सर जमशेदजी जीजीभॉय 

            १५ जुलै सन १७८३ मध्ये जमशेदजींचा जन्म मुंबई मध्ये झाला. जमशेदजींच्या वडिलांचे नाव जीजीभॉय आणि आईचे नाव जीवाबाई होते. जीजीभॉय व्यवसायाने वीणकर होते. घरच्या गरिबीमुळे जमशेदजी गुजराथ मध्ये नवसारी येथे शिक्षणासाठी राहिले. तेथे गुजराथी, इंग्रजी  या भाषा व हिशेब ठेवण्याच काम ते शिकले. परंतु जमशेदजी १६ वर्षाचे असतानाच आई व वडिल दोघांचाही मृत्यू झाला.
            जमशेदजींच्या मामानी त्यांना आपल्या रिकाम्या बाटल्या विकायच्या धंद्यात सामावून घेतल. आणि जमशेदजी मुंबईला मामाच्या दुकानात बसून बाटल्या विकू लागले. वयाच्या सतराव्या वर्षी आपल्या चुलतभावाबरोबर ते व्यापारानिमित्त चीनला गेले आणि त्यांनी धंद्याच कौशल्य आत्मसात केले. त्याचवेळी चीनी  व्यापार्‍यांशी चांगले व्यापारी संबंध प्रस्थापित करून सन १८०१-१८०२ या काळात चीनशी व्यापार सुरु केला. चीनला अफू व कापूस पुरवायचा व त्या बदल्यांत चांदी व रेशीम घ्यायचे असा त्यांचा व्यापार चालत  असे.
            सन १८०३ मध्ये अवाबाईंशी त्याचा विवाह झाला. धंद्यातील सचोटी, प्रामाणिकपणा, कुशाग्रबुद्धी, दूरदृष्टी व धाडसी वृत्ती या गुणांमुळे चिनी व्यापार्‍यात त्यांना मानाचे स्थान होते. पुढे मद्रास, कलकत्ता, सिंगापूर, सयाम, मलाया, इजिप्त, इग्लंड मधील व्यापारी संस्थांबरोबर ते व्यापार करू लागले. व्यापारासाठी पाचवेळा ते चीन प्रावासाला गेले. त्यांच्या अफुच्या व्यवसायात बराच नफा मिळाला तरी जहाजाच्या भाड्यासाठी खूप पैसा खर्च होतो; हे त्यांच्या लक्षात आल.
           सन १८१४ मध्ये त्यांनी मध्ये त्यांनी 'गुड सक्सेस' नावाच पहिल जहाज खरेदी केल. त्यानंतर 'बहरामगोर', 'बॉम्बे कॅसल', 'चॅरलोट', 'फोर्ट विलिमय', मार अननिमा', 'लानरिक' इत्यादी जहाज विकत घेतली. परदेशात कापसाच्या गासड्या पोचवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ लागला. आणि नफाही पुष्कळ मिळाला.
            'जमशेदजी जीजीभॉय सन्स अ‍ॅण्ड कंपनींचे मालक असलेल्या जमशेदजीनी समाजाहिताची अनेक कामे केली. आग, पूर, दुष्काळ अशा संकटाच्यावेळी ते मदतीचा हात पुढे करीत. अनेक नामांकित पदांवर त्यांची नियुक्ती  करण्यात आली होती. त्यांच्या कार्याची प्रशंसा म्हणून व्हिक्टोरीया राणींने सन १८४२ मध्ये त्यांना 'सर' ही पदवी दिली तसेच १८५७ मध्ये 'उमरावपद' ही बहाल केले. १५ एप्रिल १८५९ रोजी जमशेदजींनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या कार्याचा आढावा थोडक्यात पुढील प्रमाणे -
१) मुंबईतील माहिम येथील 'लेडी जमशेदजी रोड' बांधण्यास अनुदान दिले.
२) १८३७ मधील सुरतमध्ये लागलेल्या आगीच्यावेळी, तसेच १८३२ मध्ये कटक मधील दुष्काळग्रस्तांसाठी सढळ हस्ते मदत केली.
३) 'द बॉम्बे समाचार' वृत्तपत्र स्थापनेसाठी मदत केली. तसेच आताचे 'द टाइम्स ऑफ इंडीया'  वृत्तपत्र , 'जाम- ए जमशेद' वृत्तपत्र यांना आर्थिक मदत केली.
४) मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता.
५) पुण्यांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी १ लाख ३४ हजार ३५९ रुपये एवढा खर्च उचलला.
६) १८२२-१८३८ च्या दरम्यान मुंबईच्या ठाकूरद्वार परिसरात कुरण विकत घेऊन गुरांसाठी, पांजरपोळ बांधले.
७) जे.जे. रुग्णालय बांधण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
८) शिक्षण प्रसारासाठी त्यांनी "सर जमशेदजी जीजीभॉय  पारसी बेनेवोलेंट"ला मदतीचा हात दिला आणि अलिबाग व फोर्ट ऑफ बॉम्बेच्या पलिकडे दोन मुलींच्या शाळा काढल्या.
९) १८५७ मध्ये जमशेदजींनी दिलेल्या अनुदानातून जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स सुरु झाले.