. सारे त्यांना 'राजाजी' या नावाने ओळखत. इंग्रजी भाषेवर प्रभूत्त्व आणि तल्लख बुद्धिमत्ता असलेले राजाजी निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. सार्वजनिक कार्याची त्यांना आवड होती.
             लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे राजाची काँग्रेस चळवळीकडे वळले. महात्मा गांधीजींच्या भेटीनंतर राजाजींनी असहकार व सत्याग्रह या तत्त्वांचा पुरस्कार केला; आणि वकिली सोडून ते असहकार चळवळीत सामील झाले. स्वातंत्र्यासाठी गांधीजींचे जवळचे सहकारी म्हणून ते पूर्णवेळ काम करु लागले. खादीचा प्रचार, जातीय ऐक्य, राष्ट्रीय शिक्षण, अस्पृश्यता निवारण, दारुबंदी हा गांधीजींचा कार्यक्रम त्यांनी मद्रास मध्ये राबविला.
           सन १९३६ मध्ये ते मद्रासचे मुख्यमंत्री झाले. आणि एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांची ख्याती झाली. दारुबंदी कायदे, अस्पृश्यांना मंदिरात खुला प्रवेश मिळवून देणारा कायदा असे लोकहिताचे कायदे त्यांनी प्रथमच केले.
            सन १९४६ मध्ये पंडित नेहरुंच्या नेतृत्त्वाखाली अस्तित्त्वात आलेल्या हंगामी सरकारमध्ये राजाजींचा समावेश करण्यात आल होता. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर पश्चिम बंगालच्या राज्यपालपदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांची कर्तबगारी लक्षात घेऊन २१ जून १९४८ रोजी त्यांना सर्वोच्च अधिकाराचे गव्हर्नर जनरल पद बहाल करण्यात आले. नंतर २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक भारताची पहिली घटना अमलात आली; तेव्हा हे गव्हर्नर जनरलचे पदच रद्द झाले. त्यानंतर सरदार पटेल यांच्या निधनानंतर राजाजींकडे गृहखात सोपवण्यात आल. सन १९५२ मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.
             चक्रवर्ती राजगोपालाचारी जसे राजकारणी होते; तसे थोर तत्त्वचिंतक आणि उत्कृष्ट लेखकही होते. तमिळ भाषेत तीस- पस्तीस ग्रंथ लेखन करणार्‍या राजाजींना सन १९५८ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. राजाजींनी इंग्रजीमध्ये कथारुपाने लिहिलेल्या रामयण तसेच महाभारत या ग्रंथांना जगन्मान्यता मिळाली. राजाजींनी भारतीय संस्कृती, हिंदूधर्म, उपनिषद, गांधीजींची शिकवण, मार्कस ऑरिलियसचे तत्त्वज्ञान इत्यादी विषयांवरही ग्रंथलेखन केले.
            भारत सरकारने भारतरत्न देऊन गौरविलेल्या राजाजींचे २५ डिसेंबर १९७२ रोजी निधन झाले.