गीता जयंती 

            "आता भारती कमळपरागु |  गीताख्यु प्रसंगु जो संवादिला श्रीरंगु |  अर्जुनेसी || ना तरी शब्दब्रह्माब्धि |मथिलेया व्यासबुद्धि | निवडिले निरवधि |  नवनीत हे | अशाप्रकारे ज्ञानेश्वरांनी वर्णन केल्याप्रमाणे वेदरूपी महासागराचे मंथन करून त्यातील  सारगर्भ
नवनीत असलेल्या  "श्रीमद भगवत गीता" या हिंदू धर्मग्रंथाची हीजयंती आहे. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही आगळी वेगळी प्रथा आहे हे खरे. पण  त्याचे कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे. महाभारत हा जगातील सर्वात मोठा प्राचीन ग्रंथ. या ग्रंथाबाबत असे सांगितले जाते कि प्रथम व्यासांनी ८८०० श्लोकरचना करून 'जय' नावाचा ग्रंथ रचला. तो त्यांनी वैश्यंपायन यांना सांगितला. वैशंपायनानी त्यामध्ये २४००० श्लोकरचना करून 'भारत' नावाचा ग्रंथ रचला. तो त्यांनी सौती यांना सांगितला. सौती यांनी त्यात ६३०२६ श्लोकरचना करून जो ग्रंथ तयार केला त्याला महाभारत असे म्हणतात . यामध्ये एकूण ९५८२६ श्लोक असून अठरा विभागात त्यांची विभागणी झाली आहे. या विभागांना पर्व असे म्हणतात. यापैकी सहाव्या भीष्मपर्वत गीता कथन आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भांबावलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जीवनाचा जो दिव्य संदेश दिला तो म्हणजे गीता. संपूर्ण माहाभारताचे  सार त्यात आहे. धनुर्धर अर्जूनाच्या निमित्ताने सार्‍या विश्वाला जीवन जगण्यास आवश्यक असणारे विचार त्यात आहेत. गीतेमध्ये काय नाही ? त्यात वेद उपनिषदांचे  सार  सामावलेले   आहे, त्यात ज्ञानयोग आहे, भक्तीयोग आहे, कर्मयोग आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही वर्णातील लोकांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मार्ग दाखवण्याचे काम गीता करते. मनातील कोणतीही शंका घेऊन गीतेकडे जा. गीता कोणालाच निरुत्तरीत होऊन जाऊ देत नाही. प्रत्येक शंकेचे  निरसन त्यात केले आहे. गीतेमध्ये ज्ञान आहे विज्ञानही आहे. त्यात निवृत्तीबरोबरच प्रवृत्ती, कर्म, शौर्य, आहार, विहार, भक्ती, व्यवहार चातुर्य, व्यापार, कृषी, गोरक्ष, इत्यादि अनेक विषयांवरचे चिंतन आहे. आणि इतके असूनही त्यात वाड्मयीन सौंदर्यही आहे. म्हणून गीता हा आदर्श ग्रंथ आहे. सार्‍या जगात लोकप्रियतेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा ग्रंथ म्हणजे गीता. म्हणून तो वैश्विक ग्रंथ आहे. अवघ्या सातशे श्लोकांच्या मर्यादेत, सहजसुलभ, आणि सुंदर रितीने आत्मज्ञान, ब्रह्म यासारख्या श्रेष्ठ अध्यात्मविद्येच्या क्षेत्रंतील अवघड विषयांचे विवरण असलेला, म्हणून भगवद्गीता हा ग्रंथ जगात मान्यता पावलेला आहे. कोणत्याही देशातील , कोणत्याही जाती धर्म पंथातील, कोणत्याही काळातील लोकांना गीतेतील अवीट माधुर्य आणि सौंदर्य आकर्षून घेईल असा हा ग्रंथ आहे. गीतेमध्ये वेदान्त, अध्यात्मविद्या यासारख्या अवघड विषयांचे विवेचन गुरुशिष्य संवाद पद्धतीने सांगितले आहे. मानवसमाजाला जगण्याची हिंमत, तेज देऊन जीवनभिमुख बनवण्याचे समर्थ गीतेमध्ये आहे. आपला स्वधर्म जाणून तो प्राणपणाने जपण्याचा संदेश गीतेने दिला आहे. मोह, माया, आसक्ती यापासून दूर राहून नीरक्षीर विवेक बुद्धिने प्रत्येकाने आपला धर्म पाळावा म्हणजे आपल्या वाट्याला आलेले कर्म 'मा फलेषु कदाचन' या वृत्तीने  करावे; भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानावे हेच गीतेने सांगितले आहे. सर्वसामान्य माणसाला "उत्तम पुरुष" बनविणे हेच जणू गीतेचे ध्येय असावे.
            विनोबा भावे यांनी गीतेला 'गीताई' असेच म्हटले आहे. ते म्हणतात ' माझे शरीर आईच्या दुधावर पोसले त्यापेक्षा माझे हृदय आणि बुद्धि यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे. गीता म्हणजे माझे प्राणतत्त्व."
            प. पु. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात, "मी वाड्मय रसिक नाहे, संस्कृत्साहित्यज्ञ नाही, कर्मयोगी नाही तरीही मला गीता आवडते. निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पहातो. गीता त्याला काट्यांमध्ये गुलाब पहाण्याची दृष्टी देते. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे."
            लोकमान्य टिळकानी गीतेचा अभ्यास करुन 'गीता रहस्य'  हा ग्रंथ लिहिला. तर ज्ञानेश्वरांनी गीतेचा भावर्थ कथन करण्यासाठी 'ज्ञानेश्वरी' लिहिली. 'भावार्थदीपिका' हे त्याचे खरे नाव. राष्ट्रपिता माहत्मा गांधीजी  तर गीतेला 'सार्वत्रिक माता' म्हणत.
            सुमारे पाच हजार बर्षापूर्वी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जूनाला गीतातत्त्वज्ञान सांगितले असे मानतात. म्हणून केवळ भारतातच नव्हे तर विश्वातील अनेक देशातील लोक मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी गीताजयंती उत्सव भक्तीभावाने साजरी करतात.