मधुबनी चित्रकला 

           मधुबनी हा चित्रकलेचा एक प्रकार आहे.मधुबनी फक्त कला नसून रोजची आराधना आहे. मधुबनीतील आकार आदर्श आकार नसूनही त्यातील भावना, रचना, रेखांकन - रंगांकन व कलाकारांची वर्षांनुवर्षाची साधना या चित्रांना अध्यात्माची जोड देते. अतिशय साधी अशी ही चित्र, कलाकाराच्या भाव-भक्तिपूर्ण रेखांकनामुळे परमेश्वराच्या निर्गुण- निराकार स्वरुपाकडे घेऊन जातात.
          मधुबनी नावातच जागेच वर्णन आहे. 'मधु बन' म्हणजच 'मधाच वन' या वनात शतकानु- शतके राहणार्‍या लोकांनी आपल्या श्रध्देने सुरु केलेली चित्रमय पूजा म्हणजे मधुबनी चित्रकला. मंत्राद्वारे नृत्याद्वारे मंदिरात साकारली जाणारी पूजा येथे चित्रांद्वारे होते. सहजता, भावना, रचना, हे या चिन्हांकीत चित्रांचे विशेष गुणधर्म आहेत.
          ही मध्यप्रदेशातील लोककला आहे. मध्यप्रदेश हा प्राचीन मिथीला, नगरीचा प्रदेश; म्हणून यास 'मिथीलाशैली' असेही म्हणतात. येथे आंबा व जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे चित्रात पिवळ्या व जांभळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्याशिवाय लाल रंगही मोठ्याप्रमाणात वापरतात. त्यांच्या इतर छटांचा वापरही क्वचित होतो. चित्राची रचना भरपूर आकारयुक्त असेल,  तर रंगाबरोबर, आकारातील फरक दर्शवण्यासाठी तिरक्या, बारीक, जवळ जवळ काढलेल्या रेषांनी वेगळेपणा दर्शवतात. आधीच सांगितल्या प्रमाणे मधुबनीतील आकार ( मानवाकृती )  आदर्श नसतात. बर्‍याचदा एकाच व्यक्तीने काढलेल्या मानवाकृतींचे चेहरे समान नसतात. त्यामुळे चित्रे चिन्हांवरून ओळखता येतात. त्यामुळे या शैलीत चिन्हांना अनन्यसाधारण मह्त्त्व असते.
            मधुबनी चित्रशैली तीन विचारधारांवर आधारली आहे.
            १) शैवविचारधारा.    २) शाक्तविचारधारा.   ३) वैष्णवाविचारधारा.                    
नावावरुनच लक्षात येते की अनुक्रमे भगवान शिव, शक्ती म्हणजे देवी, व विष्णु देव यांवर या विचारधारा आधारित आहेत.
           १) शैव विचारधारा - मधुबनीवर सहाव्या शतकापर्यंत या विचारधारेचा प्रचंड प्रभाव होता. अजूनही या विचारधारेवर चित्रे काढली जातात. परंतु प्रमाण तुलनेने कमी आहे.. या चित्रांसाठी डमरु, नाग, त्रिशुळ,  गंगा, चंद्र, तिसरे नयन इत्यादी चिन्हांचा वापर होतो. आद्य दैवतावर आधारीत असलेल्या या चित्रांना. 'शैवविचारधारैतील' चित्र म्हटले जाते.
            २) शाक्तविचारधारा - भारतात मातृशक्तीला वंदन करायची पध्दत आहे. देवता ह्या जीवनादायी, वाहकता, अगाधता, तारक, बुध्दी, कला, अशा प्रत्येक रुपात पुजल्या जातात. उदा :-
१ .देवी सरयु वाहकतेचे प्रतिक.
२. देवी सरस्वतीला विद्या व कलेची देवता म्हणून पूजतात.
३. कालीमातेला तिचे शौर्य म्हणजेच मारक गुण व कमनीयता यासाठी पूजतात.
४. देवी दुर्गेला माता व तारकशक्ती या रुपात पूजतात.
५. देवी लक्ष्मी धन, धान्यासाठी पूजली जाते.
६. अदितीला आदिमाता - अवकाशधारिणीच्या स्वरुपात पूजतात.
७.उषेला (म्हणजे पहाट) स्वर्ग कन्येचा दर्जा आहे. सुर्योदयाची ग्वाही देणार्‍या हिची पूजा सूर्यदेवाबरोबरच केली जाते.
