गो - माता 

         माता सर्वभूतानाम गाव: | सर्वा गावो विश्वस्य मातरः || म्हणजे गाय ही सर्व प्राणिमात्रांची आई असून सर्व गायी या विश्वाच्या माता आहेत.
            भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि गाय हे त्याचे अधिष्ठान आहे. गोमाता असाच तिचा उल्लेख आपल्या अनेक ग्रंथात येतो. गो, धेनू, कामधेनू, गृष्टी, वेह्त अशा अनेक नावानी गायीचा उल्लेख वेदवाड्मयात आला आहे. धेनू म्हणजे वासराला दूध देणारी गाय, गृष्टी म्हणजे पहिल्यांदा प्रसृत झालेली गाय, वेहत म्हणजे जिचा गर्भ स्थिर रहात नाही अशी गांय. केवळ हिंदू धर्मातच नाही तर वैदिक ऋषिमुनींबरोबरच जैन तीर्थंकर, बौद्धधर्म संस्थापक गौतमबुद्ध, शिख धर्म गुरु, पारशी लोक या सार्‍यांनीच गोमातेला देवतेचे स्थान दिले आहे. गोस्वामी तुलसीदासांनी गायीच्या चार स्तनांमध्ये धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे चार पुरुषार्थ आहेत असे म्हटले आहे. अथर्ववेदात गायीच्या शिंगामध्ये प्रजापती, मस्तकामध्ये इंद्र, कपाळामध्ये अग्नी वास  करतो; अशा अर्थाचा श्लोक आहे. ऋग्वेदामध्ये " माता रुद्राणां दुहिता वसूनां, स्वसादित्यानां अमृतस्य नाभि: |" म्हणजे रुद्रांची माता, वसूंची कन्या, आदित्यांची भगिनी आणि अमृताचा स्त्रोत असा उल्लेख आहे. यजुर्वेदात गाय हा आदर्श राष्ट्रघटक म्हणून गौरवला गेला आहे. आरोग्यरक्षण, शक्तीसंवर्धन, रोगनिवारण, सौंदर्यवर्धन इ. अनेक कामात गाईच्या दुधाचा व दुधापासून बनलेल्या पदार्थांचा वापर होतो. म्हणून गायीला देवता म्हणतात. शतपथ ब्राह्मण या ग्रंथात गाईपासून मिळाणार्‍या पदार्थांची एक यादीच एका मंत्रात दिली आहे - "गौर्वे प्रतिधुक | तस्यै शृतं तस्यै  शरः  तस्यै दधि तस्यै मस्तु तस्या आतज्चनं तस्यै नवनीतं तस्यै घृतं तस्या आमिक्षा तस्यै वाजिनम |" यामध्ये प्रतिधुक म्हणजे ताजे दूध, शृत म्हणजे तापवलेले दूध, शर म्हणजे साय, दधि म्हणजे दही,  मस्तु म्हणजे आंबट साय,  आतंचन म्हणजे विरजण, नवनीत म्हणजे लोणी, घृत म्हणजे घट्ट तूप इत्यादी. अशाप्रकारे आपल्या शरीराला पोषक असे पदार्थ देऊन गाय मानवाला वाढवते. सर्व इंद्रियांचा विकास करते म्हणून ती गोमाता. गर्भावस्थेपासून वृद्धत्वापर्यंत वयाच्या सर्व अवस्थात सर्व ऋतूत सर्व काळी गायीपासून मिळणारे दूध्, दही, ताक, तूप, इत्यादी अनेक पदार्थ उपयुक्त आहेत. त्यामुळे शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी सार्‍यावर उत्तम परिणाम होतो. हे पदार्थ आहार म्हणूनही वापरले जातात आणि औषध म्हणूनही. या दुग्धजन्य पदार्थांबरोबरच गायीचे शेण म्हणजेच गोमय, गायीचे मूत्र  म्हणजेच गोमूत्र , गायीचे शिंग, केस, खुर, गोरोचन यासार्‍यांचाच औषध म्हणून उपयोग करता येतो. गोमयाइतके उत्कृष्ट जंतुनाशक मिळणे कठीण. शेणाने सारवलेली जमीन निर्जंतुक असते. शेणखताने जमिनीचा कस वाढून मुबलक पिक येते. शेणापासून बायोगॅस मिळतो. शेण जाळल्याने वातावारणातील जंतू नष्ट होतात. गायीच्या मूत्रात पिकाला पोषक ठरणारी व जमिनीचा कस वाढवणारी अनेक मूलद्रव्ये असतात. नायट्रॉजन, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, लायपेज, सल्फर, कॉपर झिंक आदिंचा त्यात समावेश होतो. गोमुत्र विषघ्न असल्याने अनेक औषध त्यापासून तयार करतात. गायीच्या गोठ्यात वास्तव्य केल्याने क्षयासारखे आजारही बरे होतात असे म्हणतात. एक गाय पंधरा - सोळा वासरांना जन्म देते. वासरु होण्यापूर्वी दोनेक महिने तिचे दूध काढणे बंद केले व तिला उत्कृष्ट खुराक दिला तर निरोगी वासरू जन्माला येते. बैल शेतीसाठी उपयोगी असतो. जमीन नांगरण्यासाठी, रहाट ओढण्यासाठी आणि बैलागाडीसाठी त्याचा वापर केला जातो. गायीचे सर्व साधाराण आयुर्मान १८ - २० वर्ष असते. मृत गायींना झाडाखाली खड्डा खणून पुरण्यात येते. वर्षभरात त्याचे खतात रुपांतर होते.
           गाय हा बुद्धिमान, तल्लख इंद्रिये असणारा, चपळ, स्वच्छतेची आवड असणारा शरीराला उपकार अन्न सवतःच निवडून खाणारा प्राणी आहे. तिच्यामध्ये अशी काही दैवी दुर्लभ तत्त्वे आहेत कि सारे दोष नाहिसे हेतात. खालील श्लोकात गायीचे महात्म्य वर्णन केले आहे.
            सर्वतीर्थमयी मुक्तिदायिनी गोमाता
            सर्वे देवा गवामंगे तीर्थानि तत्पदेषु च |
            तदगुह्येषु स्वयं लक्ष्मीस्तिष्ठत्येव सदा पितः ||
           गोष्पदाक्तमृदा यो हि तिलकं कुरुते नरः |
           तीर्थस्नातो भवेत सद्यो जयस्तस्य पदे पदे ||
          गावस्तिष्ठान्ति यत्रैव तत्तीर्थ परिकीर्तितम |
          प्राणांस्त्यवक्ता नरस्तत्र सद्यो मुक्तो भवेत ध्रुवम ||
            म्हणजे  गायीच्या शरिरात समस्त देव निवास करतात. आणि गायीच्या पायामध्ये समस्त तीर्थ निवास करतात. गायीच्या गर्भात सदा लक्ष्मी रहाते.गायीच्या पायाला लागलेली माती जो माणूस गंध समजून मस्तकाला लावतो त्याला तीर्थजलामध्ये स्नान करण्याचे पुण्य मिळते. आणि त्याचा सर्व ठिकाणी विजय होतो. जिथे गायी राहतात त्या स्थानाला तीर्थभूमी म्हटले जाते. अशा भूमीमध्ये ज्या माणसाच्या मृत्यू होतो त्याला तत्काळ मुक्ती मिळते हे निश्चित तिथली वास्तूच धन्य धन्य होते.