कलमकारी चित्रकला - एक भारतीय कला 

            भारतीय मंदिरांमुळे आपल्याला भारतातील प्राचीन कलांची माहिती मिळते. मग ते नृत्य असो चित्र असो वा शिल्प. अशीच दक्षिण भारतातील मंदिर कलेशी निगडीत कला म्हणजे कलमकारी चित्रकला. कलमकारी ही मुख्यतः आंध्रप्रदेशाची कला आहे. ही लोककला लेखणीसदृश कुंचल्याव्दारे कापडावर सिध्द होते.
            बर्‍याचदा वाचनाच्या अभावाने अथवा, वरवर मिळालेल्या माहितीव्दारे आपण आपल्याच देशाच्या वैशिष्टयांबददल अथवा महतीबददल गैरसमज करुन घेतो. याचे उदाहरण म्हणजे कलमकारी चित्रकला. कलमकारी या नावमुळे ही कला अरबी अथवा तुर्की वाटते. तुर्कीमध्ये कलमकारी म्हणजे लेखणीकाम. ही कला मुस्लिम आक्रमणाव्दारे भारतात आली, असा आपला एक कटूगैरसमज आहे. परंतु तो दूर करण्यासाठी अनेक 'पुरावे' उपलब्ध आहेत. कलमकारी ही कापडावर रेखाटण्यात येणारी कला आहे. हिचे भारतीय नाव आहे 'चित्रवस्त्र'.
१) महाभारत या ग्रंथात या चित्रवस्त्रांचा उल्लेख आहे. 'प्रथम चित्रे  नाजूक रेषांनी काढून मग त्यात रंग भरले जातात. ' असे त्याचे वर्णनही केले आहे.
२) महाभारतास भारताचा ऐतिहासिक कालखंड न मानणार्‍यांसाठी इतरही ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत.
           जसे हडप्पा - मोहेंजोदारोच्या उत्खननात या चित्रवस्त्रांचे अवशेष सापडले आहेत. ही शहरे अर्थात मुस्लिम आक्रमणांआधीची आहेत.
३) इजिप्तच्या उत्खननात भारतीय धाटणीच्या नक्षीचे साचे व वस्त्रांचे तुकडे सापडले आहेत.
४) ह्या वस्त्रांचा व्यापार इजिप्त व ग्रिसमध्ये मोठयाप्रमाणावर होत असे. ग्रिसमध्ये ख्रिस्तपूर्व काळापासून हे कपडे प्रसिध्द असल्याचे पुरावे सापडले आहेत.
५) अजिंठा - वेरुळमधील काही भित्तीचीत्रेही हयाच धाटणीची होती. परंतु भारतीय दमट हवामानामुळे त्यांचे जतन होऊ शकले नाही.
६) बाह्य देशांशी होणार्‍या व्यापाराबददलचा पहिला उपलब्ध 'दस्तावेज' पहिल्या शतकातील आहे. तो मसुलीपट्टणमच्या कलाकारांनी केलेल्या व्यापाराबाबत आहे.
          असे असले तरी कलमकारीबाबतच्या गैरसमजाचे मुळ हे तिच्या ऐतिहासिक नोंदणीत आहे. ह्या कलेची पहिली नोंद ही १६६५ सालातील गोवळकोंडास्थित मुस्लीम कारागिरांवर आधारित आहे. 'फेंच प्रवासी ' फँकाईस बर्निअर ' याने ही नोंद केली आहे. 'त्याकाळातील मुस्लीम चित्रकारांनी लेखणीने कापडावर सिध्द होणार्‍या या कलेला 'कलमकारी' असे नाव दिले होते. दिर्घकालीन मुघल व तदूनंतर इंग्रजांच्या राजवटीमुळे हे नाव पुढे रुढ झाले.