गोल्डन स्टार मल्लिका साराभाई 

            भारतीय नृत्याची ध्वजा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकत ठेवणारी गुजराथ राज्यातील अहमदाबाद येथील संस्था म्हणजे दर्पण. जागतिक किर्तीचे संशोधक विक्रम साराभाई यांच्या पत्नी मृणालिनी साराभाई यांनी ही संस्था स्थापना केली. नृत्य, संगीत, नाटक, कठपुतली बाहुल्यांचे खेळ, लोककला इत्यांदीचा विकास करण्याच्या हेतूने सन १९४९ मध्ये 'दर्पण' संस्थेची स्थापना झाली. विक्रम साराभाई व मृणालिनी साराभाई यांची कन्या मल्लिका साराभाई. पित्याची बुद्धिमत्ता आणि आईच अप्रतिम सौंदर्य यांच अफलातून मिश्रण म्हणजे मल्लिका साराभाई. त्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या नर्तिका आहेतं. नोव्हेंबर १९७७ मध्ये त्यांनी पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. त्यावेळी विविध देशातील चारशे नर्तक-नर्तिकामधून त्यांची सर्वोत्कृष्ट नर्तिका म्हणून निवड झाली होती. त्यावेळी त्यांना 'गोल्डन स्टार' हा सन्मान मिळाला. जपान, इंग्लंड, युरोप, चीन, इत्यादी देशात त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत. लहानपणापासूनच आपल्या आईकडेच त्यांनी नृत्याचे शिक्षण घेण्यास  सुरुवात केली.
           मल्लिका साराभाई केवळ नृत्यातच प्रवीण आहेत असे नाही तर त्या उत्कृष्ट अभिनेत्याही आहेत. 'मेणा गुर्जरी'  या चित्रपटातील प्रमुख भूमिकेबद्दल त्यांना गुजरात राज्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. हिन्दी, गुजराथी चित्रपटात त्यांनी यशस्वी भूमिका केल्या. संगिताच्या क्षेत्रातही त्या मागे नाहीत. गुजरात राज्यात एस.एस्.सी. च्या परीक्षेत संगीत विषयात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. व्यवस्थापन विषयात एम्.ए. व मानसशास्त्रात पी.एच्.डी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत.
          इतकच नाही तर 'इनसाईड आउटसाइड' या मासिकाच्या प्रकाशिका म्हणून त्यांनी काम केले आहे. आपले पती श्री बी. के. शाह यांच्या सहकार्याने त्यांनी 'मॅपिन' नावाची प्रकाशन संस्था सुरु केली आहे. भारतीय कला व हस्तकला या विषयावरची निवडक पुस्त्स्के त्या प्रकाशित करतात.
           सन १९८० मध्ये त्यांनी 'आजवली रात अस्मानी' हा चित्रपटही काढला. 'दर्पण' संस्थेचा 'चित्रकथी' नावाचा चित्रपटविभाग व लोकसंगिताचा विभाग मल्लिका साराभाई यांनी सुरु केला. लोककलांच्या पुनरुज्जीवनासाठी 'युनेस्को' ने स्थापन केलेल्या समितीच्या त्या सभासद आहेत. शैक्षणिक चित्रपटांच्या निर्मितीसाठी त्यांनी 'चित्रशाळा' ही संस्था स्थापन केली आहे. 'कुचिपुडी' या विषयावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. सन १९८४ मध्ये त्यांनी अहमदाबादमध्ये पहिला जागतिक लोककला महोत्सव भरवला होता.