प्लास्टिक 

            कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक. जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणार तेल प्रथम शुद्ध करून घ्याव लागत.  त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात. सर्वात कमी तापमानाला बाहेर पडतो तो स्वयंपाक घरात वापरला जाणारा गॅस त्यानंतर नॅप्था नावाचा पदार्थ वाफ होऊन बाहेर पडतो आणि त्यापेक्षा जास्त तापमानाला केरोसीन,  डिझेल, वंगणाची तेले असे पदार्थ बाहेर पडतात. यापैकी नॅप्था नावाच्या पदार्थापासून 'एलिथिन प्रोपिलिन' सारखे पदार्थ बनवले  जातात. त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लास्टिकची निर्मिती होते.
          प्लास्टिकचे रेणू हे कार्बनच्या लांबलचक साखळ्यांचे बनलेले असतात. त्या साखळ्यांनाच 'पॉलिमर्स' असे म्हणतात. साखळी जितकी लांब तेवढे प्लास्टिक जास्त कठीण असते. या साखळ्या मुद्दाम बनवाव्या लागतात. त्यालाच 'पॉलिमरायझेशन' असे म्हणतात. 'अ‍ॅडिशन पॉलिमरायझेशन' आणि 'कन्डेसेशन पॉलिमरायझेशन असे त्याचे अनेक प्रकार आहेत.
            निसर्गात कित्येक पदार्थ प्लास्टिक सारखे वापरलेले आढळतात. उदा. प्राण्याच्या अंगावरचे, केस, लोकर, शिंगे, नख यामध्ये 'केरॅटिन' या नावाच प्रथिन असत. या प्रथिनाचा रेणू कार्बनच्या साखळीनेच बनलेला असतो. तेव्हा तो नैसर्गिक पॉलिमरच याशिवाय अ‍ॅम्बर, लारव यासारख्या गोष्टी निसर्गात निर्माण होणारी प्लास्टिकच आहेत.
           कृत्रिम रित्या अनेक प्रकारे प्लास्टिक निर्माण केल जात.
१) कचकड म्हणजेच सेल्युलाइड नावाच प्लास्टिक हे कापसावर नायट्रीक आम्ल या रसायनांची क्रिया  करून बनवलेल प्लास्टिक आहे.
२) हाएट नावाच्या दोन अमेरिकन भावांनी प्लास्टिकमध्ये कापूर घालून हस्तीदंतासारख दिसणार  प्लास्टिक तयार केल. त्यापासून टेबलटेनिसचे चेंडू, बिलियर्डचे चेंडू, पियानोच्या पट्ट्या बनवण्यात आल्या.
३) डॉ. लिओ बेकेलँड यांनी फिनॉल आणि फार्मल्डी या पदार्थापासून पूर्णपणे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले.
४) काचेचे तंतू घालून अत्यंत मजबूत असे फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (एफ. आर. पी.) बनवल जात. अशा प्लास्टिक पासून धरणाचे पाणी सोडण्याचे दरवाजे सुद्धा बनवले जातात. जीपच छप्पर, डोक्यावर घालायच हेल्मेट एफ. आर. पीनेच बनवतात.
          आपल्या वापरातील प्लास्टिक मुख्यतः दोन प्रकारची असतात. या दोन पैकी थर्मोप्लॅस्टिक्स हे आपल्या वापरात बरेचवेळा येते. ती उष्णतेने वितळतात. मऊ होतात. मग त्यांना हवा तसा आकार देता येतो. त्यांच्यात प्लास्टिसिटी हा गुणधर्म असल्याने थंड झाली की ती घट्ट व कडक होतात. असे प्लास्टिक हवे तेंव्हा पुन्हा  वितळवून त्याला  नवीन आकार देता येतो. उलट दुसर्‍या प्रकारची म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिक्स ही पुन्हा पुन्हा वितळवता येत नाहीत. ती उष्णतेने वितळत नाहीत आणि मऊही होत नाहीत. हे प्लास्टिक कायमचे कठीणच झालेले असते. ही प्लास्टिक्स जास्त ताण सहन करू शकतात. पण आघात सहन करू शकत नाहीत. विजेची बटणे, टेलिफोन, कुकरची हॅण्ड्ल्स याप्रकारच्या वस्तू  धर्मोसेटिंग प्लास्टिकच्या असतात.
          जगात सर्वात जास्त उत्पादन ज्या प्लास्टिकच होत, ते पॉलिथिन प्लास्टिक. त्याच खर नाव 'पॉलिएथिलीन' असे आहे. कमी घनतेचे आणि जास्त घनतेचे असे त्याचे दोन प्रकार आहेत. जास्त घनतेच्या पॉलिएथिलिन मध्ये ताण सहन करण्याची शक्ती जास्त असते. पण ते बराच काळ ताणलेल्या स्थितीत राहिले तर त्याला भेगा पडतात. या प्रकारच्या प्लास्टिकपासून डबे, बाटल्या, पाणी वाहून नेणारे नळ इ. वस्तू बनवतात. त्यापेक्षा कमी घनतेचे प्लास्टिक मऊ असते त्यापासून पिशव्या, पेले, लहानसहान भांडी बनवतात. या सर्वच पॉलिथिनच्या वस्तू मेणचट दिसतात.
