नरसी मेहता 

            नरसी मेहता हे गुजराथचे आद्य कवी व संत होते. सन १४१४ मध्ये गुजराथ राज्यातील जुनागढ मधील तळाजा गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव नरसिंह असे होते. पण लाडाने सर्व नरसी असे म्हणत. त्यांचे वडील कृष्णादास व आई दयाकुंवर त्यांच्या लहानपणीच स्वर्गवासी झाले. त्यांच्या   काकांनी  त्यांचा साभाळ केला.
            लहानपणापासून नरसींना साधुसंत, देव यांच्याविषयी आकर्षण होते. पण वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत त्यांना बोलताच येत नव्हते. पुढे एका साधुच्या आशीर्वादाने त्यांना वाचा प्राप्त झाली असे म्हणतात.  त्यांनी आपल्या मुखातून पहिला शब्द उच्चारला तो 'राधेश्याम' असा होता.  तेव्हापासून 'कृष्णभक्ती' हेच त्यांचे जीवनकार्य बनले. याच काळात सतराव्या वर्षी त्यांचा विवाह माणकबाई यांच्याशी झाला. पण त्यांचे संसारात लक्षच नव्हते. ते कृष्णभक्तीतच रंगून जात. यावरुन त्यांना घरातल्या वडील मंडळींची अपमानकारक बोलणी ऐकून घ्यावी लागत. शेवटी असह्य होऊन त्यांनी घराचा त्याग केला आणि संतमय जीवन जगण्यास सुरुवात केली. नरसी मेहता ब्राह्मण होते. पण ते त्या़काळातही हरिजनांच्या वस्तीत जाऊन भजन, किर्तन, प्रवचन करत असत. त्यामुळे त्यांना सनातनी लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागे. किर्तनामधून त्यांना जी प्राप्ती मिळत असे त्यावरच ते आपला चरितार्थ चालवत असत. त्यांची रहाणी अत्यंत साधी होती. श्रीकृष्णाने त्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात वेळोवेळी मदत केल्याच्या कथा गुजराथेत सांगितल्या जातात. सन १४८० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
           नरसी मेहतांनी अनेक पद्यरचना केल्या. साधी पण सुमधूर भाषा, भक्तीभाव व रसाळता यामुळे त्यांची गीते लोकांना आवडू लागली. त्यांच्या प्रवचनांना व कीर्तनांना अनेक लोक येऊ लागली. महात्मा गांधीजींचे 'वैष्णनजन तो तेणे कहिये' हे आवडते भजन नरसी मेहतांचेच.
           नरसी मेहतांचे बरेसचे जीवन जुनागढमध्येच व्यतीत झाले. ते ज्या ठिकाणी भजन, कीर्तन करत ते ठिकाण आजही उत्तम स्थितीत 'नरसी मेहतानो चोरो' या नावाने प्रसिद्ध आहे. गुजराथमधील ते एक  तीर्थक्षेत्रच आहे.
           'नरसी चोरो' ही इमारत बैठी असून आत मोठी दालने व भव्य चौक आहे. या इमारतीमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आहे. त्या समोर असलेल्या चौथर्‍यावर बसून नरसी भजन करीत असत. नरसी मेहतांच्या जीवनावरील विविध प्रसंग दाखवणारा चित्रसंग्रहही तेथे आहे. तसेच पगडी घातलेली नरसी मेहातांची मूर्तीही त्याच ठिकणी पहायला मिळते.