विजापूरचा गोल घुमट 

            स्थापत्यशास्त्रातील एक अदभूत चमत्कार म्हणजे कर्नाटकातील विजापूरचा गोल घुमट विजापूरपासून आत आठ किलोमीटर्स अंतरावरुनही त्याचा भव्य चकाकणारा गोल दिसतो.
           सन १६२७ ते १६५५ या काळात महंमद आदिलशाह यांनी हा घुमट बांधला त्यासाठी त्याकाळात त्याने इराणी इंजिनियरला बोलावून तो बाधून घेतला. याबाबत अशी कथा सांगतात कि गोल घुमटाची ती अनुपम कला कृती पाहुन महंमद अदिलशहाने त्या इराणी इंजिनियरचे हातपाय तोडून टाकले. याचे कारण सांगताना तो म्हणाला होता. "माझी ही इमारत संपूर्ण जगात अद्वितीय राहिली पाहिजे याचे हात पाय तोडून टाकले तर दुसर्‍या कोणासाठी तो गोलघुमटासारखी इमारत बांधणार नाही". पुढे सन १६५६ मध्ये महंमद अदिलशाहाचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे अस्थी गोलघुमटाखाली कबर बांधून त्यात ठेवण्यात आले.
           अनेक वैशिष्ट्यांसाठी गोलघुमट जगात प्रसिद्ध आहे. एकाही खांबाचा आधार नसलेली जगातील ही एकमेव प्रचंड इमारत आहे. या घुमटाचा खालचा हॉल अठरा हजार दोनशे पंचवीस चौरस फुट आहे. ज्या मुख्य घनाकृती भागावर हा घुमट आधारलेला आहे, त्याचा तळ १३५ फुट आहे. जमिनीपासून घुमटाच्या आतील भागाची उंची १७८ फुट व बाहेरील भागाची उंची १९८ फूट आहे. आणि इतका प्रचंड विस्तार असूनही त्याला एकाही स्तंभाचा आधार नाही हे विशेष.
           गोलधुमटाच्या अर्ध्याहून अधिक अंतरावर चढून जाण्यासाठी पायर्‍या आहेत. तिथे एक गोलाकार गॅलरी आहे. या गॅलरीतून एक टाळी वाजवली तर त्याचे अनेकदा प्रतिध्वनी ऐकू येतात.
           गोलघुमटाच्या चार बाजुंना चार उंच मनोरे आहेत. त्यांना आठ मजले आहेत. त्या षट्कोनी मनोर्‍यांना नक्षीदार कमानी आहेत. गोलघुमटाच्या चारही बाजूंना चार भव्य कमानी व दरवाजे आहेत. घुमट व दरवाजे यांच्या मधल्या भागावर सुंदर नक्षी आहे. "या ठिकाणी महंमद आदिलशाहाच्या अस्थी असून त्यांच्या निधनानंतर त्यांना स्वर्गप्राप्ती झाली व आकाशात तेजस्वी तार्‍याच्या रुपात ते निरंतर राहिले आहेत" अशा अर्थाचे कोरीव काम घुमटाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर आहे.
           गोलघुमटाचा परिसर सुंदर उद्यान व हिरवळ यांनी सुशोभित ठेवण्यात आला आहे.