चलनी नोटेचा खरेपणा तपासताना 

१) चलनी नोटेमध्ये नोटेची किंमत, भारतीय रिझर्व्ह बँकेचे हिन्दी व इंग्रजी भाषांतील नाव, सरकारची हमी, पैसे देण्याचे वचन, गव्हर्नरची सही, रिझर्व्ह बँकेची मुद्रा, अशोकस्तंभ या सर्व गोष्टी थोड्या प्रामाणात फुगीर आहेत की नाही ते पहावे.
२) प्रत्येक नोटेवर गांधीजींचा चेहरा व मध्यभागीचा रकमेचा आकडा यामध्ये तुटक तुटक धावदोर्‍या सारखी सरळ उभी रेघ दिसते का ते पहावे.
३) या रेघेवर हिंदीमध्ये  भारत व इंग्रजीत आर बी आय  अशी अक्षरे छापलेली दिसतात का ते पहावे.
४) या रेघेला संरक्षक धागा किंवा सिक्युरिटी मॅग्नेटिक थ्रेड म्हणतात. त्याचा रंग फिरता असतो. नोट हलवल्यावर या रेघेचा रंग हिरवा व निळा होतो की नाही ते पहावे.
५) चलनी नोटेवर गांधीजींचे जलचिन्ह (वॉटरमार्क) आणि जलचिन्हाच्या जाळीत विविध भाषांमध्ये मार्गदर्शक  ओळी आहेत का पहावे.
६) चलनी नोटेच्या पुढच्या बाजुला महात्मा गांधीजींच्या उजव्या बाजुला नोटेची किंमत अंकामध्ये सांगणारी अदृश्य प्रतिमा आहे का पहावे.
७) चलनी नोटेच्या पुढील भागात वॉटरमार्कच्या खालील कोपर्‍यात अशोकचिन्ह आहे का पहावे.
८) चलनी नोटेमध्ये अशोकस्तंभाखाली 'सत्यमेव जयते' असे लिहिले आहे का ते पहावे.
९) चलनी नोटेच्या उजव्या बाजुच्या खालील कोपर्‍यात रिझर्व बँक ऑफ इंडियाचा शिक्का आहे का पहावा.
१०) चलनी नोटेत अशोक स्तंभाजवळ लिहिलेला नोटेचा नंबर आणि उजव्या कोपर्‍यात वरच्या बाजुला लिहिलेला नोटेचा नंबर सारखाच आहे का ते पहावे.
११) चलनी नोटेच्या मध्यभागी वरच्या बाजुला भारतीय रिजर्व बैंक असे हिन्दी व इंग्रजीत लिहिले आहे का ते पहावे.
१२) चलनी नोटेमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या आकड्यात नोटेची किंमत लिहिली असते त्यावर 'केंद्रिय सरकार द्वारा प्रत्याभूत' असे हिदीत व गॅरेंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट असे इंग्रजीत लिहिले आहे का पहावे.
१३) चलनी नोटेमध्ये तत्कालिन गव्हर्नरची सही देवनागरीमध्ये व इंग्रजीमध्ये आहे की नाही ते पहावे.
१४) चलनी नोट उजेडात धरल्यावर वॉटरमार्कवर अशोकस्तंभाच्या वर व गांधीजींच्या वॉटरमार्कवरील प्रतिमेतील कानाच्या बाजुला नोटेची रक्कम वाचता येते का ते पहावे.
१५) चलनी नोट उजेडात धरल्यावर नोटेच्या मध्यभागी दोन्ही बाजुला असलेली नक्षी एकावर एक बरोबर बसणारी आहे का ते पहावे.