गंगूबाई हनगल 

           "कन्नड कोकिळा" असा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या गंगूबाई हनगल यांचा जन्म १९१३ हुबळी धारवाडमध्ये झाला. त्यांचे वडील चिक्कूराव नाडगीर  व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीच गाण छान गात असे. पण गंगूबाईंला मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगुबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली. सोळाव्या वर्षी त्यांचे श्री. गुरुराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. सन १९३०-३२ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीतपरिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाईचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात सन १९५५ मध्ये पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. त्यांना गमकाच्या अंगाने गायला खूप आवडे; जे स्त्री गायिका सहसा गात नसत. नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे. गंगुबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या. सवाई गंधर्वांकडे त्यांनी सांगिताचे शिक्षण घेतले. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या.
           सन १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली. मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगिताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तीगीत व गझल गायानाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष  गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिली युगलगीत विख्यात गायक श्री जी. एन जोशी व
गंगूबाई  यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओ व गणपती उत्सवातही त्यांची गाणी  होत.
            गाण्यावर विलक्षण प्रेम करणार्‍या गंगूबई हनगल नावाच्या या मर्द गायिकेला पद्मभूषण, डॉक्टरेट या पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभ केल आहे. त्यात त्यांची छायाचित्र, ध्वनिमुद्रिका, तानपुरे पहायला मिळतात. गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरीक म्हणूनही थोर होत्या. सन २००३ साली त्यांनी आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या 'दि साँग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात इंग्रजी व कानडी भाषेत प्रसिद्ध झाल्या आहेत.