महात्मा गांधी- विचार दर्शन 

            (१) आहार  - अ)  मनुष्य बालपणी आईचे दूध पितो, त्याव्यतिरिक्त इतर दुधाची त्याला आवश्यकता नाही. मनुष्याचा आहार सुकी वा ताजी पक्व फळे हाच होय. बदामासारख्या  बीजापासून आणि द्राक्षासारख्या फळांमधून त्याच्या शरीराला व बुद्धिला भरपूर पोषण मिळू शकते. तशा तर्‍हेच्या आहारावर जो कोणी राहिल त्याला ब्रह्मचर्यादि आत्मसंयमन फारच सोपे जाते.          
आ) स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे मन आहे.
इ) उठल्या सुटल्या वैद्य, हकीम आणि डॉक्टरांकडे धाव मारल्याने आणि शरिरात नाही नाही ते अर्क, रसायने कोंबल्याने मनुष्य स्वतःचे आयुष्य संपुष्टात आणतो. एवढेच नव्हे तर स्वतःच्या मनावरील ताबा गमावून बसतो; आणि पुढे मनुष्यत्वालाही पारखा होऊन शरिराचा स्वामी रहाण्याऐवजी त्याचा गुलाम बनून जातो.
(२) शिक्षण- अ) पाठ्यपुस्तकासाठी अनेक वेळा ओरंड करण्यात येते. पण मला त्याची उणीव कधीच जाणवली नाही. असलेल्या पुस्तकाचाही विशेष उपयोग केल्याचे स्मरत नाही. माझी अशी समजूत आहे की शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक असावे. मुले डोळ्यांनी ग्रहण करतात. त्यापेक्षा कानांनी ऐकलेले कमी श्रमात अधिक ग्रहण करू शकतात.
आ) शारीरिक शिक्षण शरीराच्या कसरतीने देता येते, बौद्धिक शिक्षण बुद्धिच्या कसरतीने देता येते, त्याप्रमाणे आत्मिक शिक्षणसुद्धा आत्म्याच्या कसरतीनेच देता येणार. आत्म्याची कसरत शिक्षकाच्या वर्तनानेच प्राप्त होणार. म्हणून युवक पहात असोत वा नसोत, सदासर्वदा शिक्षकाने सावधान राहिले पाहिजे. लंकेमध्ये बसूनही शिक्षक आपल्या वर्तनाने शिष्याच्या आत्म्याला हलवू शकेल. मी खोटे बोलत गेलो आणि स्वतःच्या शिष्यांना मात्र सच्चे बनवण्याचा प्रयत्न केला तर तो व्यर्थ जायचा. भित्रा शिक्षक शिष्यांना शौर्य शिकवू शकणार नाही. व्यभिचरी शिक्षक शिष्यांना संयम कसा शिकवणार ?
इ) जे हिंदी आईबाप आपल्या मुलांना बालपणापासूनच इंग्रजी बोलणारी बनवितात; ते त्या मुलांचा व देशाचा द्रोह करतात. मला असे वाटते की त्यामुळे मुले आपल्या देशाच्या धार्मिक व सामाजिक वारशापासून दूर रहातात. आणि तेवढ्या अंशाने देशाची किंवा जगाची सेवा करण्यास कमी लायक बनतात.
ई) आपल्यामध्ये असा एक चुकीचा समज आहे की पहिल्या पाच वर्षामध्ये मुलांना शिक्षणाचीवगैरे जरुरी नसते. वस्तुस्थिती अशी आहे की पहिल्या पाच वर्षात मूल जेवढे मिळवते; तेवढे मागून सबंध  आयुष्यात मिळवू शकत नाही. मुलाचे शिक्षण आईच्या उदरातूनच सुरु होते. गर्भधारणेच्या वेळी मातेची प्रकृती, मातेच्या आहार विहाराची बरीवाईट फळे, यांचा वारसा घेऊनच बालक जन्माला येते. जन्मल्यानंतर ते आईबापांचे अनुकरण करु लागते आणि कित्येक वर्षापर्यंत त्याच्या विकासाचा आधार सर्वस्वी आईबापांवर रहातो.
उ) हिंदू धर्माने गुरुपदाला जे स्थान दिले आहे, ते मला सर्वस्वी मान्य आहे. गुरुशिवाय ज्ञान अशक्य आहे. हे वाक्य बहुतांशी खरे आहे. अक्षर ओळख करून देणारा शिक्षक अर्धकच्चा असला तरी काम चालू शकेत; परंतु आत्मदर्शन करून देतो म्हणणारा अपूर्ण असून चालणार नाही. गुरुची पदवी संपूर्ण ज्ञान्यालाच देता येईल.
