पंडित जवाहरलाल नेहरु 

            १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे एका संपन्न विद्वान कुटुंबात जवाहरलाल नेहरुंचा जन्म झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरु एक प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ होते. त्यांची आई स्वरुपराणी ही आपल्या पतीबरोबर स्वातंत्र्यलढात भाग घेत असे. पंडित नेहरुंच प्राथमिक शिक्षण त्यांच्या घरातच झाल. त्यानंतर लंडनमधील 'हॅरो' च्या प्रसिद्ध शाळेत ते गेले तेथून केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी शास्त्र विषयात पदवी मिळवली आणि पुढे बॅरिस्टर होऊन ते भारतात आले.
           आपल्या देशासाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेले पंडित नेहरु गांधीजींच्या विचारांकडे आणि कार्याकडे आकृष्ट झाले. आणि १९२१ च्या असहकार चळवळीत ते सामील झाले. सन १९२९ ला लाहोर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या कल्पनेचा त्यांनी आग्रह धरला. लाहोर ३१ डिसंबर १९२९ च्या मध्यरात्री रावी नदीच्या तीरावर जवाहरलालजींनी चरखांकित तिरंगा मोठ्या समारंभपूर्वक फडकवला होता. पुढे १९४६ मध्ये पंडितजींच्या नेतृत्त्वाखाली 'हंगामी सरकार'ची स्थापना करण्यात आली. १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून देशाची सूत्र हाती घेतली  सन १९६४ पर्यंत ते भारताचे प्रधानंत्री होते.
            भारताला सर्वार्थाने आधुनिक करण्याचा पाया जवहरलाल नेहरुंनी घातला. वैज्ञानिक संशोधनासाठी राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. पंचवार्षिक योजनातून स्वावलंबी औद्योगिक विकासाची प्रक्रिया सुरु केली. भारताच स्वातंत्र्य, समृद्धी आणि प्रगती यासाठी पंडित नेहरु आयुष्यभर झटले. भारतीय परंपरेविषयी त्यांना आदर व अभिमान होता. भारताच्या इतिहासावर त्यांच नितान्त प्रेम होत. 'द डिस्कव्हरी ऑफ इंडिया' आणि 'ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
           पंडित नेहरू मानवतेचे महान उपासक होते. जागतिक शांततेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. जग त्यांना 'शांति दूत' म्हणूनच  ओळखते. लहान मुलं पंडित नेहरुंना फार आवडत. त्यांच्यात वावरताना ते लहानाहून लहान होत. मुल त्यांना 'चाचा नेहरु' अस म्हणत. 'मुल हा राष्ट्राचा अमोल ठेवा आहे. तो प्राणपणांने जपला पाहिजे.' असेच ते म्हणत. पंडितजींचे विवेकशील क्रांतीकारी विचार तरुणांना  प्रभावी करत. तरुणांचे ते लाडके स्फूर्तिदायी नेते होते. युवाशक्ती राष्ट्रकार्याला लावण्यात पंडितजींनी सिंहाचा वाटा उचलला. शतकानुशतकाच्या अज्ञानातून व दारिद्र्यातून भारत देशाला वर काढण्याच व्रत घेतलेल्या आधुनिक भारताच्या या शिल्पकाराचा गौरव 'भारतरत्न' या किताबाने करण्यात आला.
           मुलांत मूल होऊन रमणारे, तरुणांसारखे संवेदनाक्षम असणारे, विचाराने व बुद्धिने वृद्धासारखे परिपक्व असणारे माते सारखे सहृदय व करुणाक्षम असणारे पंडित जवाहरलाल नेहरू २७ मे १९६४ रोजी अनंतात विलिन झाले.