मुंगूस 

            मुंगूस हा सामन्यतः अफ्रिकेच्या उष्ण कटिबंधातील प्राणी आहे. तेथून तो आशिया आणि युरोपात गेला असे म्हणतात. दक्षिण अशियात मुंगूसाच्या एकूण सहा जाती आढळतात. भारतात हिमालयापासून  कन्याकुमारीपर्यंत सर्व भागांत मुंगूस आढळतात. दाट अरण्यापेक्षा मोकळ्या मैदानी जमिनी, झुडुपे, माळराने, लागवडीखालील  जमिनी, शेताच्या बांधावरील कुंपणे, गावजंगले, वनराया इत्यादी ठिकाणी मुंगूसे आढळतात. त्यांची लांबी सामन्यतः ९० से.मी. असते.  त्यातच त्याच्या शेपटीची लांबी ४५ से.मी. समाविष्ट असते.मुंगूस पिवळसर झाक असलेल्या राखाडी रंगाचे असतात. त्याच्या अंगावरील प्रत्येक केसाला एक पांढरट व एक काळसर अशा कड्या असतात. त्याच्या शेपटीचा टोकाकडचा भाग पांढरा किंवा पिवळसर लाल असतो.
           मुंगूसाचे कान अर्धवर्तुळाकार व छोटे असतात. ते त्याच्या डोक्याच्या किंवा मानेच्या वर येते नाहीत. हे कान अनेक घड्याघड्यांचे असतात. त्या घड्या पसरवून देऊन तो आपला कान पुर्णपणे झाकू शकतो. अशाप्रकारे छोटे कान, निमुळते डोके, आखूड पाय व त्यांच्या लांब धारदार नख्या, सडसडीत व लवचिक अंगकाठी ही त्याच्या शरिराची वैशिष्ट्ये आहेत.
            मुंगूस तृणभक्षक व मांसभक्षक असे दोन्ही आहे पण मांस खाणे त्याला अधिक आवडते. साप, उंदीर, विंचू , कोंबड्या, पक्ष्यांची  अंडी, सरडे, पाली, बेडूक हे मुंगुसाचे खाद्य आहे. त्याचे दात तोंडात घट्ट बसवलेले धारदार असतात.  मुंगूस  उत्तम शिकारी असून भक्ष्यावर सरळ धडक मारून ते पुढूनच हल्ला चढवते. शिकार करताना ते बर्‍याच वेळा उकिडवे बसते किंवा मागच्या पायावर उभे रहाते. भक्ष्य पकडले की त्याला जबर चावा घेऊन मारून टाकते. आणि मग लचके तोडून चावून खाते. कधी कधी भक्ष्याचे नुसते रक्त पिण्यातही त्याला आनंद मिळतो. पक्ष्यांची अंडी खाताना ते अंडे आपल्या पुढच्या दोन पायात धरते व त्याला भोक पाडून  आतला बलक शोषून घेते. मुंगूस आणि साप यांची झुंज पहाण्यासारखी असते. नागाने फणा काढून डंख मारला की ते चपळतेने दूर सरते. आणि नागाचे डोके खाली झाले की त्यावर हल्ला चढवते. मुंगूस रागावले की त्याचे केस ताठ उभे राहून आकाराने जवळजवळ दुप्पट होतात. त्यामुळे नागाने केलेले वार केसात वरचेवर बसतात.
           मुंगूस धीट व आक्रमक असले तरी ते बुजरे आणि सावध असते. झुडुपे, गवत, पालापाचोळा याखाली बसून त्याच्या हालाचाली चालतात. मुंगुसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या गुदद्वारापाशी दुर्गंधी सोडणार्‍या ग्रंथी असतात. संकटाची चाहूल लागली की मुंगूस अशी दुर्गंधी सोडतात की ती सहन न होऊन हल्ला करणाराच माघार घेतो.
            मुंगूसाची मादी वर्षातून तीन वेळा विते. तिच्या गर्भारपणाचा काळ ६० दिवरांचा असतो तिची पिल्ले गोंडस असतात. शेतातील बेडूक, साप, उंदीर, विंचू यांचा उपद्रव कमी करण्यासाठी बरेच शेतकरी मुंगूस पाळतात.