वारसा 

           खूप वर्षांनी माहेरी जाण्याचा योग आला. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून प्रथमच जात होते. आधी रेल्वे, मग एस्.टी. आणि मग थोड पायी पायी चालत एकदाचे घर आले. हात पाय धुवून चहापाणी झाले. आणि तिथेच गप्पांचा अड्डा जमला. माझ्या भावाच्या मोठया मुलीच्या लग्नासाठी बराच गोतावळा जमला होता. एकेमेकांच्या चौकशा चालल्या होत्या. प्रवासाच्या थकव्याने माझा कधी डोळा  लागला ते समजलेच नाही. जाग आली ती भाच्याच्या आवाजाने "कोणी माझ्यासाठी काही करु नका ओळख बिळख काढण्याची गरज नाही माझ्या नोकरीच मी बघून घेईन. वशिला नको आणि लाचही नको." मी चमकून पाहिले माझा भाचा आणि भाऊ यांच्यात चाललेला तो संवाद ऐकता ऐकता मन भूतकळात जाऊन पोहोचले. आणि पंचवीस  वर्षापूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. व्यक्ती बदलल्या पण शब्द तेच राहिले. आज भावाचा मुलगा जे बोलत होता तेच शब्द थोड्याफार फरकाने माझ्या भावाने वडिलांना ऐकवले होते.
          मी सामान्य मध्यम परिस्थितीत लहानाची मोठी झाले. फार श्रीमंत नाही आणि फार गरिबीही नाही. नित्य गरजा भागून हौशीमौजी सहज पुरवल्या जात होत्या. माझ्या वडिलांनी फार संपत्ती गोळा केली नाही. पण लोकसंग्रह मोठा होता. घरात येणजाण खूप होत. म्हणजे कायम घर माणसांनी बहरलेल असायच. अडल्या पडल्यास मदत करायला  घरातील प्रत्येकजण सदैव तयार असे. वडिलांचीच तशी शिकवण  होती. म्हणजे त्यांनी असे समोर बसून संस्काराचे धडे दिले नाहीत. तसे ते फारच कमी बोलत. सदैव वाचनात मग्न असायचे. शिक्षण फारस झाल नव्हत. पण वाचन अफाट होत. त्यातूनच ते घडले होते. आणि आम्हाला घडवत होते. त्यांच्या वागण्या बोलण्यातून कळत नकळत अनेक संस्कार आमच्या मनावर आपोआप कोरले गेले. कोणी आजारी असल की स्वखर्चाने औषध आणून दे, एखाद पुस्तक आवडल की खिशाला  परवडो न परवडो चार प्रती विकत घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तिंना नेऊन दे, असले उद्योग ते करत. आई खूप चिडायची पण तिलाही माहीत होत. की त्यांचा आनंद इतरांना देण्यातच होता. स्वतःला शर्टाच कापड घेताना ते गरीब असत; पण इतरांना द्यायच म्हटल की एकदम श्रीमंती थाट असे. इतरांना देण्यात काय आनंद असतो; हे त्यांच्याकडे पाहूनच समजायच.
            प्रामणिकपणा हा त्यांचा आणखी एक गुण. हाती आलेल कोणतही काम मन लावून नियमांचे उल्लंघन न करता करणे हा त्यांचा खास स्वभाव. एस टी मध्ये नोकरीला होते, पण कधी कोणी रिझर्वेशन मागितल तर रिझर्वेशन खिडकीच्या आतून कधीच आणायचे नाहीत. भल्या पहाटे उठून स्वतः रांगेत उभे राहयचे आणि रिझर्वेशन करून आणायचे.  आम्ही खूप हसायचो. पण त्यांनी कधी कोणाला 'नाही' म्हटल नाही. आणि खिडकीबाहेर मोठमोठ्या रांगा असताना आतून तिकिट घेण हेही त्यांना पटलच नाही. तेच नोकरी लावण्याच्या बाबतीत व्हायच कधी कोणासाठी वरिष्ठांकडे नोकरी लावण्यासाठी शब्द टाकला नाही. इतरांसाठी नाहीच नाही पण स्वत:च्या मुलांसाठीही नाही. इतक्या ओळखी होत्या; पण आमच्या नोकर्‍या आम्हीच शोधल्या. अनेक नकार आले पण त्यातूनच खूप शिकायला मिळाल. अनुभवही खूप घ्यायला मिळाले. आणि नकळत आम्ही घडत गेलो. कधी कोणाला वशिल्याने नोकरी मिळाली अस कळल की राग यायचा. मग माझा भाऊ आणि भाचा यांच्यात जसे आता संवाद घडतात; तसेच आमच्या घरात घडायचे.
               पुढे भावाला छान नोकरी मिळाली एका मोठ्या कंपनीत तो मॅनेजर बनला. आणि वडिलांना हसणारा त्यांच्यावर रागावणारा माझा हा भाऊ वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकून संपूर्ण नोकरीच्या कारकीर्दीत वागला. प्रामाणिकपणे मन लावून काम केले. वशिला नाही, लबाडी नाही, मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा कायम ठेवला. बरोबरच्या सहकार्‍यां पैकी कोणी दोन दोन ब्लॉक घेतले , इस्टेट वाढवली, बायका मुलांना दागिन्यांनी मढवल, गाड्या घेतल्या पण माझ्या भावात आणि त्याच्या घरात रंगरंगोटीशिवाय काहीही फरक झाला नाही. पैसा फारसा मिळवला नाही पण वडिलांप्रमाणेच अफाट लोकसंग्रह केला. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून नाव कमावले.  आज पन्नाशीच्या घरात पाऊल टाकताना त्यानेच वडिलांना ऐकवलेली वाक्य त्याला त्याच्या मुलाकडून ऐकायला मिळत आहेत. रक्तात मुरलेल्या संस्कारांचा तो परिणाम आहे.
             मला खात्री आहे माझा उच्च शिक्षित हुशार भाचा आज ना उदया स्वतःच्या  कर्तृत्त्वावर कोणाचाही वशिला न लावता चांगली नोकरी मिळवणारच. समाजात तेवढा चांगुलपणा, गुणग्राहकता आजही शिल्लक आहे. मला हीही खात्री आहे की  हा प्रामाणिकपणाचा संस्कार म्हणा; की वारसा म्हणा जसा माझ्या वडिलांकडून भावाकडे, भावाकडून  भाच्याकडे  नकळत संक्रमित झाला; तसाच माझ्या भाच्याकडून त्याच्या पुढील पिढीकडेही दिला जाणार आहे. आणि म्हणूनच भोवतालची परिस्थिती पाहिली की मन धास्तावते. भविष्यकाळाचा वेध घेऊ लागते. आणखी पंचवीस वर्षांनी हा माझा भाचा पन्नाशीच्या घरात पोहोचलेला असेल. कशी असेल त्याची  परिस्थिती ? एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याला समाजात  आदराची वागणूक मिळेल की तो समाजापासून दूर फेकला जाईल ?  सचोटी , प्रमाणिकपणा हा त्या काळातील गुण असेल कां दोष? सुसंस्कारांचा वारसा घेउन आलेला हा माझा भाचा सभोवतालची ही परिस्थिती बदलेल की परिस्थितीनुसार तोच बदलून जाईल ? माझ्या वडिलांनी रुजवलेल आणि भावाने वाढवलेल हे प्रामाणिकपणाच रोपट सुकून, कोमेजून जाईल का इतरांना सावली देणारा उंच महावृक्ष बनेल ?