स्वाईन फ्लूचा विषाणू 

            स्वाईन फ्लूलाच हॉग फ्लू, पिंग फ्लू असेही म्हणतात. एन्फ्लूएन्झा किंवा आपण ज्याला निव्वळ फ्लू असे म्हणतो त्या रोगाचे ए, बी, व सी असे तीन प्रकार आहेत. यापैकी ए प्रकारचा रोग नेहमी डुकरांना होतो. तोच हा स्वाईनफ्लू. या ए प्रकारच्या एन्फ्लुएन्झा रोगाच्या विषाणू मध्ये H1N1, H1N2, H2N3, H3N1 आणि H3N2 असे विविध प्रकार असतात. हा विषाणू फक्त आठ जनुकांचा बनलेला असून त्याचे  आकारमान ८० ते १२० नॅनोमीटर एवढे सूक्ष्म असते. या विषाणूंना स्वतःचे शरीर व स्वतःच्या पेशी नसतात. फक्त डी एन ए, आर - एन - एन असलेला हे विषाणू इतरांच्या शरीरावरच जगतात. हे विषाणू आपल्या गुणधर्मात सतत बदल करीत असतात. त्यांची रचना व गुणधर्म सतत  बदलत असल्याने त्यांच्या विरुद्ध लस शोधून काढणे कठीण होते. डोळ्यांना दिसतही  नसलेल्या या विषाणूचा संसर्ग जलद होतो. हा विषाणू डुकराच्या शरीरात लपून बसलेला असतो व संधी मिळताच माणसाच्या शरीरात आपली जनुके टोचतो. थोडक्यात स्वाईन फ्लूचे विषाणू सजीव व निर्जीव यांच्या सीमारेषेवरील आतिसूक्ष्म कण असतात. ते पोषक वातावरणात आपली जनुके जीवंत पेशीमध्ये टोचतात. आणि पेशीच्या आत गेल्यावर ती जनुके स्वतःची विभागणी करायला सुरुवात करतात. त्यांच्यापासून मग अनेक विषाणू निर्माण होतात, या विषाणूंच्या जीवनाला धोकादायक वातावरण निर्माण झाले की ते स्वतःचे रुपांतर निर्जीव गोष्टीत करतात; व योग्य वातावरणाची वाट पहात बसतात. पुन्हा जिवंत होताना ते स्वतःच्या जनुकीय रचनेत बदल करतात, अशा प्रकारे स्वतः निरोगी राहून रोगाचा प्रसार करण्याचे कार्य हे विषाणू करत असतात.
            सन १९३० ते १९९० पर्यंत शास्त्रज्ञानी फक्त 'एच वन एन वन' या प्रकारचे विषाणू शोधले होते. पुढे १९९७-९८ मध्ये त्या विषाणूंच्या रचनेत बदल झालेला आढळला. त्याला नाव दिले 'एच थ्रि एन टू'. पुन्हा या विषाणूमध्ये बदल झालेला आढळला. त्याला शास्त्रज्ञानी नाव दिले 'एच वन एन टू' .
            अशाप्रकारे अतिसूक्ष्म असणारा, आपली रचना व गुणधर्म सतत बदलणारा, संधी मिळताच इतरांच्या पेशीत आपली जनुके टोचून आपली प्रजा वाढवणारा हा विषाणू आतापर्यंत अजिंक्य होता. त्याच्यावर लस शोधून काढणे कठीण होते. पण ऑस्ट्रियन रसायन संशोधक डॉ. नॉर्बर्ट बिशोफबर्जर यांनी या स्वाइनफ्लूच्या विषाणूंचा व संसर्गाचा नाश करणारे औषध शोधून काढले. त्या औषधाला नाव दिले "टॅमी फ्लू". शिवाय हा विषाणू शून्य डिग्री एवढ्या तापमानात जिवंत रहात नाही असेही आढळून आले आहे.