लाला लजपतराय 

            पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील जगराव गावी २८ जानेवारी १८६५ मध्ये लाला लजपतराय यांचा जन्म झाला. स्वामी दयानंद सरस्वती यांचे अनुयायी असलेले राधाकृष्ण लजपतराय हे लालाजींचे वडील. राधाकृष्ण जगरावच्या शाळेत शिक्षकाची नोकरी करत. ते चांगले लेखकही होते.
            लालाजींनी वकिलीची परीक्षा देऊन हिस्सार या शहरात वकिली सुरु केली. लालाजींवर  आर्यसमाजाच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे आर्य समाजाच्या अस्पृश्यता निवारण कार्यात ते सहभागी झाले होते. आपले मित्र लाला हंसराज यांच्या सहकार्यानी त्यांनी लाहोर शहरात 'दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज' ची स्थापना केली. अनेक ठिकाणी शाळाही उघडल्या. विद्यार्थ्यांना इंग्रजीबरोबर संस्कृत, हिन्दी, उर्दू अशा भाषा शिकता याव्यात, विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, शिक्षणातून देशाभिमान विद्यार्थ्यांत निर्माण व्हावा, तरुणांमधून निष्ठावान समाजसेवक तयार व्हावेत हा त्यांचा उद्देश होता.
            'वंदेमातरम' नावाच्या वृत्त्पत्रातून तसेच 'पंजाबी' नावाच्या वृत्तपत्रातून ते आपले विचार व्यक्त करीत असत. त्यांच्या लेखणीने लोकजागृतीचे कार्य केले. लालाजींनी 'पीपल' नावाच नियतकालिक सुरु केल. इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असल तरी लालाजींनी आपल बरचस लेखन उर्दूमध्ये केल आहे. 'महान अशोक', 'श्रीकृष्ण व त्याची शिकवण', 'छत्रपती शिवाजी', 'मॉझिनी' , 'गॅरिबाल्डी' इत्यादी पुस्तक त्यांनी लिहिली त्यांच 'यंग इंडिया' हे पुस्तक फारच गाजल.
           लाला लजपतराय यांनी 'होमरुल लीग' ची स्थापना केली. 'सर्व्हंट्स ऑफ पीपल सोसायटी' नावाच्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेची स्थापनाही लालाजींनी केली.
ऑक्टोबर १९२८ मध्ये सायमन कमिशनच्या निषेधाच्या मिरवणुकीत ते सामील झाले होते. त्यावेळी झालेल्या लाठीहल्ल्यात ते जबर जखमी झाले आणि १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांच निधन झाल.
            पंजाबचा हा सुपुत्र 'पंजाब केसरी' नावाने अमर झाला.