आपला राष्ट्रध्वज 

            १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या हल्लीच्या ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. त्यागाच प्रतिक असलेला केशरी केसरी रंग सर्वात वरच्या बाजुला, , शांतीच प्रतिक असलेला पांढरा रंग मध्यभागी, व खाली समृद्धिच प्रतिक म्हणून हिरवा रंग.या शिवाय मध्यभागाच्या  पांढर्‍या रंगावर २४ आरे असलेले अशोकचक्र, असा आपला राष्ट्रध्वज आहे. भारतीय मानक संस्थेने आपल्या राष्ट्रध्वजासाठी पहिले मानक तयार केले. त्याचा क्रमांक आय. एस.:१:१९६८.
           या मानकानुसार एकूण नऊ प्रकारच्या आकारांना अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे. ते आकार खालीलप्रमाणे आहेतः
१) ६३०० x ४२०० मि.मी.२) ३६०० x २४०० मि.मी.३) २७०० x १८०० मि.मी.४) १८०० x १२०० मि.मी.
५) १३५० x ९०० मि.मी.६) ९०० x ६०० मि.मी.७) ४५० x ३०० मि.मी.८) २२५ x १५० मि.मी.
९) १५० x १०० मि.मी.
या नऊ आकारांपैकी काही आकार विशिष्ट उपयोगासाठी वापरण्यास परवानगी दिलेली आहे.
१) ४५० x ३०० मि.मी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या विमानांवर लावण्यासाठी.२) २२५ x १५० मि.मी. मोटारींवर लावण्यासाठी.३) १५० x १०० मि.मी. टेबलावर लावण्यासाठी, व कार्यालयीन उपयोगासाठी.
खालील नमूद केलेल्या दिवशी देशभरात कोणालाही राष्ट्रध्वज वापरता येईलः
१) २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन.२) १५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन.३) २ ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती.
४) एखाद्या राज्याच्या स्थापनेचा दिवस. महाराष्ट्रासाठी १ मे.५) ६ ते १३ एप्रिल जालियनवाला बागेतील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ.६) भारत सरकारने जाहीर केलेला इतर कोणताही राष्ट्रीय उत्सवाचा दिवस.
७) शाळा, कॉलेजेस, क्रीडा शिबिरे, स्काऊट गाईडस यांच्या छावण्या यासारख्या प्रसंगी राष्ट्रध्वजाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण करण्यासाठी वापरता येईल.
८) एखाद्या स्थानिक उत्सवासाठी सरकार अशी परवानगी देऊ शकते. परंतु सर्वत्र राष्ट्रध्वजाचा मान व आदर राखला गेला पाहिजे.
राष्ट्रध्वज लावण्याबद्दलचे संकेत खालीलप्रमाणे आहेत :
१) राष्ट्रध्वज सन्माने आणि ठळक जागी लावला पाहिजे.
२) सरकारी इमारतींवर नेहमीच राष्ट्रध्वज लावला जातो. तेथे तो सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्थंत असला पाहिजे. तसेच तो रविवार आणि इतर रजेच्या दिवशीही लावलाच पाहिजे. काही विशेष प्रसंगी रात्रीही राष्ट्रध्वज लावला जातो.
३) राष्ट्रध्वजाचे आरोहण करताना तो झरझर वर चढवला पाहिजे तर उतरवताना हळूहळू उतरवला पाहिजे.
४) राष्ट्रध्वजाचा केशरी रंग नेहमी वर असला पाहिजे. पण जर राष्ट्रध्वज आडवा लावला तर केशरी रंग उजवीकडे पाहिजे.
५) रस्त्यावर राष्ट्रध्वज लावताना रस्त्याच्या मध्यभागी उभा लावला पाहिजे. आडवा लावल्यास (सोडल्यास) पूर्व- पश्चिम रस्त्यावर त्याची केशरी बाजू उत्तरेकडे; तर दक्षिणोत्तर रस्त्यावर त्याची केशरी बाजू पूर्वेकडे असली पाहिजे.
६) व्यासपीठावरील राष्ट्रध्वज वक्त्याच्या उजव्या बाजूस आणि वक्त्याच्या उंचीच्या वर असला पाहिजे.
७) कारवर लावलेला राष्ट्रध्वज कारच्या बॉनेटवर मध्यभागी, पुढील बाजूस पक्का लावलेला असला
पाहिजे.
