जमिनीखालील भाज्या 

           (१) आले
            उग्र वास असणार्‍या आल्याचे मूळ स्थान आशियाखंडात आहे.भारतातही मोठ्या प्रमाणावर आल्याची लागवड केली जाते.  याची रोपे हातभर  उंच असून पानांची  लांबी सुमारे १३ ते ३० सेमी असते. पाने लांब, रुंद व निमुळती  असतात याचे पुष्प   दंड ५ ते ८ सेमी लांब असतात मात्र फुले व फळे क्वचितच दिसतात.  आल्याची रोपे वाढल्यावर त्याची मुळे जमिनीत पसरतात. मुळांच्या गाठीला आले असे म्हणतात. हे कंद लावूनच काल्याची पुन्हा लागवड केली जाते. आल्यामध्ये जीवनसत्त्व इ, ब६, मॅगनीज, क्षार, पोटॅशियम, लोह, थोड्याफार, प्रमाणात कर्बोदके, १९ प्रकारची बायो अ‍ॅक्टिव्ह कंपाऊंड्स, प्रोटिएज व लायपेज ही एन्झाइम्स आढळतात.
            आले शिजवून सुकवले व विषिष्ट प्रक्रिया करुन वाळविले की सुंठ तयार होते. ती उगाळून अनेक  आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. पचनसंस्थेसाठी, रुची वाढवण्यासाठी उपयोगी असते.
            आले हे भूक वाढवणारे, अन्नाचे पचन करणारे, हृदय व आमवातावर आरोग्यकारक आहे रक्तप्रवाह सुरळीत होण्यासही आले उपयोगी आहे आले सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब, अर्थ्रायटीस इ. वर गुणकारी आहे.
काही पदार्थ - १) इंडोनेशियामध्ये आल्याचा चहा हेल्थड्रिंक म्हणून घेतला जातो. २ १/२ कप उकळत्या पाण्यात १ इंच किसलेले आले, २ चमचे मध दीड चमचा साखर घालून ढवळत रहावे गॅस बंद करून १ चमचा चहा पावडर घालून झाकून ठेवतात. हा चहा गाळून त्यामध्ये दोन चमचे लिंवाचा रस व बर्फाचा खडा घालून पितात.
२) आलेपाक - आल्याचा रस तीन वाट्या व २ वाट्या साखर किंवा गूळ घालून आटवावा जेवणापूर्वी १ चमचा रस खाल्यास भूक चांगली लागून पचन सुधारते.
३) आल्याची चटणी - किसलेले आले, खोबरे, दही मीठ, एकत्र करुन ही चटणी केली जाते. श्राद्धाच्यावेळी जेवणाच्या ताटात ती वाढतात.
 
            (२) लसूण
            या झाडाला कलिकाकंद असेही म्हणतात. भारतात कोठेही याचे पीक येते. रसोन व महारसोन असे याचे दोन प्रकार आहेत. महारसोनाचे कांदे मोठे असतात. याची रोपे ३० ते ६० सेमी पर्यंत वाढतात. चपटी, लांब, टोकाकडे अरुंद होत जाणारी याची पाने असतात. थंडीत याच्या पुष्पदंडाला पांढर्‍या रंगाची गुच्छाने फुले येतात याच्या कंदाला पांढर्‍या व लालसर पाकळ्या असतात. हाच कंद म्हणजे लसूण होय.
            लसूण धातूवर्धक, पाचक, रक्तवर्धक, बलकारक असून तो डोळ्यांना हितकारक, म्हतारपण दूर ठेवणारा, बुद्धि वाढवणारा असा कंद आहे. पोटात जंत झाल्यास, पोट साफ होत नसल्यास, पोटात वात धरल्यास, लसूण  उत्तम औषध आहे. तुपात तळून अगर त्याचा रस काढून दूधातून घ्याव्या. तसेच आवाज बसल्यास लसूण तुपात तळून खातात. अर्धशिशी झाली असेल तर लसणाचा रस काढून २ थेंब नाकात घालावा. तीळाच्या तेलात लसणाची १ पाकळी घालून तळून घ्यावी व असे तेल थंड करून कान दुखत असल्यास कानात घालावे. हाडे मोडली असता ४-५ लसूण पाकळ्या मध साखरे बरोबर रोज खाव्यात. लसूण घालून उकळलेले दूध टी. बी. च्या रोग्यांना उपयुक्त असते.

