कवी शेखमहंमद 

            शेखमहंमद - महाराष्ट्रात भागवत पंथाच्या व्यापक प्रासारातून वारकरी संप्रदायाचे महत्त्व वाढले. समाजाच्या अनेक थरांतून संत कवी पंढरीच्या विठोबाचे भक्त बनले. ते जरी लौकिक दृष्ट्या न शिकलेले, कमी शिकलेले असले तरी आपल्या अनुभवांतून जीवनविषयक अनमोल शिक्षण त्यांना मिळालेले होते. त्यावेळी अनेक मुसलमान संत कवी निर्माण झाले व त्यांनी भजनाच्या माध्यमातून मौलिक काव्यरचना केली. त्यातीलच शेखमहंमद होत. शेखमहंमद श्रीगोंदे येथील  राहणारे. त्यांचा काळ साधारणपणे १५५० ते १६६०. त्यांच्या काव्यरचनेत हिंदू-मुसलमान हा भेद कुठेच दिसत नाही. विठ्ठलालाच देव समजून त्यांनी ग्रंथरचना केली. त्यांनी 'योगसंग्राम', 'पवन विजय' हे ग्रंथ लिहिले. त्याशिवाय काही अभंग रचना, भारुडे इत्यादी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांनी पंढरीला व विठ्ठलालाच आपले दैवत मानले. महंमदांच्या काव्यरचनेतून समतेचा पुरस्कार सर्वत्र दिसून येते.
            व्यवहारात दिसून येणार्‍या निसर्गातील घटना, सजीव सृष्टी, उदाहरणादाखल घेऊन शाश्वत सत्य
सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. माणसे कोणत्याही जातीत जन्मलेली असोत. सर्वाठायी एकच
परमेश्वर नांदतो हे स्पष्ट करताना महंमद म्हणतो - 'शेख महंमद अविंध - त्यांचे हदयी गोविंद'! ईश्वरस्मरण, ईश्वरभक्ती करण्यास, सत्य आचरण करण्यास कोणत्याही एका विशिष्ट जातीत जन्म घेणे जरुरी नाही. कुणालाही ईश्वराशी सख्य जोडता येते, हेच त्याच्या शिकवणुकीचे सार आहे.