पौर्णिमा 

  चंद्र हा  पृथ्वीचा   उपग्रह.स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या चंद्राची विविध रूपे आकाशात पहायला मिळतात.लुकलुकणार्‍या तारांगणात एकटाच ऐटीत उजळून सार्‍या आसमंताला मंद शीतल प्रकाशाने मोहवून टाकणारा चंद्र अधिक भावतो तो पौर्णिमेच्या दिवशी. पूर्ण चंद्राचा तो गोळा आकाशात पाहिल्यावर समुद्रलहरीसुद्धा उचंबळून येतात. दर महिन्यात येणार्‍या पौर्णिमा विविध कारणाने भारतात साजर्‍या केल्या जातात.      
 १) कोजागिरी पौर्णिमा
           अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. या दिवशीचे चांदणे खास महत्त्वाचे असते ते शीतल असते. अश्विन महिन्यात पावसाळा संपून आकाश निरभ्र असते म्हणून चांदणे स्वच्छ पडते त्याची मौज लुटता यावी म्हणून हा उत्सव साजरा करतात. या दिवशी चंद्राला आटीय दुधाचा नैवैद्य दाखवतात. दुधात साखर, बदाम, पिस्ता, खारीक, वेलची  यासारखे पदर्था घालून आटवायचे व ते चांदण्यात  थंड करायचे व मग प्यायचे. या आटीय दुधातील सर्वच पदार्थ पित्तनाशक व पौष्टीक असतात. दिवसभरात उकाडयाने झालेला दाह व थकवा त्यामुळे नाहिसा होतो.
            या दिवशी उपवास, पूजन व जागरण या तीन गोष्टींना महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मी व ऐरावतावर
बसलेला इंद्र यांची पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे, नारळाचे पाणी किंवा दूध साखर यांचा देवांना  नैवेद्य दाखवतात व सर्वांना वाटतात. या दिवशी लक्ष्मी म्हणजे भाग्यदेवता मध्यरात्री 'को जागर्ती?' म्हणजे "कोण जागे आहे?" असा प्रश्न विचारत पृथ्वीतलावर संचार करते व जागे असणार्‍यांना सुख समृद्धी देते असा समज आहे.
            या दिवसाचे चांदणे औषधी असते. म्हणूनच या दिवशी आटवलेल दूध, पाणी उघड्यावर ठेवून ते पितात. पौर्णिमेच्या मध्यरात्री रोहितक नावाचा लहानसा मासा पाण्यासह जिवंत गिळला तर दमा ह्याआजाराची तीव्रता कमी होते असेही म्हणतात.
            २) वट पौर्णिमा
            जेष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा या दिवशी स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करतात. या दिवशी त्या वट वृक्षाची पूजा करतात. सौभाग्य वाढीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. पूर्वी अश्वपती नावाच्या राजाची सावित्री नावाची मुलगी होती.  सत्यवान हे तिच्या पतीचे नाव. सावित्री पतीव्रता होती. सत्यवानाच्या मृत्युनंतर सावित्रीने मृत्युदेवता यम याची प्रार्थना करून, त्याच्याशी शास्त्रचर्चा करून त्याला प्रसन्न करून घेतले व त्यानंतर यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले अशी कथा सांगितली जाते. ही सर्व घटना वडाच्या वृक्षाखाली घडली; म्हणून स्त्रिया या दिवशी वडाची पूजा करतात वटवृक्षाचे आयुष्य खूप असून पारंब्यांमुळे त्याचा विस्तारही खूप होतो. तेव्हा वटवृक्षाप्रमाणे आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य तसेच त्याच्या सारखाच प्रपंच विस्तार व्हावा अशी स्त्रिया या दिवशी प्रार्थना करतात.
            अक्षय्यत्व प्राप्त झालेला हा वटवृक्ष सर्व भारतभर आढळतो. वडाच्या झाडाचा प्रत्येक भाग स्त्रियांसाठी उपयोगी आहे. गर्भ टिकून रहाण्यासाठी वडाच्या कोंबाचा उपयोग आयुर्वेदात सांगितला आहे. वडाच्या पारंब्यांपासून बनलेले तेल केसवृद्धीसाठी उपयोगी आहे.
