बांधिलकी 

            "अग आजी किती  वेळा सांगितल तुला कि मला हा तुझा तूप, बदाम, चारोळी वगैरे घालून केलेला लाडू नको म्हणून किती मेहनतीने मी माझे वजन कमी केलय! जाडी वाढली तर लोक हसतील ना मला !" शालिनीताईंची नात शालिनीताईंना इतक्या मोठयाने ओरडून सांगत होती की समोरच्या आमच्या घरात हॉलमध्ये T V बघत बसलेल्या मला तिच सार बोलण स्पष्ट ऐकू येत होत. आणि शालिनीताईंचा चेहरा न बघताच त्यांच्या डोळ्यातील पाणीही दिसत होत. शालिनीताईंची हिच लोक हसतील अस म्हणणारी नात टिचभर टॉप आणि पार्श्वभाग जेमतेम झाकला जाईल इतक्या खाली येईल अशी जिन्स घालून काल माझ्या लेकीला बिनधास्तपणाचे धडे देत होती. तेंव्हा तिच अस मत होत की लोकांना कशाला घाबरायच ? आपल्याला वाटल कि आपण घालावे आपल्याला आवडतील तसे  कपडे . ती म्हणत होती,"आपल्याला  नाही बुवा कुणाच्या बंधनात रहायला आवडत. मी  मला वाटेल तसे कपडे घालते आणि बिनधास्तपणे केंव्हाही कोठेही फिरते." माझ्या मनात आल, "स्वत:च्या शरिराचा आकार जपणार्‍या शालिनीताईंच्या नातीने एक लाडू खाऊन आपल्या आजीच मन जपल असत  तर !"
           'मुक्त आम्ही  स्वतंत्र आम्ही'  असे म्हणून आपलीच पाठ थोपटणार्‍या या मुलीप्रमाणेच मुक्तता आणि स्वातंत्र्य याचा आपण खर्‍या अर्थाने कधी विचार करतो का ? असा प्रश्न अनेक वेळा माझ्या मनात अचानक उपस्थित होतो. मुळातच जे बांधलेल आहे ते मोकळ सोडल की मोकळेपणा येतो, दडपण नाहीस होत हे खरे पण ही बांधिलकी का ? कोणी ? आणि केंव्हा आपल्यावर लादली ? आपला जन्म होणे हीच मुळात मुक्तता. नऊ महिने आईच्या पोटात कसल्या कसल्या घाणीत खितपत पडलेले आपण; नऊ महिन्यानी मोकळा श्वास घेतो; तोही रडतच.  का बर रडतो आपण ? मातेच्या उदरातून मुक्तता झाली, आता स्वतंत्रपणे जगायच याचा आनंद तेंव्हाही आपल्याला का होत नाही ? ती स्वातंत्र्याची भीती असते; की नव्याने पुन्हा बांधले जाणार म्हणून जीव घाबरा होतो?  एवढच जाणवत कि नऊ महिन्यानंतर स्वातंत्र्य मिळूनही आपण रडतच बाहेर येतो.
           माणसाच्या प्रारंभिक अवस्थेत मनुष्य पूर्णपणे मुक्त होता. पशुपक्ष्यांप्रमाणे नागडा उघडा भटकत होता. मिळेल ते मिळेल तेंव्हा आणि मिळेल तसे खात होता. मनसोक्त पणे कोठेही कसाही भटकत होता. पण त्या मुक्ततेत होती भीती निसर्गाची, आणि इतर प्राण्यांचीही. ही भीती नष्ट करण्यासाठी उपाय शोधला  पाहिजे, प्रगती केली पाहिजे; हा विचार त्याच्या डोक्यात आला. आणि मग त्या प्रगती करण्याबरोबरच तो एकेका बंधनात अडकू लागला. मुक्ती, भीती, प्रगती आणि बांधिलकी असा हा माणसाचा प्रवास.