८. देवी सरमेला मातृदेवता म्हणून पूजले जाते. तिला बाळाला जन्म देतानाच्या स्थितीत पूजतात.
९. देवी पार्वतीला शक्तीस्त्रोत आदिशक्तीच्या रुपात पूजतात.
           या सर्व देवता मानवाकृतीशिवाय अथवा मानवाकृतीसकट त्यांच्या आसने, आयुधे व वाहने या चिन्हांद्वारे दर्शवतात.
उदा.
*  लक्ष्मी - कमळ, हत्ती.
*  काली - जीभ बाहेर आलेला चेहरा.
*  दुर्गा - पायाखाली चिरडलेला राक्षस.
* पार्वती -दहा हातात दहा आयुधे.
या व अशा अनेक चिन्हांद्वारे देवता  साकारल्या जातात. य दैविक गुणचिन्हांवर आधारीत विचारधारेला शाक्तविचारधारा म्हणतात.
३) वैष्णवविचारधारा -  भगवान विष्णुच्या दशवतारातील दोन प्रमुख अवतार म्हणजे श्री राम व श्री कृष्ण. ही दोन्ही रुपे भगवान विष्णुची त्यामुळे या दोन्ही अवतारांच्या गुणचिन्हांनी युक्त असणार्‍या चित्रांना वैष्णवविचारधारेतील चित्रे असे म्हणतात. या विचारधारेतील चित्रांमध्ये दोन भाग पडतात. ते म्हणजे अर्थातच रामशाखा व कृष्णशाखा.
* रामशाखा- या शाखेत रामापेक्षा जास्त महत्त्व सीतेला दिलेले दिसून येते. सीताही 'जनककन्या'. राजा जनक हा मिथीलेचा पालनकर्ता, त्यामुळे येथे सितेला आजही माता, पुत्री, राजकुमारीचे स्थान आहे. तिच्याबद्दलची हिच आत्मीयता त्यांच्या चित्रांतून दिसते. त्यांचे विषयही सितेवर आधारित आहेत असे चित्रांतून दिसते. चित्रांमध्ये श्री राम कोठेही एकटा नाही, त्याच्या बरोबर सीता प्रत्येक चित्रात आहे. त्यांचे विषय  सितास्वयंवर, सितेची पाठवणी, सिताहरंण, हनुमान राम व सित यांना खांद्यावरून नेत आहे या प्रकारचे असतात.
कृष्णशाखा - मिथीललेतील कवी जयदेवाच्या 'गितगोवींद' या दिर्घकाव्यामुळे तेथील स्त्रियांना श्री कृष्णाचाही लळा आहे. कृष्णाच्या बाललीला हा सर्वांचाच प्रीय विषय. याच विषयावर आधारित चित्रे येथे रेखाटली जातात. येथे महाभारतातील द्वारकानरेश, कुटनीतीतज्ञ कृष्ण कोठेही नाही.त्यांचे नेहमीचे
विषय- राधाकृष्ण, रासलिला, कालीयामर्दन गोवर्धन पर्वत असे असतात.
          मधुबनी चित्रांमध्ये राम व कृष्ण दोघांनाही जांभळया रंगात दर्शवतात. दोघांचीही केस व मुकूट रचना समान असते. परंतु कृष्ण दर्शवताना हातात बासरी दर्शवतात अथवा आसपास गाय असते. या चिन्हांवरुन चित्र  कोणत्या शाखेचे आहे ते लक्षात येते.
           या तीन मह्त्त्वाच्या विचारधारा काही पारंपारिक प्रकारात काढल्या जातात. काहीवेळेस नुसती पाने / फुले पक्षी यांचीही चित्रे रेखाटली जातात. मधुबनी चित्रांचे प्रकार पुढीलप्रमाणे.
पटचित्र - पटचित्र हा चित्रकथीचा म्हणजे चित्रांद्वारे कथा सांगण्याचा प्रकार आहे. यात प्रामुख्याने वैष्णवविचारधारेतील चित्रे अथवा कथा काढतात.
अरिपन - रांगोळीला मध्यप्रदेशात, अरिपन, असे संबोधतात. मुळ शब्द 'अर्पण' याचे अपभ्रंशित रुप म्हणजे अरिपन. भू- मातेच्या वात्सल्या बद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमिनीवर जी चित्रे काढून तिला अर्पण केली जातात तिला 'अरिपन' म्हणतात. जमिन शेणाने सारवून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची पिठी घेवून रांगोळी काढली जाते. यात सिंदूर व गेरूचाही समावेश असतो.
