कुतुबमीनार 

            दिल्लीपासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर मेहरोली येथे कुतुबमिनार हा जगप्रसिद्ध मनोरा आहे. दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने इ. स. ११९९ मध्ये हा मनोरा बांधण्यास सुरुवात केली. पण त्याचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच कुतुबुद्दीन ऐबकाचा मृत्यू झाला. फक्त पहिल्या मजल्याचे बांधकाम झालेला अर्धवट राहिलेला हा मनोरा पूर्णावस्थेला नेण्याचे काम शमसुद्दीन अल्तमश याने केले.  इ. स. १२३० मध्ये अल्त्मशने मनोर्‍यावर चार मजल्यांचे बांधकाम करून तो पूर्ण  केला. पुढे चौदाव्या शतकात फिरोजशहा तुघलकाने चौथ्या मजल्याची पुनर्रचना केली. त्यावर पाचवा मजला चढवला आणि घुमटाची जोड दिली, परंतु  इ. स. १८०३ मध्ये झालेल्या भुकंपात त्यावर बांधलेला घुमट खाली आला.
           या मनोर्‍याच्या अंतर्भागात ३७६ पायर्‍या आहेत. आणि हवा व उजेड भरपूर आहे. या मनोर्‍याचे खालचे तीन मजले तांबड्या पिवळ्या रंगाच्या दगडाचे आहेत व वरचे दोन मजले पांढर्‍या संगमरवराचे आणि तांबड्या दगडाचे आडवे पट्टे असलेले असे आहेत. घाटदार आकार व उंची यामुळे ही वास्तू  आकर्षक दिसते. हा मनोरा हिंदू- इस्लामी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. या मनोर्‍याचा वास्तुकल्प इस्लामी वास्तुविशारदाचा पण प्रत्यक्ष बांधणी हिंदू कारागिरांनी, केली असावी असे. त्याच्या बांधणीच्या वैशिष्ट्यावरून दिसून येते.