महाराष्ट्रातील अष्टविनायक 

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम |
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||
लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदम विघ्नेश्वरं ओझरम |
ग्रमो रांजण संस्थितं गणपती कुर्यात सदा मंगलम ||
वरील श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपतींचा उल्लेख केला आहे. ही आठ गणपतींची तीर्थस्थाने आहेत. या आठही गणपतींचे दर्शन करणे म्हणजेच अष्टविनायक यात्रा करणे. शास्त्रोक्त पद्धतीने ही यात्रा खालील क्रमाने केली जाते.
१) मोरगाव - मोरेश्वर  २) सिद्धटेक - सिद्धिविनायक  ३) पाली - बल्लाळेश्वर  ४) महड - वरदविनायक
५) थेऊर - चितांमणी  ६) लेणाद्रि - गिरिजात्मज  ७) ओझर - विघ्नेश्वर  ८) रांजणगाव - महागणपती आणि पुन्हा मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन घेऊन ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होते.
१) मोरगावचा मोरेश्वर - पुरंदर तालुक्यात कर्‍हा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे हे मंदीर आहे. भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराला पायर्‍या आहेत. तेथेच नगारखाना व नगारखान्याच्या बाजुला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पायर्‍या चढल्यावर एक दगडी चौथरा आहे. त्यावर एक मोठा काळ्या पाषाणातला , गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदीपुढे मोठे चपटे दगडी कासव आहे. या कासवापुढे मुख्य मंदीर लागते ते दगडी पाषाणातले असून तेथे एक मोठा उंदीरही आहे. मंदीराच्या गाभार्‍यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मूर्तीच्या बाजूला  सिद्धिबुद्धिच्या पितळी मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रदक्षिणा क्षेत्रात निरनिराळ्या विनायकांच्या व देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात शमी, मंदार, बेल यांचे वृक्ष आहेत.
२) सिद्धटेकचा सिद्धीविनायक - भीमा नदीकाठी वसलेले हे मंदिर आहे. या ठीकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून हा सिद्धीविनायक व त्याचे क्षेत्र ते सिद्धटेक असे म्हटले जाते. हे मंदिर उत्तराभिमुख  आहे.  याच्या पुढच्या बाजुला  महाद्वार असून त्यावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप व त्याच्या आत गाभारा आहे. गाभर्‍यात दगडी सिंहासन आहे सिद्धीविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची सिंदूर लावलेली आहे. त्याची एक मांडी दुमडलेली असून त्यावर सिद्धीबुद्धी बसलेल्या आहेत. मखर पितळेचे असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृती आहेत. मखराच्या दोन्ही बाजुला जयविजय उभे आहेत.
३) पालीचा बल्लाळेश्वर - हे मंदिरा पूर्वाभिमूख असून सुर्योदयाबरोबर सूर्याची कोवळी किरणे बरोबर मूर्तीवर पडतात. मंदिराच्या आवारात प्रचंड मोठी घंटा आहे. सभामंडप आठ खांबाचा आहे.  त्यानंतर बाहेर  गाभार्‍यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहतो आहे अशा स्वरुपाची उंदराची मूर्ती आहे. याला 'उंदीर गाभरा' म्हणतात. नंतर आतील गाभार्‍याच्या वरच्या बाजुला अष्टकोनी कमळ असून त्याला घुमटाचा आकार आहे. त्यात बल्लाळेश्वराची पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. तिच्या कपाळाचा भाग खोलगट तर बाकीचा चेहरा उभा आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात व बेंबीत हिरे आहेत. दगडी सिंहासनावरील चांदीच्या प्रथावळीवर ऋद्धी सिद्धी चवर्‍या ढाळीत आहेत.
४) महडचा वरदविनायक - भक्तांना वर देणारा म्हणून हा वरदविनायक. एखाद्या कौलारू घरासारखे असलेले हे मंदीर पूर्वाभिमुख आहे. त्याच्या चारही बाजूंना दोन दोन हत्ती कोरलेले आहेत. पश्चिमेला देवाचे तळे तर उत्तरेला गोमुख आहे. या देवळाचा कळस सोनेरी असून घुमटावर नागाची नक्षी आहे. गाभार्‍यात वरदविनायकाची मूर्ती दगडी  सिंहासनावर बसलेली आहे. त्याला नक्षीदार महिरपही आहे. ही मूर्ती  पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे.
५) थेऊरचा चिंतामणी - मुळा मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेरुर गावाला पूर्वी कदंबतीर्थ किंवा चितामणी तीर्थ म्हणत असत. या देवालयाचे महाद्वार उत्तराभिमूख आहे. महाद्वाराच्या आत प्रशस्त आवार आहे. आवारात शमी व मंदार वृक्ष आहेत. सभामंडपाबाहेर आवारात मोठी घंटा आहे. सभामंडपात यज्ञकुंड आहे व नंतर गाभारा आहे. गाभार्‍यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली स्वयंभू मूर्ती आहे. चिंतामणीची ही मूर्ती पूर्वाभिमुख असून डोळ्यात माणिक रत्न आहेत.
६) लेण्याद्रिचा गिरिजात्मज  - जुन्नर जवळ लेण्याद्रि हा लेणी असलेला पर्वत असून गिरिजात्मजाचे मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे. देवळात जाण्यासाठी ३०७ पायर्‍या आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर एकाच दगडांत कोरले असून दक्षिणाभिमुख आहे. गणपतीची प्रतिमा असलेले दालन खूप मोठे असून त्याला एकाही खांबाचा आधार नाही. मंदिराची रचना अशी केली आहे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत गणेशमूर्तीवर उजेड असतो. ही मूर्ती दगडात खोदलेली ओबडधोबड अशी मूर्ती असून उत्तराभिमूख आहे. डाव्या बाजूला मान वळलेली एकच डोळा दिसणारी अशी ही मूर्ती आहे.
७) ओझरचा विघ्नेश्वर - दगडी तटबंदी असलेल हे मंदीर पूर्वाभिमुख आहे. याचा कळास व शिखर सोन्याचे आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजुला दगडात कोरलेले भालदार चोपदार आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाळा आहेत व दोन बाजूंना ओवर्‍या आहेत. या मंदिरात एकात एक असे सभामंडप आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारात काळ्या पाषाणाची उंदराची मूर्ती आहे. देवळाच्या भिंतीवर चित्रकाम केलेले आहे. दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. विघ्नेश्वराची मूर्ती पूर्णाकृती बैठी असून डौलदार कमानीत बसलेली आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून पूर्वाभिमूख आहे.तिच्या दोन डोळ्यात दोन माणके तसेच कपाळावर व बेंबीत हिरे आहेत या मूर्तीच्या दोन्ही  बाजुला ऋद्धि सिद्धीच्या पितळेच्या मूर्ती आहेत.
८) रांजणगावचा महागणपती - पेशवेकालीन पद्धतीचे हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. उत्तरायण व दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याचे किरण महगणपतीच्या मूर्तीवर पडतात. याचे प्रवेशद्वार भव्य असून त्यावर जय व विजय हे द्वारपाल आहेत. या मंदिरातील सभामंडपातून आत गेल्यावर गाभारा आहे. महागणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजुला ऋद्धि सिद्धी आहेत.