अगाथा ख्रिस्ती 

इंग्रजी साहित्यात 'रहस्य कथांची सम्राज्ञी म्हणून अगाथा ख्रिस्ती यांना ओळखले जाते. जगातील सर्वात लोकप्रिय  लेखिकेचा जन्म इंग्लंडमधील टॉरक्वाय   या   ठिकाणी   १५   सप्टेंबर   सन   १८९०   मध्ये  झाला.  एकत्र  कुटुंबात  जन्मलेल्या  अगाथाचे शिक्षण  घरच्या घरीच झाले.

त्या पियानो उत्तम वाजवित असत. 'द मिस्टिरियस अफेअर अ‍ॅट स्टईल्स' ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी. त्यातील 'हर्क्युल पॉवरो' ही व्यक्तीरेखा खूपच गाजली. त्यानंतर त्यांनी ७८ रहस्यमय कादंबर्‍या, १५० लघुकथा लिहिल्या. 'एरीवस्टम कोट' या टोपण नावानेही त्यांनी सहा कादंबर्‍या, २० नाटके, आणि चार अन्य पुस्तके लिहिली.त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद शंभराहून अधिक भाषांत प्रसिद्ध झाले. त्यांच्या कादंबर्‍यांवर अनेक चित्रपटही निघाले.मुळातच श्रीमंत असलेल्या या लेखिकेने आपल्या साहित्याद्वारे खूप पैसा मिळविला. त्यांच्या 'माऊस टॅप' या नाटकाचा पहिला प्रयोग सन १९५२ मध्ये झाला. आणि पुढे त्या एकाच थिएटरमध्ये जवळजवळ ३९ वर्षे रोज रात्री त्याचे प्रयोग होतच राहिले. त्याच्या मानधनापोटी त्यांना दिड कोटी पौंड मिळाले. आणि मग त्या पैशाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी 'अगाथा ख्रिस्ती लिमिटेड' ही संस्था स्थापन केली.आत्यंत साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या आपल्या कादंबर्‍यांमधून त्यांनी नेहमीच सत्याचा विजय झालेला दाखवलेला आहे.

रूपाने देखण्या ,धनवान ,किर्तीवान अशा या लेखिकेला अमाप प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळूनही आत्मप्रौढी कधीच शिवली नाही. त्यांची रहाणी अत्यंत साधी होती. सन १९१४ मध्ये 'आर्चि बाल्ड ख्रिस्ती' या वैमानिकाशी त्यांचा विवाह झाला होता त्यांना एक मुलगी होती पण पुढे त्यांचे व त्यांच्या पतीचे फारसे पटले नाही. पहिल्या महायुद्धात लष्करी हॉस्पिटलमध्ये त्यांनी परिचारिका म्हणूनही काम केले होते. १२ जानेवारी सन १९७६ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी त्यांचे निधन झाले.