दीपावली 

            सर्व सणांचा राजा म्हणजे दीपावली. आश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दीपोत्सव साजरा करण्याचे पारंपारिक व्रत आहे. परंतु सर्वसामान्यपणे अश्विन कृष्ण द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत घरोघरी आकाशकंदीलादि दिव्यांची रोषणाई केली जाते.
१) वसुबारस-  दीपावलीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस. भारतीय वैदिक संस्कृतीत गायीला पवित्र मानले आहे. " सर्वे देवा स्थिता देहे सर्व देवमयी हि गौ | " असे म्हणून परमेश्वराचे स्थान तिला दिले आहे. म्हणून दीवाळीचा पहिला दिवस हा गोपूजनाचा. या दिवशी महिला उपवास करतात. गायीला गोग्रास देतात. बाजरीची भाकरी व गोवारीची भाजी याचा त्यात समावेश असतो. देवासमोरील रांगोळीत गोपद्म काढली जातात.
२) धनत्रयोदशी - अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणतात. प्राचीन काळी देव दैत्यांनी समुद्रमंथन केले; तेंव्हा अश्विन वद्य त्रयोदशीला अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी अवतरले असे म्हणतात. धन्वंतरीनी रोगचिकित्सा व औषध योजना यासंबंधी अभ्यास करून आपले विचार मांडले. आयुर्वेद या विद्याशाखेचे ते प्रवर्तक आहेत. त्यामुळे आरोग्य रक्षक म्हणून त्यांचे पूजन केले जाते.
           याच दिवशी संध्याकाळी यम देवतेला दीपदान केले जाते. यम ही मृत्यूची देवता. तर दीप हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. यामुळे या दिवशी दिपदान केल्याने कुटुंबात कोणालाही अपमृत्यू येत नाही अशी समजूत आहे. यमदीपदान करताना कणकेत हळद टाकून त्याचा दिवा करतात. त्यात काळ्या कापाडाची वात लावतात. नंतर घराच्या दक्षिण दिशेला तो दिवा ठेवून त्याची नेहमी प्रमाणे पूजा करतात. याच दिवशी घरातील  धनाचीही पूजा केली जाते.
३) नरकचतुर्दशी - अश्विन वद्य चतुर्दशी या तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. मृत्यूसमयी नरकासूराने श्रीकृष्णाकडे असा वर मागितला की "आजच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी जो अभ्यंगस्नान करेल त्याला नरकात जावे लागू नये. " म्हणून या दिवशी सुर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. नरकासूराच्या त्रासातून मुक्तता झाली म्हणून हा दिवस आनंदाचे प्रतिक        म्हणून उत्साहाने नवीन कपडे घालून साजरा करतात. देवदर्शन करून फराळ करतात.
४) लक्ष्मी पूजन - खर तर अमावस्या हा मंगलकार्याचा दिवस नव्हे; पण अश्विन वद्य अमावस्येला समुद्रमंथनातून कमळात बसलेल्या, दिव्य तेज असलेल्या लक्ष्मीचा जन्म झला. म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजा केले जाते. तसेच धनाची देवता म्हणून कुबेराचीही पुजा केली जाते. कुबेर हा यक्षांचा अधिपती व गंधर्वांचा स्वामी मानला जातो. तो देवतांचा कोषाध्यक्ष असून गुप्तधन व ऐश्वर्य प्रदान करणारा आहे, असे  मानले जाते. या पूजेच्या वेळी गणेश, लक्ष्मी, कुबेर, चलनी नोटा किंवा नाणी यांची पूजा केली जाते. श्रीसूक्ताचे पठण केले जाते. साळीच्या लाह्या व बत्तासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. व्यापारी वर्ग आपल्या नवीन हिशोबांच्या वह्यांचे  पूजन याच दिवशी करून त्या वापरायला सुरुवात करतात. या दिवशी लक्ष्मीबरोबर घरातील केरसुणीचीही पूजा करतात.
५) बलिप्रतिपदा - कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. भगवान विष्णूनी वामनावतार घेऊन भक्त प्रल्हादाचा नातू बलिराजाला पाताळनगरीत स्थान दिले. याची आठवण म्हणून हा दिवस साजरा करतात. बलिराजाचे हरण करून भगवान विष्णू वैकुंठाला गेले तेंव्हा त्यांची पत्नी लक्ष्मी हिने त्यांना ओवाळले व विष्णूने आनंदाने तिला दागिने व वस्त्रे दिली. या घटनेची आठवण म्हणून आजही या दिवशी पत्नी पतीला औक्षण करते. याच दिवशी राजा विक्रमादित्याने नवीन कालगणनेस सुरूवात केली. म्हणून याला 'विक्रम संवत्सराचा शुभारंभ दिन' असे म्हणतात. उत्तर भरतात या दिवशी गोमयाचा गोवर्धन पर्वत तयार करून त्याची पूजा करतात. कारण कृष्णावतारात श्री कृष्णाने याच दिवशी गोवर्धनाची पूजा केली होती. काही ठिकाणी कृष्णाची गोपींसमवेत पूजा करतात तर गवळीलोक गायी म्हशींना ओवाळतात.   
            हिंदू संस्कृती प्रमाणे बलिप्रतिपदा किंवा पाडवा हा दिवस साडेतीन मूहूर्तापैकी एक दिवस आहे. कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात या दिवशी करतात.
६) भाऊबीज - कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणून साजरा करतात. हा भावाबहिणींचा दिवस. या दिवशी बहिणी आपल्या भावांना ओवाळतात. व भाऊ बहिणीला छानशी ओवाळणी किंवा भेटवस्तू देतो. काही ठिकाणी या दिवशी शास्त्रधर्मानुसार यमधर्माची प्रार्थना करतात. व पाटावर तांदळाच्या राशीवर यम, चित्रगुप्त, दोन यमदूत, यमुना, यांच्या नावे सुपार्‍या मांडून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात.