द्राक्ष मद्यार्क किंवा वाईन 

            फळांचे रस किंवा धान्य आंबवून मद्यार्क तयार केले जाते. या मद्यार्कापासून उर्ध्वपातन पद्धतीने व्हिस्की, ब्रँडी, रम, जिन, यासारखे प्रकार तयार करतात. त्यामध्ये  अल्कोहोलचे प्रमाण ४० ते ५२ टक्के इतके असते. या अल्कोहोल असलेल्या पदार्थांना 'स्पिरीट्स' म्हणतात आणि ती पेये सोडा, पाणी, फळांचे रस यांच्यामध्ये मिसळूनच घ्यावी लागतात. पण मद्यार्कामध्ये किंवा वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प असते आणि त्यामुळे ते पाणी न मिसळता घेतले तरी चालते. उलट मर्यादित प्रमाणात मद्यपान आरोग्याला हितकारक आहे असे म्हटले जाते. द्राक्षमद्यसेवनामुळे अपायकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन उपकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. द्राक्षमद्यार्क सेवनाने अन्न विषबाधा करणारे जंतू जोमाने वाढत नाहीत. नियमित मद्यसेवकांमध्ये जठर, अन्ननलिका, स्तन, प्रोस्टेट यांच्या कर्करोगाचे प्रमाण कमी असते. तसेच हृदय रक्तवाहिन्यांचे विकार व मेंदूतील रक्तवाहिनी चोंदल्यामुळे होणारा पक्षाघात यांचे प्रामाणे त्यांच्यात ५०% नी कमी होते असे शास्त्रीय चाचण्यांतून सिद्ध झाले आहे. मात्र हे मद्यसेवन अल्पप्रमाणातच झाले पाहिजे. अति तेथे माती हा न्याय येथेही लागू पडतो अतिमद्यपानही आरोग्याला घातक आहे.
            द्राक्षापासून मद्यार्क तयार करण्यासाठी विविध प्रक्रिया कराव्या लागतात. मुळात चांगल्या प्रकारची द्राक्षे वाढवणे कठीण काम आहे. नागरंणी, औषध फवारणी, खते देणे, छाटणी करणे ही सर्व कामे वेळच्यावेळी आणि योग्य प्रमाणात करावी लागतात. द्राक्षाचे पीक तयार झाल्यावर ती द्राक्षे मद्य निर्मितीच्या कारखान्यात आणतात. त्यांची डेखे खुडून ती यंत्राच्या सहाय्याने कुस्करली जातात. नंतर हा रस स्टिलच्या पिंपात आंबवण्यासाठी ठेवले जाते. काही ठिकाणी ओक वृक्षाच्या लाकडाची पिंपेही त्यासाठी वापरली जातात. आम्लीभवनासाठी आवश्यक ते तापमान नियंत्रित ठेवले जाते. तापमान कमी वा जास्त झाले तरी मद्यार्काची चव, रंग, वास यात फरक पडतो. आम्लीभवन पूर्ण झाल्यावर मद्य गाळून स्वच्छ केले जाते व दुसर्‍या पिंपात ओतून पुन्हा आम्लीकरणासाठी ठेवले जाते. या प्रक्रियांच्या प्रत्येक पायरीला खास तपासनीस मद्यार्काची चव घेऊन बघतो. त्यासाठी त्याला भरभक्कम पगारही दिला जातो. अर्थात चव घेऊन तो ते मद्य थूकून टकतो. अशाप्रकारे मद्यार्क बनवण्यास बराच कालावधी लागतो.  हल्ली भारतातही चांगले तंत्रज्ञान वापरून मद्यार्क तयार केले जातात.