            (३) कांदा
            रोज जेवणात कांदा वापरला जतो. लाल कांदे व पांढरे कांदे असे दोन प्रकार आहेत भारतात सर्वत्र
कांद्याची झाडे उगवू शकतात. याची झाडे साधारणतः ६० ते ९० सेमी उंच वाढतात. याची हिरवी लांब पाने जाड, मांसल व नळीप्रमाणे पोकळ असतात. या कांदापातीचा भाजी म्हणून उपयोग करतात. याचा पुष्पदंड लांब असतो व त्याच्या टोकाला गुच्छामध्ये पांढरी फुले येतात. याच्या फळात त्रिकोणी काळ्या बिया असतात. झाडाच्या खाली जो कंद असतो तो कांदा. याचा वास उग्र असतो.
           तिखट चवीचा, उग्र कांदा वेदनाहारक, जठराग्नीवर्धक, सूजकारक, दृष्टीवर्धक, शक्तीवर्धक आहे. कांद्याच्या रसाने अनेक व्याधी नष्ट होतात. अजीर्ण झाल्यास कांद्याचा रस व आल्याचा रस समप्रमाणात घ्यावा. शौचास साफ होण्यास कांदा भाजून खावा. कांदा बारीक चिरून तुपावर परतून जेवणाबरोबर खाल्यास मूळव्याध बरी होते. झोप लागत नसल्यास कांद्याची कोशिंबीर  दह्यातून खावी. कांदा फोडून हुंगल्यास बेशुद्ध माणूस शुद्धीवर येतो. नाकातून रक्त आल्यास कांदा हुंगायला देतात. कानदुखीवरही कांद्याचा रस गरम करून कानात घालतात. कांद्याच्या रसाने खोकला बरा होतो. क्षयाचे जंतू कांद्याने नष्ट होतात. कांदा थंड असल्याने उन्हाळ्यात कच्चा कांदा खावा. मात्र कांदा कापून ठेवल्यास त्यातील तत्त्व नाहीशी होतात.

            (४) मुळा
            पांढर्‍या रंगाचा हा कंद भरतात सर्वत्र आढळतो. चवीला थोडा तिखट असतो या कंदालाच आखूड, पसरट हिरवी पाने येतात. त्याची भाजी करतात. याला पांढरी फुले व शेंगा येतात. याचा वास मात्र उग्र असतो. मुळ्यामध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात.
            मुळ्याच्या शेंगामध्ये असणार्‍या बियांचे चूर्ण मासिक पाळीच्या त्रासावर, कफ विकारावर, उपयोगी असतात. त्या मृदू रेचक आहेत. या बियांचे चूर्ण मूतखडा झाला असेल तर घ्यावे. जेवणामध्ये मुळ्याच्या कंदाचा व पानांचा वापर करणे उपयुक्त आहे. कारण त्यामुळे पचनशक्ती वाढते, भूक चांगली लागते. मुळ्याच्या भाजीने  मूळव्याध बरी होते.

            (५) सुरण
            सुरणाचे कंद १८ ते ३० सेमी व्यासाचे, मध्यभागी खोलगट असतात. याच्या कांडावर छत्री प्रमाणे पाने असतात. याचे झाड १-२ मीटर उंच वाढते झाडाला एप्रिल ते जून या महिन्यात फुले येतात व नंतर पाने येतात.
            वातहारक, पचन घडविणारे, कफ, सूज नाहिसे करणारे, रजोप्रवृत्तीवर्धक, बलकारक असे अनेक गुणधर्म सुरणाचे आहेत. मूळव्याध, यकृतरोग, आमवात, आतड्याचे रोग, संधीवात  यामध्ये सुरण अतिशय औषधी आहे. यामध्ये भरपूर कर्बोदके, खनिजे, अ व ब जीवनसत्त्वे असतात.
            सुरणाचा वापर जपून करावा लागतो. सुरणामध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक असतात. ते टोकदार असल्याने ओठ, जीभ, घसा, अन्ननलिका या अवयवांना टोचतात त्यामुळे खूप खाज येते. म्हणून सुरण शिजवताना चिंच, आमसूल, आंबट पादार्थ वापरावे. म्हणजे त्यात कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक विरघळून जातील.

            (६) बीट 
            लाल रंगाचे, भरपूर क जीवनसत्त्व व खनिजे असलेले बीट हे थंड हवामानातील पीक आहे. ताज्या बीटमध्ये मध्यम प्रमाणात लोह असते. बीट खाल्याने हिमोग्लोबीन वाढून अशक्तपणा नष्ट होतो. वजन वाढते. रक्तातील तांबड्या पेशीचे प्रमाणही वाढते. यकृताची कार्यक्षमता वाढते. तसेच स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात.
            (७) गाजर
             गाजरामध्ये भरपूर प्रमाणात ए जीवनसत्त्व असते. शिवाय बी, सी, डी, ई व के जीवनसत्त्वेही असतात. कॅन्सर, दमा, अनिमिया, संधिवात इ. विकार बरे होण्यास गाजर खावे असे सांगितले जाते. गाजरामध्ये सूक्ष्म जंतूंचा नाश करणारी शक्ती आहे. गाजर खाल्याने भूक वाढून  पचनसंस्था कार्यक्षम होते. मूत्रपिंडाचा जंतूसंसर्ग गाजर रसाने दूर होतो. गाजर रसाने दृष्टी सुधारते. गाजरामध्ये सोडियम, पोटॅशिय , कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, इत्यादि क्षार असतात. त्यामुळे रक्त शुद्ध होते.
           (८) बटाटा
            बटाट्याला पूर्ण अन्न मानले जाते. त्यातील स्टार्च पोळीपेक्षा हलके असून लवकर पचते संधीवात, आम्लपीत्त या विकारात बटाटा खाणे चांगले पण ते इतर पदार्थाबरोबर न खाता एकटेच स्वतंत्र खावेत लहान मुलांच्या वाढीसाठी ते उपयुक्त आहेत. बटाट्याच्या सालीत पोषक द्रव्य असतात म्हणून बटाटा सालासकट खावा.