भारतातील काही प्रसिद्ध सरोवरे 

           १) महाराष्ट्र राज्यात बुलढाणा जिल्ह्यात सुमारे एक दशलक्ष वर्षापूर्वी उल्कापाताच्या आघाताने २००० मीटर व्यासाचे व १९० मीटर खोलीचे एक सरोवर तयार झाले. त्याला 'लोणार' सरोवर असे म्हणतात. या सरोवराच्या पूर्वेला असलेल्या झर्‍यातून त्याला पाणीपुरवठा होतो. याच्या भोवतालच्या प्रदेशातील क्षार विरघळून सर्व पाणी झिरपत या सरोवरात गोळा होत असल्याने या सरोवरात 'सोडियम कार्बोनेट' हे खनिज मीठ मिळते.
            २)प्राचीन काळी 'महापद्म' नावाने ओळखले जाणारे आणि आता 'वुलर' नावाने प्रसिद्ध असलेले सरोवर काश्मिरमध्ये आहे. ते समुद्रसपाटीपासून १७२६ मीटर उंचीवर आहे. आणि क्षेत्रफळ ११५ चौ. कि. मी. आहे. चंद्राकार आकाराचे हे सरोवर झेलम नदीच्या परिसरात असल्याने सृष्टीसौदर्याने बहरलेले आहे. हे गोड्यापाण्याचे सरोवर असून त्यात 'माहसीर' नावाचा मासा आढळतो.
            ३) कश्मिरमधील आणखी एक प्रसिद्ध सरोवर म्हणजे 'दाल सरोवर' जवळजवळ २१ चौ. कि. मी. परिसर या सरोवराने व्यापला असून त्याची लांबी ८ कि.मी. व उंची २.३ कि.मी. आहे. या सरोवराच्या बाजुला 'शालिमार', व 'निशीत' नावाच्या जगप्रसिद्ध बागा आहेत. याच्या काठावरील चिनारवृक्ष सरोवराची शोभा वाढवतात. हे सरोवर झेलम नदीला जोडून तेथे जलविहाराचीही सोय करण्यात आली आहे.
            ४) राजस्थानात जयपूरच्या पश्चिमेला 'सांबर' सरोवर आहे. त्याचे क्षेत्रफळ २३४ चौ. की. मी. असून ते २१ मीटर खोल आहे. हे सरोवर खार्‍या पाण्याचे आहे. त्याच्या तळाशी ४.५ मीटर जाडीचा मीठाचा थर आहे असे म्हणतात.
            ५) राजस्थानात अजमेरच्या वायव्येला 'पुष्कर' नावाचे एक सरोवर आहे. हे एक धार्मिक  तीर्थक्षेत्र असून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला तेथे मोठी यात्रा भरते ब्रह्म्देवाच्या हातून गळून पडलेल्या  पुष्पाचे ठिकाण म्हणून याला पुष्कर म्हणतात.
            ६) राजस्थानात उदयपूर शहरात 'पिचोला' नावाचे मानवनिर्मित सरोवर आहे. ते १४ व्या शतकाच्या अखेरीस बांधून पूर्ण झाले.सरोवराच्यामद्यभागी महाराणा दुसरा जगतसिंह याने सन १७५७ मध्ये 'जननिवास' नावाचा राजप्रासाद बांधला. या सरोवराभोवती टेकड्या व काठावर स्नानासाठी पुष्कळ घाट आहेत.
            ७) गुजरात राज्यात ज्याच्या काठावर दक्षपुत्रानी तप केले ते 'नारायण' सरोवर तसेच कर्दम ऋषींनी जेथे तपश्चर्या केली ते 'बिंदू' सरोवर आहे.
            ८) पावसाळ्यामध्ये गोड पाणी आणि उन्हाळ्यामध्ये  खारे पाणी असणारे 'चिल्का' नावाचे सरोवर ओरिसाराज्यात जगन्नाथ पुरी जवळील समुद्र्किनार्‍यावर आहे. एका लहान खाडीमुळे ते सरोवर समुद्राला जोडले गेले आहे. या सरोवरची आणखी गम्मत म्हणजे पावसाळ्यात त्याचे क्षेत्रफळ ११७० चौ. कि.मी. तर उन्हाळ्यात फक्त ८५४ चौ. कि.मी. एवढेच असते. ते फक्त २ मीटर खोल आहे.
            ९) आंध्रप्रदेशात गोदावरी व कृष्णा नदीच्या त्रिभूज प्रदेशाच्या दरम्यान 'कोलेरू' नावाचे एक उथळ सरोवर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे २५० चौ. कि. मी. एवढे आहे. या सरोवराच्या परिसरात पेलिकन नावाचे पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात.
            १०) तमिळनाडू राज्यात श्रीहरीकोटा जवळ 'पुलकित' नावाचे सरोवर आहे. त्याची लांबी ८६ कि. मी. असून समुद्राच्या लाटांच्या संचयनकार्यामुळे त्याची निर्मिती झाली असावी असे म्हणतात.