कौहबर - भिंतीवर लग्नसमयी काढण्यात येणार्‍या चित्रांना कोहबर म्हणतात.
              प्रथम कुलदेवतेची पूजा केली जाते. मग तिच्याकडे शुभेच्छा मागितल्या जातात. मग जिथे कुलदेवता स्थापना केली त्याच्या मागिल भिंत चुन्याने रंगविली जाते. मग त्यावर ही वीस ते पन्नास फुटी चित्रे काढण्यात येतात. चित्रे प्रतिकात्मकरित्या चितारली जातात. बांबू, कमळाचे पान, कासव, मासा, श्री यंत्र, धनधान्य , पोपट अशी चिन्हे वापरतात. या प्रत्येक चिन्हाचा त्याच्या गुणांनुसार अर्थ आहे.

          चुन्याच्या गिलाव्यानंतर गेरु अथवा हळदीने ही चित्रे रेखाटतात. चित्र  रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करतात.

कामयुग्म - पूर्वीच्यावेळी  स्त्रि - पुरुष संबंधांवर माहिती मिळणे कठीण होते. त्यामुळे अनेकदा मुलींमध्ये अथवा मुलांमध्ये गैरसमज निर्माण होत असत. अशावेळी पती-पत्नींच्या सुखकर सहजीवनासाठी, काम संबंधांवर आधारित चित्रे रेखाटली जात. ही चित्रे नव्याने लग्न झालेल्या नवर्‍या मुलाच्या खोलीत लावली जात. लग्नानंतरचा ठराविक काळ वधुवरांना या खोलीत व्यतीत करावा लागे. आता माध्यमांच्या उपलब्धतेमुळे  ही प्रथा मागे पडली आहे.
नैना - चेकवा - ही चित्रे बहीण  आपल्या भावासाठी त्याला दिर्घायुष्य लाभावे म्हणून काढते. मुली कौमार्यावस्थेत असताना ही चित्रे काढतात. असे म्हटले जाते की, पुढील आयुष्यात त्यांना काढाव्या लागणार्‍या अनेक चित्रांची ती पहिली पायरी असते. हा त्यांच्या प्रशिक्षणाचा काळ असतो.
सिंगारदान - याचा अर्थ, अर्थातच 'कुंकवाचा करंडा' असा होतो. या करंड्यांवर चित्रे काढली जातात; ती लग्नानंतर मुलीच्या सासरी पाठवतात.
            मुलीच्या लहानपणापासून घरातील स्त्रियांबरोबर बसून तिने जी काही भांड्यांवर, कापडावर, टोपल्यांवर, चित्रे काढली अथवा कशिदा काम केले असेल ते सर्व दहेज अथवा माहेरच्या लेण्यांस्वरुपात सासरी जाते.
            अतिशय सुंदर अशीही कला, वर्षानुवर्ष घरातल्या स्त्रियांसमवेतच राहिली. १९६० साली भास्करराव कुलकर्णी नावाचे गृहस्थ जेंव्हा मध्यप्रदेशात गेले, तेव्हा त्यांनी तेथील बायकांना रोज या प्रकारची चित्रे काढताना पाहिले. माध्यमाची समज, विषयाची ठेवण, रंगकाम, रचना यांसारख्या गोष्टी चित्रांत किती नैसर्गिकरित्या येताहेत हे जगासमोर आणायचे. ठरवले.अनेक गावात फिरून शेकडो चित्रे पाहिल्यावर त्यांनी त्यातील उत्तम कलाकार स्त्रिया निवडल्या उदा. जबलपूर मधून - उषादेवी, सितादेवी, जगदंबादेवी तर राँटीमधून  महासुंदरीदेवी अशा काही स्त्रियांकडून चित्रे काढून घेतल्यावर त्यांनी ती देशात व प्रदेशात विकली. त्या कलकार स्त्रियांना रोजगार मिळालाच परंतु भरतातील एक अतिशय निरागस व मधुर लोककला जगासमोर आणून, तिला जगमान्यता देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.
            आता काही गावांमध्ये हा रोजगारीचा एक प्रकार झाला आहे. तरी इतर स्त्रिया आपल्या वर्षानुवर्षाच्या दिनचर्येप्रमाणे अजूनही  स्वतःला झोकून देऊन ही ईश्वरोपासना करतच आहेत.


लेखक : गार्गी कोचरेकर