निसर्ग सदन 

            पायाखाली जमीन, आकाशाचे छत असे हे बिन भिंतीचे निसर्गाचे घर. उंचउंच पर्वत, डोंगर टेकड्या , विशालकाय समुद्र, वृक्षाच्छादित जंगले, झुळझुळ वाहणार्‍या नद्या याच याच्या भिंती. डोंगर कपारीत, जंगलात तयार झालेल्या गुहा याच याच्या खोल्या. वादळे, भूकंप, जलवृष्टी, वणवे यांच्यामुळे या खोल्यांचे आकार, उंची यात बदल होतात, कधी कधी त्यांच्या जागाही बदलल्या जातात आणि नव्या भिंती तयार होतात. छोटेमोठे जीवजंतू, वनस्पती, पक्षी आणि मनुष्यासहित सर्व प्राणी हे येथील रहिवासी. हे सारे सजीव पाहुणे म्हणून या घरात येतात. आणि निघून जातात त्यांची जागा दुसरे पाहुणे घेतात. पण निसर्ग सदन सदा बहरलेलच रहात. या निसर्गसदनाचा मालक कोण त्याचा उलगडा अजून तरी झालेला नाही. मनुष्यप्राणी म्हणतात," हे सार आमच आहे", पण ते खर नाही. कारण शेवटी तोही येथला पाहुणाच. निसर्ग सदनातलाच एक रहिवासी. या निसर्गसदनाच आदरातिथ्य स्वीकारून पुन्हा जाणारा. तो कसा या निसर्गसदनाचा मालक होऊ शकेल ? हे निसर्ग सदन ज्याच आहे तो सार्‍यापासून अलिप्तच रहातो. तो कोणाला दिसत नाही, तो कोणाशी बोलत नाही. निर्गुण, निराकार "परमेश्वर" अस कोणी त्याला म्हणतात. अदृश्य, अलिप्त आणि अबोल राहून सार्‍या घरावर नियंत्रण ठेवणारा "जगत नियंता" असाही उल्लेख त्याचा केला जातो.
            या निसर्गसदनाचा मालक कोणी का असेना , कसा का असेना पण तो आहे मात्र चाणाक्ष, हुशार. या घरातील प्रत्येक घटकाला जेजे हवे तेते तो निमुटपणे  पुरवित असतो. प्रत्येकाला मार्ग दाखवत असतो. पाखरांनी दाणेच खायचे आणि गायीने चाराच खायचा हे त्यांना कोण सांगत ? छोट्या छोट्या पिल्लांना आपल्या आईच्या आचळांना लुचायला कोण शिकवत ? पक्ष्यांना घरटी कोण बांधून देत ? झाडांच्या मुळांना जमिनीतील पोषक द्रव्ये शोषून घ्यायला आणि पानांना अन्न तयार करायला कोण सांगत ? नाजूक वेलींचे तणाव भक्कम आधाराला कोण बांधून देत ? उत्तर एकच निसर्ग मालक.
             या निसर्गसदनाचा मालक जसा अबोल; तो कोणाशी संवाद साधत नाही; तसच या घरात रहाणारे प्रत्येक घटक एकेमेकांशी संवाद साधू शकत नाहीत. पक्षी प्राण्यांशी बोलत नाहीत; प्राणी वनस्पतींशी बोलत नाहीत; वनस्पती माणसांशी बोलत नाहीत. पुन्हा यांचे जे पोट प्रकार आहेत; त्यांची प्रत्येकाची भाषा वेगळी. पोपटाची भाषा कावळ्याला येत नाही. वाघ अस्वलाशी संवाद साधू शकत नाही. आणि असे असूनही या निसर्ग सदनात सारेच एकमेकांशी अवलंबून राहून एकमेकांना मदत करत असतात. कारण या निसर्गसदनाची रचना म्हणा नियम म्हणा तसाच आहे. नाहीतर ह्या निसर्गसदनात जीवन जगणेच कठीण होईल. उदा. झाडांची फळे, पाने, फुले हे पक्षी व प्राण्यांचे अन्न, प्राण्यांची पक्ष्यांची विष्ठा हे झाडांचे  पोषक खत. झाडांच्या उच्छवासातील प्राणावायू प्राणी ग्रहण करतात तर प्राण्यांच्या उच्छवासातील  कर्बवायू झाडे ग्रहण करतात. या निसर्गसदनात टाकावू काहीच नाही. एकाने टाकलेला पदार्थ दुसर्‍या कोणाला तरी  उपयोगी असणारच. अगदी मृत शरीरावर उदरनिर्वाह  करणारे पक्षी प्राणी येथे आहेतच. . हे निसर्ग सदन नेहमी स्वछ राहील अशीच काळजी त्याच्या मालकाने घेतली आहे. या निसर्ग सदानाला घाणेरड बनवणारा घटक म्हणजे मानव. आणि त्याची शिक्षा निसर्गमालक केव्हा ना केव्हा त्याला देणारच.
           निसर्ग मालकाचा चाणाक्षपणा दिसतो; तो आपल्या मौल्यवान वस्तू लपवण्यात. जे जे जीवन जगण्यास आवश्यक आहे; ते त्याने उघड्यावरच ठेवले. फळे, फुले, पाने, हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे सारे विपुल प्रमाणात दृश्य स्वरूपात आहे. पण सोने, चांदी यासारखे धातू, हिरे, माणके, मोती या सारखी रत्ने , खनिजतेल, दगडी कोळसा, यासारखी इंधने त्याने लपवून ठेवली. मीठ समुद्रात लपवले. दगडांच्या अनेक प्रकारात आग निर्माण करणारी गारगोटी दडवली. त्याने अनेक वृक्षवल्ली  उपलब्ध केल्या; पण त्यांचे औषधी गुण लपवलेच. अशी अनेक गुपिते, अनेक कोडी या निसर्गसदनात दडवलेली आहेत. आज हजारो वर्षे मानव आपली बुद्धि व कसब पणाला लावून निसर्ग नियमांचा अभ्यास करत आहे. अनेक निसर्ग रहस्यांचा उलगडा मानवाला झाला आहे. पण एक कोड उलगडल की त्यातून आणखी कोडी निर्माण होतात. कोळी जसा आपणच विणलेल्या जाळ्यात अडकतो; तसा मनुष्य या निसर्ग सदनात निसर्ग मालकाने समोर टकलेली कोडी सोडवण्यात गुंतला आहे. आणि नैसर्गिक जगणच विसरून गेला आहे.
           या सदनात रहायचे तर दोनच गोष्टी करण्यासारख्या आहेत. एक निसर्गसदनात जे उपलब्ध आहे त्याचा शंकाविरहित होऊन आस्वाद घ्यायचा. किंवा निसर्ग कोडी सोडवून आहे त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा व निसर्गामालकापेक्षा वरचढ होण्याचा  प्रयत्न करण्यात वेळ घालवायचा. प्राणी पक्षी आणि वनस्पती यांनी पहिला मार्ग स्वीकारलाय. या निसर्गसदनात जे आहे जस आहे ते स्वीकारयच आणि आनंदात रहायच हे प्राण्यांच जीवन.  मनुष्य मात्र निसर्गमालकाला आव्हान देत त्याची गुपित उलगडत, कोडी सोडवत त्याच्यापेक्षा वरचढ होऊन त्याच्या घरावरच कब्जा करायला बघतोय. आणि या सार्‍या गोष्टी करण्याच्या नादात आपले सुख चैन गमावून बसलाय.