           पॉलिथिनच्या खालोखाल उत्पादन पी.व्ही. सी. म्हणजे पॉलिव्हिनाईल क्लोराइड नावाच्या प्लास्टिकचे होते. यामध्ये क्लोरीन हे मुलद्रव्य असते. त्यापासून खेळणी, बाटल्या, डबे, पिशव्या, रेनकोट, टेबलक्लॉथ, पावसाळी बूट चपला अशा अनेक वस्तू बनवतात. या पी.व्ही. सी चा लेप कापडावर देऊन त्यापासूनच रोक्झिन बनवतात.  वीजवाहून नेणार्‍या तारांची आवरणेसुद्धा पी.व्ही. सी चीच असतात. या पी.व्ही. सी मध्ये घातलेल्या द्रव्याच प्रमाण कमी अधिक करून कठीण किंवा लवचिक बनवता येते. अलिकडे फरशांसारख्या दिसणार्‍या तक्तपोशी बाजारात दिसतात; त्यातही पी.व्ही. सी चा वापर असतो. हल्ली ज्या पारदर्शक बाटल्यातून शांम्पू मिळतो त्या पी.व्ही. सीच्याच असतात.
            आजकाल पॉलिप्रॉपिलीन नावाचे प्लास्टिक बाजारात मिळते ते पॉलिएथिलिनपेक्षा मजबूत असत ते उलटसुलट वापरल तरी खराब होत नाही..सन १९५४ च्या सुमारास पॉलिप्रॉपिलीन नावाच्या प्लास्टिकचा शोध लागला. हे पॉलिथिन सारखच दिसायला मेणचट असत पण ते पॉलिथिन पेक्षा जास्त तापमानाला मऊ पडत आणि उलट सुलट कसही वाकवल तरी तुटत नाही म्हणून ते बिजागर बनवायला वापरतात तसेच सामानाच्या पेट्या, खुर्च्या, बादल्या बनवयला उपयोगी असते. मात्र हे उन्हात चटकन खराब होत.
            एक काचेसारख प्लास्टिही असत. त्यापासून भिंगे, झुंबर बनवतात. याच्या बाटल्याही बनवतात त्या उकळत्या पाण्यात टाकून निर्जंतुक करता येतात आणि कितीही आपटल्या तरी फुटत नाहीत. अशा प्लास्टिकला पॉलिमिथाईलमिथाक्रिलेट असे म्हणतात. हल्ली मेलमाईन चा टी सेट बाजारात मिळतो. हा सेट लवचिक असल्याने फुटत नाही. त्याला अनब्रेकेबल म्हणतात. ते मेलामाईन फार्मअल्डिहाईड नावाच  प्लास्टिकच असत. ते चटकन फुटत नसल तरी गरम पदर्थाने खराब होत. व हळद वगैरेचे डाग त्यावर पडतात.
          ड्यू पॉन्ट नावाच्या अमेरिकन कंपनीने पॉलीट्रेट्राफ्लोरो एथिलिन म्हणजे पी.टी. एफ. ई. नावाचे प्लास्टिक शोधून काढले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते २६० अंश सोल्सिअस तापमानापर्यंत मऊ पडत नाही. सर्वसाधारण प्लास्टिक १०० अंश सेल्सिअस तापमानलाच मऊ पडते यालाच टेफ्लॉन प्लास्टिक असे म्हणतात. बहुतेक प्लास्टिक उष्णता विरोधक आहेत पण टेफ्लॉन मात्र उष्णता वाहक आहे.
            नायलॉन म्हणजे पॉलीअमाइड आणि टेरिलीन म्हणजे पॉलिइस्टर ही सुद्धा एक प्रकारची प्लास्टिक्सच आहेत म्हणजे कपडयांच्या दुनियेतही प्लास्टिकचा शिरकाव आहेच. प्लास्टिकचे रेनकोट तर आपण वापरतोच. आजकाल बुलेटप्रुफ जाकीट सुद्धा केवलार नावाच्या पॉलिमरच्या धाग्यापासून बनवतात. हा धागा खूप मजबूत असतो.
            वस्तू चिटकवण्यासाठी आपण  फेव्हिकॉलचा वापर करतो ते फेव्हिकॉल म्हणजे पॉलिव्हीनाईल  अ‍ॅसिटेट नावाचे पाण्यात विरघळणारे प्लास्टिकच असते.