राम गणेश गडकरी 

           २६ मे १८८५ मध्ये गुजराथ राज्यात नवसारी येथे राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला. केवळ सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलेल्या रामचे आयुष्य अनेक दु:खद घटनांनी भरलेले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. मग या गडकरी कुटंबाने पुण्यात स्थायिक होणे पसंत केले. कर्जतजवळ 'वाकस' हे त्यांचे मूळ गाव. पण राम गणेश गडकरी यांचा उत्कर्ष झाला तो पुण्यातच. राम गणेश गडकर्‍यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले.
            कॉलेजमध्ये असतानाच मित्राच्या ओळखीने किर्लोस्कर नाटक मंडळीत ते दाखल झाले व तेथील मुलांना शिकवण्याचे काम करू लागले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालू केलेल्या 'रंगभूमी' नावाच्या मासिकात व शिवराम परांजपे यांच्या 'काळ' नावाच्या वर्तमानपत्रात  तसेच  हरीभाऊ आपटे यांच्या 'करमणूक'  मध्ये ते कविता, लेख लिहू लागले. पुढे  ते नाट्यलेखनही करू लागले. सन १९११ मध्ये त्यांनी 'प्रेमसंन्यास' हे नाटक लिहिले. रामगणेश गडकरी यांची 'पुण्यप्रभाव', 'एकच प्याला ', 'भावबंधन', 'राजसंन्यास' ही नाटकेही खूप गाजली.
            रामगणेश गडकरी नावाच्या या थोर नाटक़काराने 'गोविंदाग्रज' नावाने कविता लेखनही खूप केले. 'शार्दुलविक्रिडित' हे त्यांचे आवडते वृत्त असले तरी गडकर्‍यांनी अनेक वृत्तात आपल्या कविता लिहिल्या आहेत. अफाट कल्पना शक्ती, नादमधूर शब्द, सुभाषितवजा वाक्ये, आशय संपन्नता, अचूक वर्णनशैली ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य म्हणावी लागतील. त्यांच्या काव्यात कारुण्य आहे; तसा विनोदही आहे. उपहास आहे; तसा उपरोधही आहे. त्यांच्या कवितांनी जीवनातील उत्कट उदात्तते इतकेच क्षुद्र सामान्यांचेही दर्शन घडविले. सन १९०१ पासून त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत ते लेखन करीतच राहिले. आकर्षक स्वरुपात सादर केलेल्या त्यांच्या कविता त्यांच्या मृत्यूनंतर सन १९२१ मध्ये 'वाग्वैजयंती' या काव्यसंग्रहात एकत्रित करण्यात आल्या.
            राम गणेश गडकरी या नावाने नाटके लिहिणार्‍या, गोविंदाग्रज नावाने काव्यलेखन करणार्‍या या प्रतिभावंत साहित्यकाराने 'बाळकराम' या नावाने विनोदी लेखनही केले, सुरुवातीला 'मनोरंजन' नावाच्या मासिकात ' रिकामपणची कामगिरी' सारखे विनोदी लेखन ते करू लागले होते. तेंव्हा ते 'नाटक्या', 'सावाई नाटक्या' या टोपण नावांनी लेखन करत असत.'संपूर्ण बाळकराम' या पुस्तकात त्यांचे विनोदी लेखन संकलित केले गेले आहे. 'एकच प्याला', 'भावबंधन' या नाटकांमधील बळीराम व धुंडीराज यांच्यामार्फत त्यानी विनोद प्रकट केला आहे. गंभीर आशय आणि वैचारिक विवेचनाला विनोदाची झालर लावण्याची हातोटी  त्यांना साधली होती. त्यांच 'ठकीच लग्न'ही खूप गाजल. आपल्या विनोदात गडकर्‍यांनी अतिशयोक्ती तसेच वक्रोक्तीचाही वापर केला आहे.
            आपले सर्वच लेखन लोकप्रिय बनवणार्‍या या थोर साहित्यिकाने निष्कांचन अवस्थेत २३ जाने १९१९ मध्ये या जगाचा निरोप घेतला.