            ३) गुरु पौर्णिमा
            आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी शिष्य आपल्या गुरुंना भेटून त्यांची पूजा करतात. त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुला गुरुदक्षिणा देतात. कारण गुरुंकडून  विद्या घेवून  त्या विद्येच्या बळावर प्रत्येकजण जीवनोपयोगी व्यवहार करीत असतो. तेव्हा त्या गुरुंविषयी आदराने कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
            याच दिवसाला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. " व्यासोच्छिष्टम जगत सर्वम |" असे म्हणतात. व्यासांनी ८८०० श्लोक रचना असलेला 'जय' नावाचा ग्रंथ लिहिला त्यात वैश्यंपायन व सौती ऋषीनी भर घालून महाभारत ग्रंथ तयार झाला. त्यांनी वेदांचे चार भाग करून वेदविद्येचा प्रसार सुलभ केला. व्यासांनी जेवढे ज्ञान जगाला दिले तेवढे कोणीच दिले नाही म्हणून गुरुंणा गुरु असा त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या शिकवणूकीचे सारे सार गीतेमध्ये आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असा प्रत्येक विचार त्यात आला आहे.म्हणून जेष्ठ पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा या नावानेही ओळखली जाते.
            ४) नारळी पौर्णिमा
            श्रावण महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी वरुण देवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करुन त्याला नारळ अर्पण करतात. हा कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात बंद ठेवलेला मासेमारीचा धंदा या दिवसापासून ते पुन्हा सुरु करतात वादळ, तुफान यापासून वरुण देवतेने संरक्षण करावे म्हणून सागराला श्रीफळ देऊन त्याची पूजा केली जाते. नारळाच्या अंगी अनेक औषधी गुण आहेत. तसेच नारळचा प्रत्येक अवयव मानवाच्या उपयोगी आहे. आहार म्हणून. औषध म्हणून तसेच विविध वस्तू बनवण्याचे साधन म्हणून नारळ उपयोगी आहे. अशा या कल्पवृक्षाचे संवर्धन व्हावे या उद्देशानेही हा साण साजरा केला जातो.
            नारळीपौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा करतात. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. फार पूर्वी रक्षाबंधन राजे लोकांत साजरा होई. रजपूत स्त्रिया आपल्या पतीच्या शत्रूच्या गोटात जाऊन शत्रूच्या योद्धांच्या हाती राखी बांधून भावाचे नाते निर्माण करत. अशा प्रकारे युद्धप्रसंग टाळून त्या त्यांच्या सैभाग्याचे रक्षण करीत. याबाबतच्या अनेक कथा प्राचारात आहेत.
            प्राचीन काळी आश्रमात रहाणारे विद्यार्थी या दिवशी' श्रावणी' नावाचा विधी करीत.श्रावणी म्हणजे मोठी सुट्टी संपवून पुन्हा अध्ययनाला आरंभ करण्याचा विधी होय.ब्राह्मण लोक यादिवशी आपले जानवे बदलतात.
           ५) त्रिपुरी पौर्णिमा
            कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपूरी पौर्णिमा म्हणतात. फार पूर्वी त्रिपुर नावच्या असुराने उग्र तपश्चर्येने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले.ब्रम्हदेवाने त्याला देवता, मनुष्य, स्त्री, रोग व निशाचर यापासून अभय मिळेल असा वर दिला त्यामुळे त्रिपूरासूर माजला आणि त्याने सर्वांना त्रास दयाला सुरुवात केली. तेंव्हा शंकराने त्याची तिनही पुरे भस्म करून त्याला ठार मारले. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवसाला त्रिपूरी पौर्णिमा म्हणतात. शिव व विष्णू यांची बेल व तुळस यांनी पूजा करतात. या दिवशी दारात, घरात, परिसरात, मंदिरात, दिवे लावतात .दिपदान करतात. गंगास्नान करतात. देवळात तर दीपोत्सव करतात.