(३) उपासना - उपासना, प्रार्थना वगैरे गोष्टी झूठ नाहीत, तर आपण खातो, पितो, बसतो, उठतो हे जितके खरे आहे, त्याहूनही या गोष्टी जास्त प्रमाणसिद्ध आहेतं. नव्हे याच गोष्टी खर्‍या आहेत; बाकी सर्व फोल आहेत. उपासना, प्रार्थना हा वाणीचा विलास नव्हे, त्याचे उगमस्थान कंठ नव्हे तर हृदय होय. म्हणून जर आपण आपले हृदय शुद्ध राखले, तेथे असलेल्या तारा व्यवस्थित ठेवल्या तर त्यातून जो सूर निघेल तो गगनाला भेदून जाईल. त्यासाठी जिभेची आवश्यकता नाही . विकाररुपी मळाच्या क्षालनासाठी अंतःकरणापासून केलेली उपासना ही एक महौषधी आहे. त्याबद्दल मला शंकाच वटत नाही. परंतु तो प्रसाद मिळवायचा तर आपल्यामध्ये संपूर्ण नम्रता पाहिजे.
४) अहिंसा - अ) अहिंसा हे सत्याच्या शोधाचे मूळच आहे. ते हाती आले नाही; तोपर्यंत सत्य सापडणे अशक्य आहे  या गोष्टीचा मला क्षणोक्षणी अनुभव येत आहे. कृत्याविरुद्ध झगडा केलेला शोभेल पण कर्त्याविरुद्ध झगडा करणे म्हणजे स्वतःशीच झगडण्यासारखे आहे. कारण आपण सर्व एकाच कुंचल्याने रंगविलेली चित्रे आहोत. एकाच ब्रह्मदेवाची प्रजा आहोत. कर्त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती साठवलेल्या आहेत. कर्त्याचा अनादर - तिरस्कार करायचा म्हणजे त्या शक्तीचा अनादर होतो आणि तसे करण्याने कर्ता व जग दोघांनाही नुकसान होते.
आ) अहिंसा ही व्यापक वस्तू आहे. आपण हिंसेच्या वणव्याच्या मध्यभागी सापडलेले पामर प्राणी आहोत. 'जीवो जीवस्थ जीवनम' हे वचन खोटे नाही. मनुष्य एक क्षणभरही बाह्य हिंसेशिवाय जगू शकत नाही. पाणी पिता, बसता, उठता सर्व क्रिया करताना इच्छा असो व नसो थोडीतरी हिंसा तो करीतच असतो. त्या हिंसेमधून सुटण्याचा तो महत्प्रयास करीत असेल, त्याची भावना केवळ दयेचीच असेल, तो सूक्ष्मात सूक्ष्म जंतूंचाही नाश इच्छित असेल आणि यथाशक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो अहिंसेचा पुजारी होय. त्याच्या हरएक कार्यामध्ये नेहमी वाढता संयम राहील, त्याची करुणावृत्ती निरंतर वाढत जाईल पण काही झाले तरी कोणीही देहधारी बाह्य हिंसेपासून  सर्वथैव  मुक्त होऊ शकत नाही.
इ) अहिंसेचा पाया अद्वैत भावना आहे. आणि जर प्राणिमात्र अभिन्न आहेत तर एकाच्या पापाचा  परिणाम दुसर्‍यावर होणारच. त्यामुळेही मनुष्य हिंसेपासून सर्वथैव मुक्त राहू शकत नाही. समाजात वावरणारा मनुष्य इच्छा नसतानाही समाजाच्या हिंसेत भागीदार बनतोच.
ई) अहिंसेच्या दृष्टीने हातात बंदूक धरणारा व त्याला मदत करणारा यांच्यामध्ये भेद मला तरी दिसत नाही. जो मनुष्य लुटारुंच्या टोळीमध्ये त्यांची पडेल ती चाकरी करण्यासाठी, त्यांची ओझी उचलण्यासाठी, ते लूट करीत असतील तेंव्हा पहारा करण्यासाठी, ते घायाळ झाल्यास त्यांची सेवा करण्यासाठी रहातो तो लुटीबद्दल लुटारुंइतकाच जबाबदार आहे.
उ) आत्मशुद्धी खेरीज आहिंसा धर्माचे पालन सर्वथैव अशक्य आहे. अशुद्धता परमात्म्याचे दर्शन करु शकत नाही
ऊ) मनुष्य जोपर्यंत आपण होऊन स्वतःला सर्वांच्या शेवटी नेऊन बसवीत नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. अहिंसा ही नम्रतेची परकाष्ठा होय. आणि या नम्रतेविना मुक्ती कधी काळी शक्य नाही ही अनुभव सिद्ध गोष्ट आहे.
आ) सत्यापरता कोणी परमेश्वर असल्याचा मला अनुभव नही. सत्यमय होण्यास अहिंसा हाच एक मार्ग आहे.


                                              [मोहनदास करमचंद गांधी यांच्या  "आत्मकथा"  पुस्तकामधून ]