निवृत्ती 

            निवृत्तीची कल्पना तशी पुरातनच. फार पूर्वी आपल्याकडे आश्रम व्यवस्था होती. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रम व्यवस्थेत निवृत्तीची कल्पना अभिप्रेत आहे. मुले कर्तीसवरती झाली की त्यांना राज्याभिषेक करून राज्याची धुरा मुलांवर सोपवणार्‍या आणि केवळ मार्गदर्शक बनणार्‍या कितीतरी राजांची उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. आपल्याकडे स्वतःचे व्यवसाय असणार्‍या दुकानदार, डॉक्टर आदि लोकांत ही कल्पना अजूनही काही प्रमाणात आहे. या व्यक्ती कधी निवृत्त होत नाहीत तर हळूहळू आपल्या व्यवसायाचा कार्यभार मुलांवर सोपवून मार्गदर्शकाचे काम करताना दिसतात. अशा व्यक्ती आपल्या जबाबदार्‍यांतून अंशतः मोकळे होत आपला शारीरीक मानसिक ताण कमी करतात. पण आपल्या व्यवसायातून पूर्णत: निवृत्त होत नाहीत. निवृत्तीचा प्रश्न येतो तो नोकरदार मंडळींचा. वयाच्या १८ व्या वर्षापासून ५८ व्या वर्षापर्यंत अनेक नियम,  अनेक  बंधने, अटी पाळून काम करत करत शेवटी त्या कामातून निवृत्त व्हावे लागते. म्हणजे एक ठराविक चाकोरीबद्ध जीवनातून पूर्णपणे वेगळे व्हावे लागते. चालत्या गाडीला रामराम ठोकून बाहेर पडावेच लागते.
           वृत्त म्हणजे बांधलेले आणि निवृत्त म्हणजे बंधनातून मुक्त. एखाद्याच्या सेवेतून वा नोकरीतून वा कार्यातून मुक्त. आतापर्यंत मिळवलेल्या ज्ञानाची, अनुभवांची शिदोरी बरोबर घेऊन स्वतःच्या इच्छा आकांक्षा साकार करण्यासाठी निवृत्तीनंतर सिद्ध व्हायच. आतापर्यंत दाबून ठेवलेल्या असंख्य उर्मींना मोकळी वाट करून द्यायची आणि जगायच एक स्वतंत्र बंधन रहित मोकळ जीवन. बांध घालून अडविलेल्या पाण्याचा बांधच उडवून लावल्यावर पाणी जस असंख्य वाटांनी  धाव घेते, तसे हे निवृत्त जीवन. चरितार्थासाठी नोकरी करत असताना गुंडळून ठेवलेल्या सार्‍या अपुर्‍या इच्छा आकांक्षा पूर्ण करुन घेऊन मनुष्यजीवन सार्थकी लावण्याचा हा काळ. म्हणूनच निवृत्त व्हायच ते केवळ नोकरीतून आणि सुरु करायच आपल नवीन जीवन. कारण निवृत्ती म्हणजे जीवनाच्या एका टप्प्याची समाप्ती आणि दुसर्‍या टप्प्याची सुरुवात. अर्थात हा दुसर्‍या टप्पा बंधनरहित असला तरी कानात वार भरलेल्या  वासरागत त्याची मोकाट अवस्था असणार नाही, किंवा शाळेला सुट्टी मिळाली म्हणून बंधनरहित उनाड पोरागत वागणही जमणार नाही. कारण निवृत्त जीवन म्हणजे एक परिपक्व जीवन. एखाद्या पक्व झालेल्या फळावरील साल आणि गर निघून गेला की रहाते एक टणक सक्षम बी, भोवतालची बंधने गळून पडल्यावर मनाप्रमाणे नवीन रोप निर्माण करण्याची क्षमता असलेली ही छोटीशी बी निवृत्त व्यक्तीला बरच काही सांगून जाते. "टणक साल आणि मऊ मुलायम गराची बंधने गळून पडली तरी मी असहाय्य नाही. एक वेगळे असे नवीन जीवन निर्माण करण्याची सृजनशीलता माझ्यात आहे." असेच जणू ती दाखवून देते. निवृत्त व्यक्तीच जीवन या बी सारख स्वयंपूर्ण, बांधिलकी विरहित, अनुभवांनी समृद्ध अस जीवन असत.