           थंडी, ऊन, वारा, पाऊस, यापासून संरक्षण हवं म्हणून अंगाभोवती पाने, वेली मग कपडे लपेटू लागला. इतर प्राण्यांपासून संरक्षण म्हणून गुहेत राहू लागला. मग गुहेतून घरात आला. आणखी संरक्षण म्हणून घराभोवती कुंपण आल. भविष्य काळाची चिंता म्हणून अन्नधान्याचीही बचत करण्याचे बंधन पाळू लागला. मुक्त माणूस बंधनात अडकला तो असा भीतीपायी. याच भातीमुळे चार माणसे एकत्र राहू लागली. चाराची आठ, आठची सोळा, अस होता होता समूह झाला. मग समुहाचा समाज बनला. पण म्हणून भीती कमी झाली अस नाही. मग या समुहांना,समाजाला आपल्यातीलच इतर लोकांची भीती वाटू लागली. मग त्यांनी सर्वमान्य असे नियम तयार केले. इतकच नाही , तर नियम तोडणार्‍यांसाठी शिक्षाही ठरविल्या. आणि मग मनुष्य या सामजिक बांधिलकी मध्ये पुरता अडकला. ही सामाजिक बांधिलकी निभावताना मनुष्याला मग स्वतःचीच भीती वाटू लागली. आपल्या हातून काही चुका तर होणार नाहीत नां ? या भावनेतून त्याने स्वतःच स्वतःला अनेक जबाबदार्‍यांच्या बंधनात गुरफटून घेतलं . बंधन तोडली तर इतरांपासून वेगळे होऊ ही भीती. नातेवाईक, शेजारीपाजारी काय म्हणतील; आपल्या कृतीचा भविष्यकालीन परिणाम काय होईल; ही भीती. अशा अनेक प्रकारच्या भीतीमुळेच आपण आपल्याला अनेक बंधनात घट्ट लपेटून घेतो. बंधने ही जणू आपली कवचकुंडले बनतात. अपयश आल, चुका झाल्या की 'मी अमुक एक गोष्ट करणार होतो पण काही बंधन पाळावीच लागतात ना ?" वगैरे बचावात्मक वाक्यांची ढाल पुढे करुन आपल्याला सुटका तर करून घेता येते. शिक्षण, नोकरी, लग्न या सार्‍यांचाच विचार मग आपण या असंख्य बंधनात लपेटून घेऊनच करत असतो. केवळ मला करावेसे  वाटते म्हणून मी ते करणारच; असे म्हणणारे थोडेच असतात. पण तेच असतत खरे निर्भय मोकळ्या विचारांचे; अन येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणारे. असे लोकच मुक्ततेचा खरा आनंद उपभोगू शकतात. रस्त्यावर उघडी नागडी फिरणारी, दगडधोंड्यात खेळणारी, चिखलात लोळणारी मुले पाहिली की मुक्तता  म्हणजे काय ते पहायला मिळते. ना समाज काय म्हणेल याची चिंता. ना उद्याची भीती. मनाला येईल तसे जगायचे. मिळेल ते खायच. हव तेव्हा हवतस हसायच. आणि रडायचही तसच. मोठमोठ्याने बोलायच. आणि कशाचीही लाज ना बाळगता मिळेल ते काम करायच. हेच त्यांच मुक्त आयुष्य. अस्सल नैसर्गिक जीवन ते हेच. उलट बंदिस्त ब्लॉकमध्ये रहाणारी मुले मनानही बर्‍याचवेळा बंदिस्तच असतात. मोजकच बोलण आणि कृत्रिम वागण. सदैव धास्तावलेली ही मुले खर्‍या अर्थाने मुक्ततेचा आनंद उपभोगूच शकत नाहीत. लहानांच एक उदाहरण दिल. पण मोठ्यांच विश्व  या पेक्षा वेगळ का असत ? पण मग प्रगती पथावर कोण असत ? बंधनरहित आयुष्याला सुद्धा योग्य दिशा मिळण आवश्यकच असत. नाहीतर तुटलेल्या पतंगासारख ते भरकटतच जात. अतिबंधन जशी त्रासदायक; तसा अतिमोकळेपणाही  त्रासदायकच.
          जेथे जेथे बंधन आहेत तेथे प्रगती आहे. मग ती बंधन स्वतःच स्वत:वर लादलेली असोत; वा इतरांनी  घातलेली असोत. आचार विचारांच, बोलण्याचालण्याच, काळवेळेचे बंधन थोड्याफार प्रमाणात जो स्चीकारेल त्याच प्रगतीच्या मार्गावर स्चागतच होईल. स्वैर स्चच्छंदपणे आकाशात भरारी मारणारा पक्षीसुदधा अंधार पडताच घरटयात यायच बंधन पाळतोच की. दुथडी भरून खळाळत वाहणारी नदी काठाच बंधन पाळते म्हणून तर तिला नदीच रुप प्राप्त होत. अथांग पसरलेल्या सागराला किनार्‍याच बंधन असतच. झाडांची मूळ जमिनीच्या बंधनात  रहातात म्हणून तर ती उंच उंच वाढतात. या मुळांनी ठरवल प्राणीही सजीव आपणही सजीव.  मग आपणच कां या बंधनात अडकून रहायच ? हे प्राणी फिरतात तसे आम्हीही फिरणार. तर चालेल का ? तस पाहिल तर संपूर्ण विश्वच मुळी बंधनात अडकलेल.  सार गतीमान पण तरीही बंधनात बांधलेलच.
            बंधनातही सौंदर्य आहे हे काही नव्याने  सांगायला नको. आपल्या शरिराचा हवा तो अवयव विशेष उठून दिसावा म्हणून तंग कपडे घालून त्याला उठाव आणतो; आणि एखादा अवयव जर शरिराबाहेर सुटू लागला तर डाएट, योगासने वगैरेची मदत घेऊन आपण त्याला आकारात ठेवतो. संपूर्ण समाज हे एक शरीर आहे अस मानल तर या समाजरुपी शरीराचा आपण एक अवयव आहोत. तो ठसठशीतपणे लोकांच्या नजरेत भरावा अस आपल्याला वाटत असेल तर आपणही आपल्याला काही बंधनात जखडून घ्यायला पाहिजे नाही का ? नाहीतर या समाजरुपी शरीराचा आकारच बदलून जाईल. समाजातील प्रत्येक पेशाची, नात्याची, वयाची काही बंधने असतात. शिक्षक, डॉक्टर, पालक, नेता, अभिनेता, प्रसारमाध्यम यासारख्या  समाज घडवणार्‍या घटकांनी आपले, वर्तन, आपले लेखन, आपले वक्तव्य ठराविक बंधनात असेल याची काळजी घेतली; तर सामाजिक स्थिरता राखण्यास व समाजिक उन्न्ती होण्यास मदत होईल. आपल्या वर्तनाने सामजिक घडी बिघडणार नाही इतपत सामाजिक बांधिलकी प्रत्येकाने स्वीकारायलाच पाहिजे.