           ६) हुताशनी पौर्णिमा
           फाल्गून पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा म्हणतात. उत्तर भारतात होरी, दोलायात्रा, दक्षिणेत कामदहन तर गोवा, कोकण  माहाराष्ट्रात शिमगा, होळी, होलिकादहन या नावाने हा सण साजरा करतात. वसंतऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ साजरा करण्यात  येणार्‍या या सणाला वसंतोत्सव असेही म्हणतात. सर्व जातीचे लोक या सणाच्या दिवशी एकत्र येतात. हा सण सायंकाळी साजरा केला जातो. फाल्गून पौर्णिमेला सायंकाळी ज्या ठिकाणी होळी करायची  तेथे जमीन स्वच्छ सारवून धूवून रांगोळी घातली जाते. मग गोवर्‍या, लाकडे पेटवून होळी करतात. होळीची पूजा करून आत नारळ टाकतात. पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध व तूप शिंपून शांत करतात. त्या दिवशी सारी रात्र नृत्यगायन करून जागवली जाते. दुसर्‍या दिवशी खूप अश्लील, बीभत्स, अर्वाच्च, उच्चारण करुन होळीची राख विसर्जित केली जाते. काही ठिकाणी ही राख, शेण, चिखल यासारखे पदार्थ  अंगाला लावून नृत्यगायन केले जाते. हा दुसरा दिवस म्हणजे फाल्गून वदय प्रतिपदा यालाच धुळवड किंवा धुलीवंदन असे म्हणतात.
                            या सणाबाबत अनेक कथा आहेत
१) दुंढा नावाची राक्षसी गावात शिरुन मुलांना त्रास दयायची तेंव्हा लोकांनी शिव्या शाप देऊन अग्नी पेटवून तिला भिववले व पळवून लावले तो दिवस फाल्गुन पौर्णिमा.
२) श्रीकृष्णाने पुतना राक्षसीणीला मारले व त्याच्या सोबत्यानी होळीत तिला भस्मसात केले.
२) आपली तपश्चर्या भंग करणार्‍या मदनाला या दिवशी भगवान शंकरानी आपला तिसरा डोळा उघडून भस्मसात करुन टाकले.
              ७.)  चैत्र पौर्णिमा
 चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच किर्तनाला प्रारंभ करतात.सूर्योदयाच्यावेळी हनुमानाचा जन्म होतो. तेंव्हा किर्तन संपते. हनुमानाची पूजा करून सार्‍यांना सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो. हनुमान म्हणजे शक्ती,भक्ती आणि बुद्धीची देवता. "भीमरूपी महारुद्रा"असेत्याचे वर्णन मारुतीस्तोत्रात संत रामदासांनी केले आहे. तर रामरक्षेमध्ये "मनोजवम, मारुततुल्यवेगम, जितेंद्रियम, बुद्धिमताम वरिष्ठ्म , वातात्मजम, वानरयुथमुख्यम,
श्रीरामदूतम, अशा विशेषणांनी त्याचे गुणगान केले आहे. सप्तचिरंजीवांमध्ये हनुमानाची गणना केली जाते. त्याच्या उपासनेने आरोग्य, मनःशांती लाभून शारीरिक व मानसिक पीडा नष्ट होतात असे मानले जाते. वीर हनुमान व दास हनुमान अशी हनुमानाची दोन रूपे आहेत. बल, चातुर्य सतर्कता हे वीर हनुमानाचे विशेष गुण; तर श्रीरामाप्रती त्याची भक्ती, नम्रता,निष्ठा आणि दास्यभाव हे दास हनुमानाचे गुणविशेष. अशाप्रकारे शक्ती व भक्तीचा अपूर्व संगम असलेल्या महाबली हनुमानाचे स्मरण चैत्री पौर्णिमेला केले जाते.