           निवृत्तीचीही वृत्ती असावी लागते तरच ती निवृत्ती स्वतःसाठी आणि इतरांसाठीही आनंददायी होऊ शकते. कारण निवृत्तीमध्ये दडलेला असतो त्याग. आणि बदलल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची शारीरिक, मानसिक तयारी. बीला अंकूर फुटून नवे रोप तयार होत असते; तेव्हा मुळात त्या बीला जमिनीत गाडून घ्यावे लागते. तिच बी पणच तेंव्हा नाहीस होत असत. आणि  त्याचवेळी फुटलेली नवी पाळेमुळे जमिनीत घट्ट रुजवावीही लागतात. तरच अंकुरलेल नव रोप तरारुन वर येते. निवृत्त व्यक्तीचही तसच असत. ज्या पेशातून ती निवृत्ती होत असते त्या पेशाचा, त्या ठिकाणी असलेल्या अधिकाराचा त्याग करून नवीन निवडलेल्या उद्योगात घट्ट पाय रोवण्याची तयारी निवृत्त व्यक्तीत असली पाहिजे. थोडक्यात भूतकाळातील मी पणा विसरून स्वतःला नव्याने घडवायचे असते. आतापर्यंतच आपल आयुष्यरुपी फळ हे माता पिता, इतर नातेवाईक आणि परिसर यांच्या आचार विचार व संस्काररुपी रसाने भरलेले असते. साठ वार्षाच्या या असंख्य अनुभवांच्या रसातून नेमके कोणते रस आपण आपल्यात साठवले यावर आपले निवृत्त जीवन अवलंबून असते. किडक्या बी चे रोप जसे तरारून वर येणार नाही तसेच आपणही क्लेशकारक अनुभवांचीच शोदोरी घेऊन निवृत्त जीवनास सुरुवात केली तर निवृत्तीनंतरचे जीवनही क्लेशकारकच होईल. म्हणून  वाईट अनुभवांचा त्याग तेथेच करून; चांगल्याला कवटाळून; नव्या आयुष्याची सुरुवात केली; तर सारेच मंगलमय होईल.
           निवृत्तीत बदल अपेक्षित आहे. निवृत्तीची ही कल्पनाच नैसर्गिक आहे. कारण मुळात निसर्गालाच तोचतोचपणा नको आहे. सतत बदल हवा आहे. झाडाला छान पोपटी कोवळी पाने येतात ती वाढतात त्यांचा पोपटी रंग हिरवा होतो. आणखी हिरवा, आणखी हिरवा होत होत काळपट हिरवा बनतो आणि नकळत अचानक तो पिवळा होतो. पान पिकत, वृद्ध होत आणि एक दिवस गळून पडत. वृक्षाला जीवनरस पुरवण्याच्या आपल्या कार्यातून ते मुक्त होत. आणि नवीन पालवीसाठी जागा रिकामी करून देत. निसर्गाच्या सहा ऋतूच्या सहा  सोहळ्यातही  निवृत्ती आहेच. एक ऋतू येतो; ठराविक कालानंतर निवृत्त होतो आणि त्या ठिकाणी दुसर्‍या ऋतूचे आगमन होते. 'मृत्यू' ही सुद्धा एक नैसर्गिक निवृत्तीच नाही का ? एका जीवनातून मिळालेली निवृत्ती म्हणजे मृत्यू .पुन्हा दुसरा जन्म आणि नवीन अवस्था . तेव्हा तर निवृत्तीनंतर सार शरीरच बदलून जाते. म्हणूनच तर मृत्यूची भीती वाटते. जे जे सजीव आहे. तेथे तेथे निवृत्ती आहेच. निर्जीवाला मात्र निवृत्ती ठऊकच नाही. अशावेळी मनात येते आमचे पुढारी कधी आपण होऊन निवृत्तच होत नाहीत मग ते निर्जीव का आहेत.?
            निवृत्ती म्हणजे एका पिढीने दुसर्‍या पिढीसाठी केलेला त्याग. निवृत्ती ही काळाची गरज आहे. जुन्या पिढीने नवीन पिढीला दाखवलेला आदर, विश्वास त्यात सामावलेला आहे. त्यात समर्पणाची भावना आहे. जेजे आपण कमावल, जे धन जे ज्ञान, जे अनुभव आपण मिळवले ते दुसर्‍या पिढीकडे सुपूर्त करून विश्वसंसाराच गाडा पुढे चालू ठेवण्यास लावलेला हातभार म्हणजे निवृत्ती. दुसर्‍यासाठी त्याग करण्यासाठी त्याग करण्याची ज्याची तयारी आहे; ज्याला इतरांवर विश्वास आहे; त्याला निवृत्तीची भिती वाटणार नाही आणि त्याचे निवृत्त जीवन कंटाळवाणेही होणार नाही. कारण अशी सर्वस्व त्याग केलेली व्यक्ती नवे अनुभव, नवे ज्ञान मिळवण्यास पूर्ण रिकामी झालेली असते. सर्व बंधनातून मुक्त होऊन नाविन्याचा आस्वाद घेण्यसा ती सदैव तयार असते. त्यामुळे अशी निवृत्त व्यक्ती घरच्यांना आणि इतरांना अडगळ वाटत नाही तर ते बनते एक कृतार्थ निवृत्त जीवन.