८) मिरवणूकीत तो अग्रभागी उजव्या बाजूस असला पाहिजे.
वाहनांवर राष्ट्रध्वज लावण्याबाबतः
१) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, ले. गव्हर्नर, पंतप्रधान, केंद्रिय मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री, राज्याचे व केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच उपमंत्री, लोकसभेचे सभापती, अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपसभापती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आपल्या वाहनांवर राष्ट्रध्वज लावू शकतात.
२) परदेशी पाहुणे जर सरकारी वाहनातून प्रवास करत असतील तर वाहनांच्या उजव्या बाजूस राष्ट्रध्वज तर डाव्या बाजूला त्यांच्या देशाचा ध्वज लावतात.
३) राष्ट्रपती रेल्वेने प्रवास करत असतील तर वाहकाच्या कॅबिनवर ध्वज लावतात.
४) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, परदेश दौर्‍यावर असतील, तर त्यांच्या विमानावर राष्ट्रध्वज लावला जातो.
काही वेळा अनेक देशांचे राष्ट्रध्वज एकत्र लावले जातात. त्या वेळी:
१) आपला तिरंगा राष्ट्रध्वज सर्वात उजवीकडे लावला जातो. इतर देशांचे ध्वज त्या देशांच्या नावांच्या इंग्रजी वर्णाक्षराप्रमाणे त्यानंतर लावले जतात.
२) जेव्हा वर्तुळात ध्वज लावले जातात, तेव्हा त्याची सुरुवात राष्ट्रध्वजाने केली जाते. त्यानंतर घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेप्रमाणे इतर देशांचे ध्वज इंग्रजी वर्णक्षराप्रमाणे लावले जातात.
३) राष्ट्रध्वज जेव्हा भिंतीवर लावले जातात तेंव्हा राष्ट्रध्वज उजव्या हाताला राहिल; व त्याची काठी वरच्या बजूला राहिल याची काळजी घेतली जाते.
४) राष्ट्रसंघाचा ध्वज मात्र राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही अंगाला लावला तरी चालू शकतो.
५) आंतरराष्ट्रीय संकेताप्रमाणे सर्व राष्ट्रध्वजांची उंची समानच असली पाहिजे. कमीजास्त असून चालणार नाही.
६) एकाच राजदंडावर अनेक ध्वज लावता येत नाहीत. प्रत्येक ध्वजासाठी स्वतंत्र राजदंड आवश्यक आहे.
७) परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी कागदी ध्वज वापरता येतात;. पण त्यांचा अनादर होऊ देऊ नये.
८) सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट महोत्सवसारख्या विशिष्ट कार्यक्रमांसाठी सरकारी परवानगीने राष्ट्रध्वज लावता येतो.
खाजगी इमारतींवर काही विशिष्ट दिवशीच राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी असते. परंतु सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज कायम लावला जातो. ती स्थाने सर्वसाधारणपणे  अशी आहेत:
१) उच्च न्यायालय, २) मंत्रालय, ३) आयुक्तालय, ४) जिल्हाधिकारी कार्यालय, ५) जिल्हा परिषद, ६) नगरपलिका, ७) तुरुंग. परंतु सीमावर्ती भागातील चेकपोस्ट, आऊटपोस्ट इ. ठिकाणीही तो लावला जातो.
निवासस्थानी राष्ट्रध्वज लावण्याचे संकेतः
१) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, ले. गव्हर्नर यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज लावला जातो. परंतु ज्या वेळी त्या व्यक्ती दौर्‍यावर असतील त्या वेळी तो ध्वज ते जेथे उतरले असतात त्या निवासस्थानी लावला जातो. तोसुद्धा फक्त त्यांच्या निवासकाळापुरताच असतो. त्यांनी निवासस्थान सोडल्यानंतर तो उतरवला जातो.
२) परदेशातील वकिलातीत राजदूतांच्या निवासस्थानी लावला जातो. प्रत्येक राष्ट्राचे संकेत भिन्न असू  शकतात.
३) जेव्हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, एखाद्या संस्थेला भेट देतात तेव्हा त्यांना मान देण्यासाठी असा ध्वज लावला जातो.
४) परदेशांचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राजे वा राजपुत्र इ. महत्त्वाच्या व्यक्ती भारतात येतात तेव्हा किंवा एखाद्या संस्थेला भेट देतात तेव्हा त्या राष्ट्राच्या ध्वज आपल्या ध्वजाबरोबर लावला जातो.
काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनानंतर राष्ट्रध्वज  अर्ध्यावर उतरवला जातो:
१) भारतात सर्व ठिकाणी : राष्ट्रपती उपराष्ट्रपती, पंतप्रधान.
२) फक्त दिल्ली येथे लोकसभेचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, केंद्रिय राज्यमंत्री, उपराज्यमंत्री.
३) दिल्ली व राज्याची राजधानी : केंद्रिय मंत्री.
४) त्या राज्याची राजधानी : राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यातील मंत्री, संघराज्याचे मुख्यमंत्री. त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी जर दुपारनंतर कळली आणि त्या रात्रीच अंत्यविधी होणार नसेल, तर दुसर्‍या दिवशी व दुखवटी जाहीर झाला असेल, त्या काळापुरता ध्वज अर्ध्यावर उतरवल जातो. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट इ. सारख्या महत्त्वाच्या दिवशी फक्त मृतदेह ठेवलेला असेल त्याच इमारतीवरील ध्वज अर्ध्यावर  उतरविला  जातो. मृतदेह इमारतीबाहेर नेल्यावर ध्वज परत चढवला  जातो ध्वज आणण्यापूर्वी ध्वज पूर्णपणे वर चढवून मग अर्धा किंवा पूर्ण उतरावयाचा असतो.
सरकारी किंवा लषकरी इतमामात अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेह तिरंगी झेंड्याने आच्छादिला जातो. तेव्हा केशरी रंग डोक्याच्या बाजुला असावा.
अंत्यविधीपूर्वी ध्वज काढून घेतला जातो.
न करण्याजोग्या गोष्टी:
१) फाटलेल्या, चुरगळलेल्या किंवा डाग पडलेला राष्ट्रध्वज लावू नये.
२) केशरी रंग खाली करून लावू नये.
३) राष्ट्रध्वजावर कोणतीही चिन्हे, अक्षरे नसावीत.
४) राष्ट्रध्वज पोशाखांचा भाग म्हणून, कपडे, रुमाल इ. तसेच भरतकाम करून किंवा आच्छादन टेबलक्लॉथ वगौरेंसाठी वापरू नये.
५) कोणाच्याही सन्मानार्थ किंवा मानवंदनेचा भाग म्हणून राष्ट्रध्वज खाली आणू नये.
६) इतर कोणताही ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच जागी लावू नये.
७) ध्वजदंडाच्या टोकावर ( ध्वजाच्या वरील भागी ) फुले, हार, चिन्हे वगैरे गोष्टी लावू नयेत.
८) ध्वजस्तंभाचा उपयोग जाहिरातीसाठी करु नये.
९) राष्ट्रध्वजाचा वापर शोभेची वस्तू म्हणून केला जाऊ नये.
१०) राष्ट्रध्वजाच्या सारखी रंगसंगती करून कपडे वापरण्यास बंदी आहे.
११) फक्त सरकारी व लष्करी इतमामात अंत्यविधीपुरताच राष्ट्रध्वज आच्छासनासाठी वापरता येईल. इतर कोणत्याही कामासाठी राष्ट्रध्वजाचा वापर अच्छादन ( शरीर वा वस्तू ) म्हणून वापरता येणार नाही.
१२) राष्ट्रध्वज किंवा त्याच्या प्रतिकृती यांचा वापर व्यापार, धंदा, जाहिराती यांसाठी वापरणे हा 'गौरवचिन्हे व नावाचा गैरवापर कायद्याखाली गुन्हा आहे.
१३) सार्वजनिक वा खाजगी ठिकाणी राष्ट्रध्वजाचा लिखित वा तोंडी शब्दांनी किंवा कृतींनी केलेला अपमान हा 'राष्ट्रीय सन्मानकांचा अपमान करणारा प्रतिबंधक कायदा १९७१' अन्वये दंडनीय गुन्हा आहे.
१४) राष्ट्रध्वज खराब झाल्यास तो खाजगीरीत्या संपूर्ण जाळून नष्ट केला पाहिजे. परंतु त्या वेळीसुद्धा  त्याचा सन्मानच राखला पाहिजे.